1857 च्या बंडाचा थरार अनुभवणाऱ्या लेखकाच्या घरी....

By अोंकार करंबेळकर | Published: July 11, 2018 10:56 AM2018-07-11T10:56:11+5:302018-07-11T15:33:50+5:30

आपल्या घरात असलेल्या गरिबीचे वर्णन करताना गोडसे भटजी लिहितात, दारिद्रयाने तर आम्हाला मालाच घातली होती, दारिद्रय घराच्या मागेपुढे फुगड्या घालत होते. यामुळेच चार पैसे मिळविण्याच्या हेतूने ते बाहेर पडले होते. आई-बाबा, दोन भाऊ, बहिण, पत्नी  यांची समजूत काढून 1857साली बाहेर पडले आणि 1860 साली परतले.

My visit to the home of Vishnubhat Godse, author of Marathi book Majha Pravas | 1857 च्या बंडाचा थरार अनुभवणाऱ्या लेखकाच्या घरी....

1857 च्या बंडाचा थरार अनुभवणाऱ्या लेखकाच्या घरी....

googlenewsNext
ठळक मुद्दे1883 साली म्हणजे प्रवासावरुन परतल्यावर जवळजवळ 23 वर्षांनी विष्णूभटांनी लेखन केले. पण कायदेपंडित महादेवराव आपटे यांनी हे पुस्तक लेखक जिवंत असेपर्यंत प्रसिद्ध करु नका असा सल्ला दिला. त्यामुळे विष्णूभटजींना त्यांच्या हयातीत हे पुस्तक पाहता आले नाही.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराला गेल्या वर्षी १६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या बंडाची सुरुवातीपासून हकीकत लिहिणारे विष्णूभट गोडसे यांनी केलेल्या प्रवासातील आठवणपर लेखनामुळे 'माझा प्रवास' हा एक महत्त्वाचा दस्तावेज मराठीत आणि पर्यायाने सर्व भारतीयांना उपलब्ध झाला आहे.
पेण जवळच्या एका लहानशा खेड्यातील हा तरुण भटजी काकांबरोबर कुटुंबावरील कर्ज फेडण्याच्या उद्देशाने उत्तरेत जातो काय, बंडाच्या धामधूमीत त्यांचं सापडणं, पेशवे, तात्या टोपे, झाशीच्या राणीच्या आठवणी, लढाया आणि झाशीतले वास्तव्य हे सगळं थक्क करायला लावतं. इतक्या संकटात सापडूनही जिवंत पुन्हा वरसईला येणं हेसुद्धा आश्चर्यच होतं. त्यांच्या पुस्तकात सुरुवातीला वरसई आणि परिसराचे थोडे वर्णन येतं आणि संकटकाळात ते सतत गावातील वैजनाथाचे स्मरण करताना माझा प्रवासमध्ये करताना दिसतात. त्यामुळे बंडाला १६१ वर्षे झाल्याच्या निमित्ताने तरी वरसईला जाऊ असा विचार करुन निघालो.

(गोडसे भटजींचे वरसई गाव, वैजनाथाच्या मंदिरातून घेतलेले छायाचित्र)

पेणवरुन खोपोली मार्गाने जायला लागलं की साधारण अकरा-बारा किलोमीटरवर वरसईचा फाटा लागतो. एका बाजूला वरसई तर दुसऱ्या बाजूला विनोबांचं गागोदे आहे. भर पावसातून त्या मोकळ्या रस्त्यावरुन आमची बस जाताना या सगळ्या परिसराने पाहिलेल्या इतिहासाचेच विचार डोक्यात येऊ लागले. गागोदे गाव विनोबा भाव्यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, वयाची पहिली दहा वर्षे विनोबांनी इथेच काढली. आई-बाबा-आजोबांच्या शिकवणीतून ते इथेच घडले. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच गागोद्याच्या खिंडीमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या सैन्याने कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लूटला होता अशी आख्यायीका आहे. प्रबळगडाच्या प्रभावळीतले सांकशी आणि माणिकगड हे दोन्ही किल्ले वरसईच्या बाजूस आहेत, त्यातला माणिकगड पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना द्यावा लागला होता.  पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची मुंजही वरसईलाच झाली होती, त्यावेळेस त्यांनी चांदीच्या 21 दुर्वा गावातल्या वैद्यांच्या गणपतीला वाहिल्या असा उल्लेख गॅझेटमध्ये आहे.  त्यामुळे हा सगळा परिसरच गेली तीन-चारशे वर्षे इतिहासाचा साक्षीदार झाला असणार.

