- डॉ. गणेश मोहिते

शहर सोडून गाव जवळ केलं तेव्हा जवळ आलेली ‘दिवाळी’ दूर गेल्याचा भास झाला. शहरात जाणवत होतं दिवाळीचं अस्तित्व. माणसांच्या गर्दीनं फुलून गेलेल्या रंगीबेरंगी बाजारपेठा, ओसंडून वाहणारा नागरी माणसांचा उत्साह, घरांची रंगरंगोटी, माणसांच्या चेह-यावर नसणारे काळजीचे ढग. कुणाला बोनस, कुणाला सातव्या वेतन आयोगाची घोषणा, कुणाकडं बाजारातल्या नफ्याची आवक, यामुळं फुलून येतात माणसं महानगरात. बाजारही गजबजतो; सुवासिक अत्तरांपासून ते ब्रँडेड फराळांपर्यंत. बौद्धिक फराळांचीही खास सोय. ‘दिवाळी-पहाट’च्या मैफली, काव्य गायनाचे कार्यक्रम, दिवाळी अंकाची रेलचेल, नटनट्यांचे शो... चॅनल सर्फिंग करावं व रिमोटच्या बटणावर सर्व जग यावं. तसं सर्व काही महानगरातील माणसांच्या दिमतीला. या मंतरलेल्या वातावरणानं फटाक्यांच्या ‘धुरा’तही तिथं प्रसन्न असते लक्ष्मी.

गावाची शीव ओलांडली तशी माणसं कामधंद्याला धावताना दिसली. दोन दिवसांवर दिवाळी असतानाही घरांना जाडजूड कुलपं पाहिली तेव्हा एकाला हटकलं तर, ‘तुमचं काय मास्तर? महिन्याला ‘खळं’ होतंय तुमचं. तुमच्यासारखं थोडीच दिवाळी आली म्हणून आम्हाला घरी बसता येतंय. एक तर हंगामाच्या सुरुवातीला दोन महिन्यांचं ‘बखाड’ पाहिलं. त्यानं पिकांचं कंबरडं मोडलं. आता कसंबसं थोडंफार पदरात पडायची येळ आली, तर पाऊस लांबला. झाडालाच कापसाच्या वाती लोंबल्या. पहिलं बोंड बोंड वेचून उन्हात टाकावं लागतं, तर कुठं ‘दिवाळी’ अंगी लागल आमच्या. त्यात कुंटलभर कापूस घालून सण साजरा करावा म्हटलं, तर यंदा व्यापा-यांनी भाव पार मातीत घातला. वरून सरकारी धोरणं अशी; आधी मालाचा भाव पाडून आम्हाला कर्जबाजारी करून फाशी घ्यायला भाग पाडायचं अन् मेल्यावर आमच्या मयताला लाख रुपये टेकवून मोकळं व्हायचं. सगळं थोतांड नुसतं. वरून याच पुढा-यांनी रातन्दिस शेतक-यांच्या नावानं मतांसाठी गळे काढायचे. आतासुद्धा मोठ्ठी कर्जमाफी केल्याचा नुसता डंका पिटू राह्यले सरकारातले लोक; पण पदरात पडल तवा खरं, लबाडाचं आवतन दुसरं काय? आमचं जिणंच वंगाळ. त्यांचं काय ‘वाळलं जळतं अन् ओलं पण मास्तर...’ बरं जाऊ द्या! तुमची दिवाळी काय म्हणतेय? या वाक्यानं भानावर आलो. 

सकाळी गावात फेरफटका मारला तर ‘कोठा’ आला म्हणून कोणीतरी पारावर बातमी आणली. ‘कोठा’ काय तर स्वस्त धान्य दुकानात माल येणं. दिवाळीच्या तोंडावर ‘कोठा’ आला म्हणजे ‘भुस्काट’ झालेली साखर, पिवळ्या पाकिटातलं पाम तेल, गहू, तांदूळ, कधीतरी हरभरा डाळ व रॉकेल या वस्तू दिवाळीला येतात; अन्यथा इतर वेळी फक्त गहू, तांदूळ, बाकी सारा अंधारच असतो विकायला. त्यात गावातली चार-दोन घरं अपवाद केली तर अख्खं गाव हातात पांढरं, पिवळं, केसरी रंगाचं कार्ड घेऊन रांगेत दिसल. ज्याच्या पदरात दुकानदार ‘माप’ टाकतो त्याला तिथंच ‘दिवाळी’ असल्याचा भास; अन्यथा रांगेतल्या कोणत्या माणसाजवळ येताच ‘कोटा’ थांबून ‘माल’ संपला, असा आवाज येईल याचा नेम नाही. रांगेतली ‘राधाक्का’ किलकिल्या डोळ्यानं पिशवीत पडणाºया मापाकडं पाहून मनातल्या मनात पुटपुटली. ‘माप’ मारण्याचं ‘पाप’ करणा-या औलादींना गरिबांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाय, असं काहीबाही बोलून पायली-दोन पायली गहू आणि लिटरभर घासलेटची ती वाटेकरी झाली. तेव्हा तिच्याकडं लक्ष गेलं. ‘दिवाळी’ असो वा आणखी काही, भुकेसाठीचा तिचा संघर्ष तसा बारमाही. लग्न झालं, पहिल्याच महिन्यात कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. म्हणून ती माहेराच्या आश्रयाला आली, तर तिला रक्ताची ‘नाती’ किती फोल असतात याची जाणीव झाली. मग तिला कायमची ‘ऊब’ मिळाली ती कुडाच्या छप्पराची. मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यासाठीचा तिचा संघर्ष तसा सनातन.

