बासरी म्हणजे कृष्णाचे वाद्य, असे ते सांगतात. लहानपणापासूनच त्यांनी बासरीवादनाचा छंद जोपासला. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे एकलव्याने धनुर्विद्या आत्मसात केली त्याप्रमाणे स्वत:च स्वत:चा गुरू होऊन ते बासरीवादन शिकले. एकलव्याने ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांच्या मूर्तीला समोर ठेवून साधना केली तशी साधना भगवान श्रीकृष्णाचा फोटो समोर ठेवून त्यांनी आपली कला वृद्धिंगत केली म्हणून बासरीवादनातील एकलव्य, असे त्यांना म्हणणे सयुक्तिक ठरेल. महाराष्ट्रातील अनेक कार्यक्रमांतून हजेरी लावून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे संगीतरत्न बाबूराव दुधगावकर वयाच्या ८२ व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवतील अशा उत्साहाने बासरीवादन करतात. तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त झालेल्या दुधगावकर यांचा जन्म जिंतूर तालुक्यातील दूधगाव येथे ५ नोव्हेंबर १९३६ रोजी झाला. सध्या ते  औरंगाबाद येथे स्थायिक आहेत.

शासकीय सेवेत असतानासुद्धा त्यांनी आपल्या कलेकडे थोडेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. केवळ बासरीवादनच नव्हे, तर हार्मोनियमवादन, गायन, कवी आणि विनोदी, असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेले आहेत. गावी, परगावी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास खर्च न घेता विनामूल्य निष्काम बासरीवादनाची सेवा ते देतात. कोणी खर्च द्यायला लागले तर म्हणतात, मला पैसा-अडका काही नको, मला फक्त तुमचे आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या. महसूल खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बासरीवादन स्पर्धेत बाबूराव दूधगावकर यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपल्या कलेची ओळख राज्याला करून दिली. वयाची ८१ वर्षे पूर्ण केलेल्या या हरहुन्नरी कलाकाराचा एकही दात हलत नाही. म्हातारपणाच्या खुणा त्यांच्या चेह-यावर पाहावयास मिळत नाहीत. त्यांच्या या चिरतारुण्याचे रहस्य ते आपल्या बासरीवादनाच्या छंदात आहे, असे  अभिमानाने सांगतात. 

संगीत आणि आरोग्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, बासरीवादन करीत असताना प्रसंगानुरूप रागरागिणीचा सुरेख संगम करून आपले कौशल्य ते प्रगट करतात. त्यामध्ये नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग, गवळण, स्वागतगीत इत्यादी सादर करतात. ते सांगतात सध्या कला विकली जाते; परंतु हे योग्य नाही. कलाकार हा कलेने मोठा होतो, मानधनाने नाही. आपली कला समाजात पोहोचली पाहिजे. तेव्हा मानधनाची अपेक्षा न ठेवता कलाकाराने सेवा केली पाहिजे, असे त्यांना वाटते. बासरीचा सूर अनेक संगीतप्रेमींना भारावून टाकतो. आकर्षित करतो. त्यामुळे रसिकांना नवी ऊर्जा लाभते. आयुष्य हे बासरी आहे. आपलेच ओठ, आपलाच श्वास स्वरात लावता आला पाहिजे. बाबूरावांच्या या संगीतसेवेला सलाम.