गागोद्याला मागे टाकून वरसई फाट्यामधून आत जायला लागलं की बाळगंगा नदी आपल्या सोबत समांतर वाहू लागते. एक अरुंद रस्ता आमच्या बसला वरसईला घेऊन गेला. विष्णूभट गोडसे, भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य आणि इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या जन्मगावात मी जाऊन पोहोचलो होतो. आजूबाजूच्या गावांपेक्षा वरसई थोडं मोठं असलं तरी ते लहानच वाटलं. सात-आठ किराणा मालाची दुकाने आणि चहा-भजीची चार-पाच हॉटेलं इतकीच काय ती बाजारपेठ मुख्य चौकात आहे. एका दुकानात चहा प्यायला बसलो तर बाळगंगा धरणासंदर्भातली नोटीस वाचायला मिळाली.
वरसईसकट आजूबाजूची काही गावे आणि लोकांच्या जमिनी जाणार आहेत. मगाशी रस्त्याला वाट दाखवत आलेल्या बाळगंगेच्या पोटात अख्खं वरसई जाणार असल्याचं हॉटेलवाल्याने सांगितलं. म्हटलं तुम्ही काही विरोध वगैरे काही केला नाही का?  तो म्हणाला सगळं झालंय करून आता धरणाचा फुगवटा इथे येणारच आहे. लोकांच्या जमिनींचे पेमेंट सुरु आहे, काही लोक आधीच बाहेर गेले आहेत, बाकीचेही जातील. पण मग तुम्हाला पर्यायी घरे आणि जागा कोठे मिळणार आहेत विचारल्यावर तो म्हणाला, अजून ते निश्चित नाही म्हणूनच सगळे थांबलोयत, मिळालं की जाणार. इतक्या महान पुरुषांचे जन्मस्थान असलेले हे गाव पाण्याखाली जाणार म्हणून वाईट वाटू लागलं. मग त्यालाच गावातले काही पत्ते विचारले आणि चहा पिऊन बाहेर पडलो. गोडसे भटजी गावात वरसईकर गोडसे किंवा बखरकार गोडसे भटजी म्हणून ओळखले जात असल्याचं जाणवलं.


(विष्णूभटांची अपार श्रद्धा असणाऱ्या वैजनाथाचे मंदिर, बाळगंगेच्या अगदी काठावर आहे.)

गावात शांतता जाणवण्यासारखी होती. बरीचशी घरं बंद होती, कदाचित त्या घरांचे मालक मुंबई-पुण्याला शहरात निघून गेले असावेत. काही घरांच्या भिंती पडून फक्त जोती शिल्लक होती. सर्वात आधी माझा प्रवासमध्ये वारंवार उल्लेख येणाऱ्या वैजनाथाच्या मंदिरात जावं म्हणून नदीच्या बाजूने गावाच्या दुसऱ्या टोकावर गेलो. गोडसे भटजींसकट सगळ्या वरसईकरांचे अपार श्रद्धास्थान असणारे वैजनाथाचे देऊळ आज एकदम भव्य वाटते. उत्तरेतून परतल्यावर विष्णूभटजी इथेच दर्शनाला आले होते. वरसईचे हे काका-पुतणे परतले हे कळल्यावर गागोदे, वावोशी, वरसईचे त्यांचे नातेवाईक आणि लोकही आले होते. बहुधा मंदिराच्या समोरच्या मोकळ्या पटांगणामध्येच त्यांच्या भेटी झाल्या असाव्यात.1915 साली गाभाऱ्यासमोर बांधलेल्या सभामंडपाला आता विष्णूभटजींचे नाव दिले आहे. 
वैजनाथानंतर आता गावात विष्णूभटजींचे घर पाहायचं होतं. ज्या घरामध्ये त्यांनी ग्वाल्हेरला बायजाबाई शिंदे करत असलेल्या सर्वतोमुख यज्ञाला जाण्यासाठी विचार केला, आई-वडिलांची परवानगी मिळवली, परतल्यावरही तेथे वास्तव्य केले ते घर आजही तसेच आहे. याच घरात विष्णू भटजींचा 1827 साली जन्म झाला. त्याच घराच्या जुन्या भिंती आणि जोत्यांची गोडसे भटजींचे वंशज दरवर्षी डागडुजी करतात. आज इथली गोडसे मंडळी नोकरी धंद्याच्या निमित्ताने सगळे शहरात, देशात परदेशात विखुरलेली आहेत. पण दरवर्षी महाशिवरात्री, दुसरा श्रावण सोमवार आणि त्रिपुरारी पौर्णिमेला जमतात.

