- मयूर देवकर 

नाटक सुरू होऊन पाच मिनिटेच झाले की, आयोजकांनी मंचावर येऊन नाटक बंद करा म्हणून सांगितले. पडदा खाली येण्यास सुरुवात झाली. कलाकारांना विंगेतच थांबवलं. शिव्या दिल्या. गुजरात येथे सुरू असणा-या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवातील हा प्रकार. ‘हे नाटकच नाही, असे कुठे नाटक असते का?’ असं म्हणून आयोजकांनी नाटक सुरू ठेवण्यास मनाई केली. एवढी तयारी करून, इतक्या दूर आल्यावर अशा प्रकारे वागणूक मिळत असल्यामुळे विद्यार्थी कलावंत बिथरले होते. नाटकाचा दिग्दर्शक रावबा गजमलसाठी हे तर सर्व अनपेक्षितच होते. त्याचे ‘भक्ष्यक’ नाटक महाराष्ट्रातील अनेक महोत्सवात अव्वल आलेलं, समीक्षकांनी डोक्यावर घेतलेलं अन् येथे मात्र ‘हे नाटकच नाही’ असं म्हटलं जाऊ लागलं. 

मग खरं नाटक असतं तरी काय?
नाटक अमुक-अमुक पद्धतीचं असावं असं मी मानतच नाही. परंपरेने चालत आलेले आहे म्हणून किंवा शास्त्राच्या नावाखाली नाटकाला एखाद्या साच्यात कोंडून ठेवणे कलेच्या सर्वांगीण विकासाला मारक आहे, असं रावबा म्हणतो. ज्याला आपण कोरी पाटी म्हणतो, तसा तो या क्षेत्रात दाखल झाला होता. नाटकाचा ना गंध, ना परिचय. अगदी पडदा कसा उघडायचा इथपासून त्याची सुरुवात झालेली. त्यामुळे रुढीबद्ध नाटक कसं करतात हे त्याच्या गावी नाही.
त्याच्या नाटकात ना प्रॉपर्टी, ना सेट, ना आकर्षक वेशभूषा, ना हशा पिकविणारे संवाद, ना अलंकारिक भाषा. त्याचे विषय काय तर ग्रामीण भागातील बेरोजगारीमुळे स्मशानातील सोनं चोरणारा तरुण, जंगलतोडीमुळे निर्माण झालेला मनुष्य व हिंस्र श्वापदांचा संघर्ष, धार्मिक तेढीतून होणा-या दंगलीपूर्वीचे वातावरण. ‘भक्ष्यक’, ‘भोंगे’, ‘स्मशानातील सोनं’, ‘बर्बाद्या’ अशा सर्व एकांकिकांमधून त्याने विषयांतील वैविध्यता आणि सादरीकरणातील प्रयोगशीलता सिद्ध केली आहे. सादरीकरणात ‘किमानतत्त्ववादा’चा (मिनिमलिज्म) वापर करून कमीत कमी नेपथ्यात अधिक परिणामकारकता साधण्यात तो माहीर. ‘विद्यार्थिदशेत नाटक करीत असताना पैशांची नेहमीच अडचण असते. त्यामुळे कमीत कमी खर्चात जबरदस्त नाट्य कसं उभं करता येईल यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या लढवाव्या लागतात, असे तो सांगतो. म्हणून तर ‘स्मशानातील सोनं’मध्ये ना त्याने स्मशानाचा, ना घराचा सेट उभारला. केवळ संगीत, प्रकाश आणि अभिनयातून अंगावर काटे आणणारी एकांकिका सादर केली.

‘भक्ष्यक’मधील वाघाला तर वेशभूषाही नाही.
थेट विषयाला हात घालून जे सांगायचे ते थेट मांडण्याची त्याची शैली. पुणे-मुंबईच्या नाट्यसंस्कृतीचा प्रभाव असणा-यांना ते रुचेलच असं नाही. कारण रावबाच्या गोष्टी या अस्सल मराठवाड्यातील असतात. त्यातील दाहकता हादरून सोडणारी असते. ‘आपल्या अवतीभोवती एवढे विषय आहेत जे रंगभूमीवर अद्याप आलेले नाहीत. मी जे पाहतो, जे वास्तव अवतीभोवती आहे, तेच नाटकात मांडण्याचा प्रयत्न मी करतो. मला जेवढे कळते तेच मी मांडतो. त्याला कोणी नाटक मानत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे तो स्पष्ट करतो. 

आज त्याचे यश पाहून वाटणार नाही की, ही प्रगती त्याने केवळ मागच्या पाच वर्षांत केलेली आहे. गेवराई तालुक्यातील किनगाव हे त्याचे मूळ गाव. रावसाहेब गजमल असे त्याचे नाव. पण सर्वजण त्याला रावबा म्हणूनच हाक मारतात. घरी आई-वडील, एक भाऊ आणि बहीण असे पाच जणांचे कुटुंब. घरातील लहान असल्यामुळे लाडका.  गेवराईच्या आर. बी. अट्टल महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. एस्सी. केली. तोपर्यंत नाट्यज्वर चढलेला नव्हता. पदवीची परीक्षा दिल्यानंतर त्याने अस्लम शेख या मित्रासोबत पुणे गाठलं. तेथे हॉटेल्समध्ये हाऊस कीपिंग मॅनेजर म्हणून काम केलं. सुट्यांमध्ये पैसे कमावणे हा त्यामागचा उद्देश. पुण्यातच नाटकाचे शिक्षण मिळते असे कळाले. तोपर्यंत ललित कला केंद्राचे प्रवेश बंद झालेले होते. तेथून औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाची माहिती मिळाली. त्याप्रमाणे २०१२ साली त्याने औरंगाबाद गाठलं.

