Eternal development | शाश्वत विकास

- अ. पां. देशपांडे

आपल्याला नेहमी लागणा-या गोष्टींचे नीट जतन करणे, ही मानवापुढील कायमची समस्या आहे. मानवाचे आयुष्य सुखाचे करणाºया गोष्टी कोणत्या, तर त्या म्हणजे जमीन नीट ठेवणे, हवेचे प्रदूषण होऊ न देणे, पाणी पुरेसे आणि स्वच्छ उपलब्ध असणे, सूर्यप्रकाश आबाधित मिळणे आणि आकाशावर आक्रमण न होऊ देणे. अरे हो, ही म्हणजे पंचमहाभूते. पृथ्वी-आप-तेज-वायू आणि आकाश. आपण तंत्रज्ञानाची कितीही प्रगती केली तरी जमीन-पाणी-हवा-सूर्य आणि आकाश यांचे तंत्र योग्य नसेल तर मानवी प्रगती ठप्प होते. गेला महिनाभर दिल्लीची काय स्थिती झाली, हे आपण पाहतोच आहोत. हे फक्त यंदाच झाले नसून गेली कित्येक वर्षे ही गोष्ट नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत घडत असते. नोव्हेंबरमध्ये दिल्ली आणि उत्तर भारतात हिवाळा सुरू होत असल्याने दिल्लीच्या परिसरात धुके असते. अशाच वेळी पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशात शेतात पीक येऊन त्याची कापणी झाल्यावर उरलेला शेतीतील कचरा शेतकरी जाळून टाकतात. त्याचा धूर आसमंतात पसरतो आणि तो हिवाळ्याच्या धुक्यात मिसळून त्याचे धुके + धूर = धुरके तयार होऊन त्यामुळे लोकांचा श्वास घुसमटतो. त्यात पुन्हा रस्त्यावरील गाड्यांचा धूर मिसळून धुरके अधिक गडद होते आणि लोकांची घुसमट वाढते. ही गोष्ट फक्त दिल्लीपुरतीच मर्यादित नसून, आज शांघाय, बीजिंगसारख्या जगातल्या अनेक शहरांत हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतातल्या सर्व नद्यांचे पाणी सांडपाण्यामुळे दूषित होऊन ते पिण्याच्या लायकीचे राहिले नाही. शेती करताना जास्तीत जास्त रासायनिक खते आणि कीटकनाशके घातल्याने जमिनीतून हवे तेवढे पीक निघत नाही. कारण ती अनुत्पादक झाली आहे. काही ठिकाणी ऊस जास्त पिकवण्याच्या निमित्ताने ती मीठफुटी होऊन परत अनुत्पादक झाली आहे. आपल्याकडे कोल्हापूर-सांगली या भागात हे चित्र बघायला मिळते. रेफ्रिजरेटरसाठी वापरल्या जाणाºया सीएफसीसारख्या रसायनांमुळे ओझोन थराला भोक पडल्याने त्यातून डोकावणाºया अतिनील किरणांमुळे लोकांना कातडीचा कर्करोग होऊ लागला आहे.
हवामान बदल व्हायला हल्लीची राहणी, वाढते औद्योगीकरण, वाढती गाड्यांची संख्या, वाढती लोकसंख्या या गोष्टी कारणीभूत होत आहेत. उद्योगधंद्यातून बाहेर पडणारे वायू आणि गाड्यांच्या धुराड्यातून बाहेर पडणारे वायू यामुळे हवा तर प्रदूषित होतेच; पण त्यातील विविध वायूंमुळे वाईट परिणाम होत आहेत. यात पृथ्वी एकाप्रकारे बंदिस्त होऊन त्यात अडकलेली उष्णता बाहेर न पडल्याने येथील वातावरणाचे तापमान वाढत राहिले आहे. यामुळे ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळू लागले आहेत. परिणामी, समुद्र्रातील पाण्याची उंची वाढू लागल्याने समुद्र्राकाठच्या जगभरच्या गावांना पाण्यात बुडून जाण्याचा धोका निर्माण होऊ लागला आहे. उद्योगधंद्याच्या धुराड्यातून बाहेर पडणा-या आम्लांमुळे आम्लवर्षा होऊ लागली आहे. मुंबईच्या किनाºयापाशी आॅक्टोबर महिन्यात एका तेलवाहू जहाजाला लागलेल्या आगीमुळे कित्येक दिवस काळा धूर वातावरणात पसरत होता. त्यानंतर आठ दिवसांनी उरणला काळा पाऊस पडला होता. आता निसर्गही रोखीत व्यवहार करू लागला आहे. तुम्ही काळा सोडला, घ्या काळा पाऊस, तुम्ही वातावरणात आम्ल सोडले, घ्या आम्लवर्षा. ५० वर्षांपूर्वी कोलकाताजवळ नरसाळ्याच्या आकाराचा ढग तयार होऊन त्याचे एक टोक समुद्र्राजवळ आले आणि ढगात निर्माण झालेल्या पोकळीमुळे माशांसकट समुद्र्राचे पाणी ढगात ओढले गेले. दुसºया दिवशी कोलकाताजवळ माशांचा पाऊस पडला. तेव्हा निसर्ग आता, ‘करावे तसे भरावे’ या न्यायाने वागत आहे. शाश्वत विकासाच्या निमित्ताने आपल्याला हरितगृह परिणाम, वैश्विक किरणे, कार्बन चक्र, ओझोन वायू, आम्लवर्षा, एल निनो, एकात्मिक जलव्यवस्थापन, वर्षा जलसंचयन, जलसहभागिता, अशी एक नवी तंत्रभाषा वाचायला मिळते आहे.

औरंगाबादच्या डॉ. रंजन गर्गे यांनी अलीकडेच ‘शाश्वत विकास’ हे पुस्तक लिहिले असून, ते पंकज अ‍ॅण्ड पुष्पज्योती प्रकाशनाने छापले आहे. या पुस्तकात त्यांनी आर्थिक विकास, हवामानातील बदल, शाश्वत विकासासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा, पर्यावरणासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा, दीर्घकालीन कृती आराखडा, इतिहास घडवणारे पाणी, शाश्वत शेती, अपारंपारिक ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन जैवविविधता आणि शाश्वत विकासासाठी व्यावसायिक संज्ञापन अशा अंगाने या विषयाचा परामर्श घेतला आहे.