आपल्या घरात असलेल्या गरिबीचे वर्णन करताना गोडसे भटजी लिहितात, दारिद्रयाने तर आम्हाला मालाच घातली होती, दारिद्रय घराच्या मागेपुढे फुगड्या घालत होते. यामुळेच चार पैसे मिळविण्याच्या हेतूने ते बाहेर पडले होते. आई-बाबा, दोन भाऊ, बहिण, पत्नी  यांची समजूत काढून 1857साली बाहेर पडले आणि 1860 साली परतले. परतल्यावर त्यांनी याच घराच्या अंगणात मावंदे घातले होते. सर्वांना गंगोदक देऊन खुश केले होते याच घराच्या परसामध्ये आई-वडिलांच्या हातून ब्राह्मणभोजनाचा संकल्प करुन मावंद्याचे जेवण सर्वांना दिले होते. आज त्यांच्या अंगणात गुरे बांधण्याची जागा पोलीस चौकीला देण्यात आली आहे, त्याच्या जवळच ग्रामपंचायतीची इमारतही दिसली. घराच्या थोड्या जवळच विष्णू भटजींचे नातू  पुरुषोत्तम नरहर गोडसे यांच्या नावाने शाळेला जमिन देण्यात आलेली आहे.

भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचे उपाध्ये असल्यामुळे वैद्यांच्या घरी ते कल्याणला नेहमी जात असत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चिंतामणरावांना बंडाच्या हकीकती सांगत असत. त्यामुळे एकदा वैद्यांनी त्यांना या आठवणी लिहून द्यायला सांगितल्या आणि त्याचे पुस्तक प्रकाशित करुन बदल्यात 100 रुपये देईन असे आश्वासनही दिले. त्यानुसार 1883 साली म्हणजे प्रवासावरुन परतल्यावर जवळजवळ 23 वर्षांनी विष्णूभटांनी लेखन केले. पण कायदेपंडित महादेवराव आपटे यांनी हे पुस्तक लेखक जिवंत असेपर्यंत प्रसिद्ध करु नका असा सल्ला दिला. त्यामुळे विष्णूभटजींना त्यांच्या हयातीत हे पुस्तक पाहता आले नाही. 1901 साली विष्णूभटजींचा मृत्यू  (त्यांच्या निधनाच्या वर्षाबद्दल विविध नोंदी आहेत. काही ठिकाणी 1904, 1907 अशी नोंद आहे मात्र गोडसे घराण्याच्या नोंदवहीत 1901 अशी नोंद आहे.) झाल्यानंतर सहा वर्षांनी मूळ मोडी हस्तलिखिताचे लिप्यांतर करुन, मजकूरात काही बदल करून वैद्यांनी पुस्तक प्रसिद्ध केले. त्याला त्यांनी माझा प्रवास, 1857च्या बंडाची हकिकत असे नावही दिले. जवळजवळ चोवीस वर्षे माझा प्रवासचे हस्तलिखित जपल्यानंतर त्यांनी ते पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाकडे दिले. 1948 साली न. र. फाटक यांनी त्याची एक आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यानंतर या हस्तलिखिताला महत्त्वाचा हात लागला तो म्हणजे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा, त्यांनी वैद्यांनी केलेल्या बदलांना काढून टाकून नवे पुस्तक 1966 साली मुळाबरहुकुम प्रसिद्ध केले. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.