प्रवेश घेतल्यावर पहिल्याच दिवशी त्याची निराशा झाली. नाटकात अभिनय करण्याच्या जुजबी अपेक्षेने आलेल्या रावबासाठी भरतमुनींचे नाट्यशास्त्र समजून घेणे सुरुवातीला जड गेले. ‘नाटक आणि एकांकिकेतील फरक काय, पडदा कसा उचलतात, नेपथ्य काय, अशा मूळ संकल्पना मला येथे येण्यापूर्वी माहीत नव्हत्या. त्यामुळे नाटकातील तंत्र माहीत करून घेण्यास सुरुवात केली, असे तो सांगतो. त्यासाठी कॉन्स्टॅन्टिन स्टॅनिस्लेव्हस्की, व्हेसेव्होलोद मेयरहोल्ड, बर्टोल्ट बे्रट यासारख्या जगप्रसिद्ध नाट्यलेखकांची अनुवादित पुस्तके त्याने वाचून काढली. त्यांच्या विचारातून रंगभूमीशी ओळख वाढविली. हिंदी-मराठी नाटकं वाचली-पाहिली. 

विद्यापीठात ‘अश्वत्थामा’ एकांकिकेची तालीम सुरू असताना तो केवळ निरीक्षण करायचा. शिक्षकांच्या सूचना लक्षपूर्वक ऐकायचा. एकेदिवशी प्रा. अशोक बंडगर यांच्यासमोर नाटकातील संवाद बोलून दाखविल्यावर त्यांनी लगेच त्याला भूमिका दिली आणि त्याचा रंगमंचावर प्रवेश झाला. संपूर्ण राज्यात त्याचे प्रयोग झाले. बक्षिसे मिळाली. तो सांगतो, ‘या एकांकिकेमध्ये काम करणारे बहुतांश सर्वजण आता या क्षेत्रात स्थिरावलेले आहेत.’
प्रा. बापू घोक्षे लिखित ‘यातना उत्सव’ एकांकिकेद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवले. एक आव्हानात्मक एकांकिाका म्हणून ती ओळखली जाते. अनेकांनी ती न करण्याचा त्यांना सल्ला दिला. पण, आव्हान स्वीकारण्याचे त्याने ठरविले होते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत विभागातून या एकांकिकेने तिसरे पारितोषिक पटकावले. मग २०१४ साली ‘स्मशानातील सोनं’ ही अण्णाभाऊ साठेंची कथा घेऊन त्याने प्रयोगशील एकांकिका बसविली. अक्षर करंडकमध्ये अभिनय ते दिग्दर्शनापर्यंत पुरस्कार पटकावून एकांकिक ा दुसºया क्र मांकावर राहिली. ‘एनएसडी’च्या परीक्षकांना ‘अस्सल नाटक पाहण्याची संधी मिळाली’ अशी पावती देऊन त्यांच्या नाट्यशैलीचा गौरव केला. अश्विनी एकबोटे यांनी त्याच्या नाटकातील नावीन्यतेची प्रशंसा करताना ते सर्वांना दाखव असं सल्ला दिला.

त्यानंतर केलेली ‘भक्ष्यक’ ही एकांकिका रावबाच्या आयुष्याला वळण देणारी ठरली. जंगलतोडीमुळे हिंस्र प्राणी गावात येऊ लागल्याने गावकºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अशाच एका वाघाच्या दहशतीखाली राहणा-या गावातील थरारक नाट्य ‘भक्ष्यक’मधून मांडले आहे. मुंबई, अहमदनगर, जळगाव, बार्शी, औरंगाबाद येथे झालेल्या महोत्सवात पहिले पारितोषिक तर ‘इंद्रधनुष्य’मध्ये विभागातून दुसरे बक्षीस मिळाले. पश्चिम विभागातून झोनल फेरीत गुजरातमध्ये हे नाटक बंद पाडण्यात आले होते. कारण काय तर काठ्या आदळल्याने स्टेज खराब होईल!  एकांकिका बंद पाडल्यामुळे खूप वाईट वाटले. मुलं तर अक्षरश: रडली, असे तो सांगतो.

या एकांकिकेने त्याच्या करिअरला उभारी दिली. मुंबई, सांगली, अकोला, सोलापूर येथील कॉलेजमधील संघांनी ती केलेली आहे. मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयाने तर त्याला ही एकांकिका बसवून देण्यासाठी निमंत्रित केले. मुंबईच्या मुलींकडून अस्सल मराठवाडी भाषेतील नाटक बसविणे कोणत्याही दिग्दर्शकासाठी मोठे आव्हान होते, पण ते त्याने पेलले. मुंबई विभागातही एकांकिका अव्वल राहिली.२०१६ साली विद्यापीठातून नाट्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर तर त्याला अनेक ठिकाणांहून नाट्यदिग्दर्शनासाठी बोलावणे येते. दरम्यान त्याने ‘कातड’ आणि ‘अलिसा’ या लघुचित्रपटांतूनही अभिनय केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्याला यंदा ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवासाठी एकांकिका दिग्दर्शित करण्यासाठी निमंत्रित केले. त्यामुळे सध्या तो ‘माणसं’ बसविण्यात व्यस्त आहे. ‘आता येथून पुढे आणखी खूप पल्ले गाठायचे आहेत, असा विश्वास तो व्यक्त करतो.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.