जिंदगी कितनी बड़ीऽऽ होनी चाहिये ?

By सचिन जवळकोटे | Published: September 1, 2017 05:37 PM2017-09-01T17:37:49+5:302017-09-01T17:41:56+5:30

‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना सारी भौतिक सुखं ओंजळीत घेऊन समोर सुहास्य वदनानं उभारलेल्या लक्ष्मीचा चेहरा बहुतांश मंडळींच्या डोळ्यांसमोरून तरळतो.

How big should life be? | जिंदगी कितनी बड़ीऽऽ होनी चाहिये ?

जिंदगी कितनी बड़ीऽऽ होनी चाहिये ?

Next
ठळक मुद्दे‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’ ‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’

‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना सारी भौतिक सुखं ओंजळीत घेऊन समोर सुहास्य वदनानं उभारलेल्या लक्ष्मीचा चेहरा बहुतांश मंडळींच्या डोळ्यांसमोरून तरळतो. मात्र, जगण्याच्या या सरळसोट मानसिकतेला धक्का देणारी एक आजीबाई मला नुकतीच भेटली. खरंतर ही आजी नव्हे. पणजीही नव्हेच. तिला खापर पणजीच म्हटलं तरी चाललं असतं.. कारण तिचं वय म्हणे जवळपास एकशे सोळा वर्षे. होय.. दचकू नका. एकावर एक अन् पुढं सहा. तब्बल एकशे सोळा.

नाव : अनुसयाबाई बाबूराव सोनवणे. मुक्काम पोस्ट : मरळी. कऱ्हाड तालुक्यातलं ‘पाल’ गाव खंडोबा देवासाठी प्रसिद्ध. ‘पालीचा खंडोबा’ म्हणूनच ओळखला जातो इथला सारा परिसर. याच पालीला वळसा घालून पुढे गेलं की लागतं छोटंसं मरळी. सह्याद्री पर्वतरांगांच्या साक्षीनं दऱ्या-खोऱ्यात वसलेलं टुमदार गाव.. अन् याच गावालगतच्या वस्तीत ही वयोवृद्ध आजी राहते. तिचा परिवारही तसा भलताच दांडगा. तब्बल पाच मुलं अन् दोन मुली. त्यातल्या दोन मुलांचं तर वृद्धापकाळामुळे निधनही झालेलं. मात्र, शंभरी ओलांडल्यानंतरही ठणठणीत असणारी ही आजी आता ‘नातवांच्या नातवंडांचा’ चेहरा बघायला आसुसलीय. 

आजी आजही व्यवस्थित चालते. बोलते. फिरते. कानाला थोडसं कमी ऐकू येत असलं तरी आवाज मात्र अजूनही खणखणीत. खरंतर, तिचं परफेक्ट वय कुणालाच माहीत नाही. मात्र तिच्या मुलांनीच आता जवळपास ऐंशी ओलांडलीय, त्यामुळे वयाचा आकडा एकशे सोळा-सतरा वर्षे धरून चाललं तर तिचा जन्म एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी किंवा विसाव्या शतकाच्या आरंभी झाला असावा.

वयानुरुप शरीरातले हार्मोन्स बदलत गेल्यानं आजीच्या चेहऱ्यावर थोड्याफार प्रमाणात पांढऱ्या दाढीमिशा प्रकटलेल्या. सुरकुत्यांच्या जंजाळात गोरापान चेहरा पुरता लपलेला. हात थरथरत असला तरी अजून जगण्याच्या जिद्दीतला कणखरपणा शब्दा-शब्दातून जाणवणारा. 

बोलता-बोलता मी तिला सहज विचारलं, ‘तुम्ही म्हणे आजीऽऽ तुम्ही म्हणे गेल्याच्या गेल्या शतकात जन्मलात.. खरंय का ?’ हे ऐकताच समोरून ताडकन् उत्तर आलं, ’.. म्हंजी ? म्या कोन्च्या शतकामंदी मरावं, अशी तुमची इच्चा हाय ?’  

आजी तशी हुशार. स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिसिंह नाना पाटलांनी उभारलेल्या चळवळीची तिला आजही चांगलीच आठवण. इंग्रजांच्या चलनावरचा ‘बिगर पगडीवाला’ तिला थोडासा आठवतो. स्वातंत्र्यानंतरच्या नोटेवरचा   ‘कोटवाला’ही तिला लक्षात राहतो. मात्र, बरेच संदर्भ संदिग्ध. न समजणारे.. म्हणूनच तिच्या एवढ्या मोठ्याऽऽ जिंदगानीतल्या चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती हळूच काढून घेताना मीही बुचकळ्यात पडलेलो.

कुणाचाही आधार न घेता वस्तीभर फिरणारी ही आजी व्यवहारातल्या चार चांगल्या गोष्टी सांगते, तेव्हा सारेच मान हलवून तिचं ऐकतात. आजीचा एक मुलगा पालीच्या खंडोबा देवस्थानमध्ये ट्रस्टी. ‘मानाचा रखवालदार’ म्हणून समाजात आजही आदर. धारदार नाकाखाली झुपकेदार मिशा अन् वरच्या भव्य भाळावर पिवळाजर्द भंडारा. या रुपात गजानन सोनवणे यांना पाहताना शिवकालीन रांगड्या मावळ्यांचं व्यक्तिमत्त्वच क्षणभर डोळ्यासमोर तरळलं. मोठ्या कौतुकानं मिशा पिळत गजानन सांगत होते, ‘आमची आय आजबी लईऽऽ खणखणीत. तिला जिंदगीमंदी दवा-पानी मंजी काय म्हैत नाय.’

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत या आजीला कसलाच आजार झालेला नाही. केवळ पोट साफ होण्याची एखादी गोळी वगळता आपण कसलं औषध आजपावेतो घेतलं नाही,’ असं मोठ्या कौतुकानं सांगणारी आजी डॉक्टरांना मात्र भयंकर घाबरते. एकशे सोळा वर्षांच्या कारकिर्दीत तिनं कधी दवाखान्याची पायरी चढली नाही की डॉक्टर कधी तिच्या घराचा उंबरा ओलांडून आत आले नाहीत. ‘लग्न झालं तेव्हा खायलाही नीट मिळत नव्हतं; पण पोरं कमावती झाल्यानंतर चांगलं-चुंगलं खायला मिळू लागलं,’ हे सांगताना सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वीची उपासमारही तिच्या लुकलुकत्या नजरेत कुठंतरी पाहावयास मिळाली.. पण बोलण्यात ना कुठे खंत ना कुठे वेदना.

जगण्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या जिगरबाज आजीला मनापासून सलाम करत मी तिथून निघालो.. कारण ‘किती जगावं?’ याबरोबरच ‘कसं जगावं?’ याचं गुपितही तिनं अगदी सहज बोलता-बोलता सांगून टाकलं होतं.

( लेखक 'लोकमत'च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

Web Title: How big should life be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.