(झाशीच्या राणीचे इंटरनेटवर उपलब्ध असणारे छायाचित्र)
झाशीच्या राणीला दरबारात, रणांगणात, दैनंदिन कामकाज करताना, राजकारणातले निर्णय घेताना पाहणाऱ्या दुर्मिळ लोकांपैकी गोडसे भटजी होते. राणीचे त्यांनी केलेले वर्णन आणि तिचा ऑस्ट्रेलियन वकिल जॉन लॅंग याने केलेले वर्णन बहुतांश एकसारखे आहे. बंडाच्या धामधुमीचे महत्त्वाचे साक्षीदार म्हणून माझा प्रवासची ख्याती वाढत गेली आणि ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये गेले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांसह 1857च्या बंडावर लिहिणाऱ्या इतिहास संशोधक, लेखकांनी माझा प्रवासचा विशेष उल्लेख आणि अभ्यास केलेला आहे.  अमृतलाल नागर आणि मधुकर उपाध्याय यांनी हिंदीमध्ये तर मृणालिनी शहा, मृणाल पांडे, प्रिया आडारकर, शांता गोखले यांनी या पुस्तकाचा अनुवाद इंग्रजीमध्ये केला आहे. पण माझा प्रवासवर सखोल संशोधन करुन इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे तो ट्रॅवेल्स ऑफ 1857 या नावाने सुखमणी रॉय यांनी. विष्णूभटजींचे नातू पुरुषोत्तम गोडसे हे सुखमणी यांचे आजोबा. त्यामुळे लहानपणापासून त्यांचे वरसईला जाणे-येणे होते. घरामध्ये विष्णूभटजींच्या गोष्टीही सांगितल्या जात असत. सुखमणी रॉय यांनी माझा प्रवासचा सर्वांगाने अभ्यास विचार, संदर्भ गोळा करुन हा अनुवाद केला आहे. विष्णूभटांनी उल्लेख केलेले शास्त्रग्रंथही त्यांनी मिळवून अनुवादापुर्वी ते पडताळून पाहिले आहेत. मुंबईत पी.एन. दोशी कॉलेजमध्ये इंग्रजीविभागप्रमुखपदावरुन निवृत्त झालेल्या सुखमणी यांची वरसईला जाण्यापुर्वी मी भेट घेतली होती. विष्णूभटजींचे  विष्णूभटजींचे पूर्वज आणि वंशजही तितकेच ज्ञानी आणि व्यासंगी असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.


(माझा प्रवासचा सुखमणी रॉय यांनी केलेला अनुवाद)

विष्णूभटजींचे वडिल बाळकृष्णशास्त्री हे पेशव्यांकडे सरदार विंचूरकर यांच्याकडे नोकरीस होते, 1817 साली ते पुन्हा वरसईत येऊन स्थायिक झाले. विष्णूभटजींना एकूण दहा अपत्ये होती. त्यातील नरहरशास्त्री हे सांगलीच्या पटवर्धनांच्या शिष्यवृत्तीने मोठे पंडित झाले. मुंबईमध्ये त्यांनी दोन गीता पाठशाळाही सुरु केल्या. त्यातील गिरगावातील माधवबाग येथे काढलेली पाठशाळा आपला भाचा वैजनाथशास्त्री याला चालवायला दिली. याच वैजनाथशास्त्रींचे पुत्र पांडुरंगशास्त्री आठवले यांनी पुढे स्वाध्याय परिवाराची स्थापना केली. दुसरी पिकेट रोडची पाठशाळा नरहरशास्त्री व त्यांचे पुत्र पुरुषोत्तम शास्त्री चालवू लागले. हे दोघेही वेदशास्त्रसंपन्न आणि विविध विषयांचा सखोल अभ्यास केलेले होते. त्यानंतर हा वारसा पुरुषोत्तमशास्त्री यांचे पुत्र दामोदरशास्त्री यांनी चालवला. दामोदरशास्त्री यांचे बंधू मधुसुदनशास्त्री हे अमेरिकेतील सहा महत्त्वाच्या पॉलिमर शास्त्रज्ञांमध्ये गणले जातात, आजही ते तेथे संस्कृत व योगसूत्रांच्या अध्यापनाचे काम करतात.