पंचमी असो दिवाळी तिच्यावर पोटाची ‘संक्रांत’ कायमच आरूढ. नव-याच्या सातबा-यात महिनाभरात ती येऊ शकली नव्हती. कारण सासरी ठरली होती पांढ-या पायाची. ‘माप’ ओलंडलं त्याच महिन्यात नवरा गेला हे पायगुणाचं अंधश्रद्धाळू ‘पातक’ तिच्या माथ्यावर मरेपर्यंत. इकडं माहेरी बोहल्यावर चढली त्याक्षणी ती झाली होती पाहुणी. शेवटी सरकारी दप्तरी ठरली निराधार. मग दारिद्र्यरेषेच्या, कधी घरकुलाच्या यादीत यावं तिचं नाव म्हणून सग्या-सोय-यांनीच ओरबडले तिच्या घामाचे दाम. अख्ख्या आयुष्यात काळोख पसरलेल्या चेह-यावर आता कोणतीच ‘दिवाळी’ आणू शकत नाही उजेड. कुडाच्या ‘भिंती’ आणि तुळशीसमोर तेवणा-या ‘पणती’ पुरतंच काय ते असतं अस्तित्व तिच्यासाठी दिवाळीतल्या उजेडाचं. खापराच्या दोन पणत्या कुडाच्या छपरावर मिणमिणत्या प्रकाशाला चिमूटभर तेलाची धास्ती दाखवीत रात्रभरासाठी तेवत राहतात तिच्या आनंदासाठी. उजेडाच्या वारसदारांच्या घरावरच्या डोळे दिपवणा-या रोषणाईनं तिला होतो त्रास. आपल्या अवतीभोवतीचा ‘अंधार’ दूर गेला, तर इतरांचा उसना ‘प्रकाश’ असतो मुळी घटकाभरचा ‘पाहुणा’ याचं असतं तिला भान...!

अशी कैक माणसं या व्यवस्थेत खितपत पडलीत अंधारात. त्यांना आता उजेडाचीच जास्त भीती वाटते या देशात. यवतमाळच्या विषबाधा झालेल्या तेवीस शेतक-यांच्या कुटुंबांपासून ते गेल्या दोन दशकांत गळ्याला फास लावून ‘बळी’ गेलेल्या लाखो शेतकºयांच्या कुटुंबांपर्यंत. गोरखपूरपासून थेट नाशिकपर्यंत देशात विविध इस्पितळात अनास्थेचे ‘बळी’ ठरलेल्या बालकांच्या कुटुंबांपर्यंत. वेळेवर रेशन मिळालं नाही म्हणून ‘भूकबळी’ गेलेल्या झारखंडमधील संतोषीकुमारीपासून ते मेळघाटातल्या असंख्य कुपोषित बालकांपर्यंत. पोटाच्या खळगीसाठी ‘गाव’ सोडून शहरात झोपड्यात दीडपत्र्याच्या खोल्यांत राहून किड्या-मुंग्यासारखं आयुष्य जगणा-या माणसांपासून ते अकुशल कामगारांपर्यंत दारिद्र्य, गरिबीमुळं शाळांची पायरी न चढलेल्या असंख्य बालकांपासून ते अनेक पदव्या प्राप्त करून त्याच पदव्यांचा गुंडाळा करून नोकरीच्या शोधात फिरणाºया बेकारांच्या फौजांपर्यंत. गावोगावी फिरणा-या पालावरच्या भटक्या माणसांपासून ते गावकुसाबाहेरच्या असंख्य वस्त्यांपर्यंत. पसरलाय जीवघेणा ‘काळोख’ जो भुलत नाही अभासी महासत्तेच्या स्वप्नाला.

(लेखक बीड येथील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.