मध्यंतरी एकदा गणेशोत्सवामध्ये गिरगावच्या केशवजी नाईक चाळीमध्ये जाणं झालं होतं. या चाळीतील गणेशोत्सवाची 125 वर्षांची परंपरा आहे. नरहरशास्त्रींचे इथे दीर्घकाळ वास्तव्य होते. पुढेही त्यांच्या पिढ्या येथेच राहिल्या. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 1901 सालच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये एका सार्वजनिक सभेसाठी आले होते. त्यावेळेस मुंबईतील प्रमुख गणपती मंडळांनी त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. त्या आमंत्रण विनंतीनुसार लोकमान्यांनी या मंडळांना भेटी दिल्या. त्या भेटींची सुरुवात त्यांनी केशवजी नाईक चाळीपासून केली. 'मुंबईचा गणपत्युत्सव' या नावाने याभेटीचे वर्णन केसरीमध्ये प्रकाशित झाले होते. "गणेशोत्सव व्याख्यानमालेत झालेले पहिले व्याख्यान येथील केशवजी नाईकाच्या चाळींतील होय. व्य़ाख्यानकार वे. नरहरशास्त्री गोडसे असून अध्यक्षस्थानी ना. टिळक विराजमान झाले होते. ना. टिळक ह्या गणेशोत्सवात कोठे तरी व्याख्यान देतील किंवा अध्यक्ष होतील हे येथील लोक आधीच जाणून असल्यामुळे केशवजी नाईकाच्या चाळीत हजारों लोक जमले होते. व्याख्याते रा. गोडसे यांचा "गृहस्थाश्रम" हा विषय असून त्यावर त्यांनी पाऊण तासावर सुरस भाषण केले. आपली सर्व मदार शास्त्रीबोवांनी ब्रह्मचर्यावर ठेवली होती. शास्रीबोवांचे भाषण झाल्यावर ना. टिळकांनी गृहस्थाश्रमाची महती सांगून राष्ट्रीयदृष्टीने त्याचा विचार केला व सभेचे काम आटोपले" असा वृत्तांत छापून आला होता. मुंबईमध्ये आल्यावर विष्णूभट यांचे केशवजी नाईक चाळीतच राहाणे होत असावे.
2001 साली टिळकांच्या भेटीला 100 वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ तशीच भेट आयोजित करण्यात आली होती. लोकमान्य टिळकांची हुबेहुब व्यक्तीरेखा साकारणाऱ्या व्यक्तीची मुख्य रस्त्यापासून मंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. बळवंतरावांचा विजय असो अशा घोषणाही तेव्हा देण्यात आल्या. विशेष म्हणजे नरहरशास्त्रींचे नातू दामोदरशास्त्री गोडसे यांचे यावेळेस व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

 

(बाळगंगेच्या पात्रातील रांजणकुंडे)
सुखमणी रॉय यांनी सांगितलेली गोडसे कुटुंबाची विद्वान परंपरा त्यांच्या घरासमोर आठवल्यावर त्यामध्ये थोडा वेळ गेला. मग गावातीलच माझा प्रवास नावाचे वाचनालय पाहून बाळगंगेवर गेलो. बाळगंगेच्या वेगवान प्रवाहाने तिच्या पात्रामध्ये विविध प्रकारची शिल्पे कोरली आहेत. मोठमोठी रांजणकुंडे, प्रवाहामुळे तासल्या गेलल्या दगडांवर नक्षी तयार झाली आहे. रांजणकुंडे पाहून आता वेळ होती परत निघण्याची. पेणच्या दिशेने जाणाऱ्या वडाप रिक्षामध्ये बसलो. सहप्रवाशांबरोबर बोलताना न राहवून पुन्हा धरणाचा विषय काढला. ते म्हणाले आता गाव उठणारच. वरसईबरोबर छोटा गागोदे जाणार. विनोबांच्या गागोद्यातल्या जमिनी जाणार पण गाव राहणार. विस्थापन कधीही होऊ शकतं. पुढच्या वर्षी. चार वर्षांनी, किंवा पाच,सहा वर्षांनी कधीही... गोडसे भटजी, इतिहासाचार्य राजवाडे, भारताचार्य वैद्य यांचे जन्मस्थान पुसले जाणार म्हणून मला येणारा इतिहासाचा कढ बाळगंगेच्या लोंढ्यात थोडाच टिकणार आहे ?
(विशेष आभारः सुखमणी रॉय- मुंबई, वासुदेव गोडसे- डोंबिवली, ओंकार ओक-पुणे)
संदर्भ आणि अधिक वाचनासाठीः
1) माझा प्रवास, 1857च्या बंडाची हकिकत- विष्णूभट गोडसे- प्रतिभा प्रकाशन
2)ट्रॅवेल्स ऑफ 1857-अ ट्रान्सलेशन ऑफ विष्णूभटजी गोडसेज माझा प्रवास- सुखमणी रॉय- रोहन प्रकाशन
3)अॅडव्हेंचर्स ऑफ अ ब्राहमिन प्रिस्ट-विष्णूभट गोडसे- प्रिया आडारकर, शांता गोखले- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
4) झाशीची राणी लक्ष्मीबाई- प्रतिभा रानडे-राजहंस प्रकाशन
5) द रानी ऑफ झांसी- डी. व्ही. ताम्हणकर- रुपा पब्लिकेशन्स
6) इन द कोर्ट ऑफ द रानी ऑफ झांसी अॅंड अदर ट्रॅवल्स इन इंडिया- जॉन लॅंग- स्पीकिंग टायगर पब्लिकेशन्स

Web Title: My visit to the home of Vishnubhat Godse, author of Marathi book Majha Pravas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.