अजिंठा डोंगररांगेतील दुर्गराज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 05:53 PM2017-08-13T17:53:42+5:302017-08-13T17:59:02+5:30

मराठवाड्यातील दुर्गसंपत्तीविषयी लिहिताना सुरुवात केली ती कंधार, धारूर, उदगीर आणि रामगड-माहूरसारख्या महामहीम दुर्गस्थानांपासून. औरंगाबाद जिल्ह्यातील एखादा किल्ला घ्यावा, असा विचार करून जिल्ह्यात शिरले. अभ्यास करताना लक्षात आले की, दुर्गश्रेष्ठ देवगिरीला दख्खनचे प्रवेशद्वार मानले, तर जिल्ह्याची उत्तर सीमा असलेल्या अजिंठा-सातमाळा डोंगररांगा या प्रवेशद्वाराची जणू संरक्षक भिंतच. या डोंगररांगेतील किल्ले म्हणजे भरभक्कम बुरुजांची साखळी. ही साखळी दख्खन भूप्रदेशाचा अविश्रांत पहारा करीत आहे. त्यामुळे या भागांमधील किल्ल्यांची क्रमाक्रमाने दखल घेणे सयुक्तिक वाटले. तेव्हा पुढे मार्गक्रमण सुरू ठेवताना  औरंगाबाद जिल्ह्यातील पाचवा किल्ला म्हणजे अंतूर किल्ला.

Durgraj in Ajitha mountain range | अजिंठा डोंगररांगेतील दुर्गराज 

अजिंठा डोंगररांगेतील दुर्गराज 

Next

- तेजस्विनी आफळे

एका डोंगरावर वसलेल्या अंतूर किल्ल्याला नागापूर गावाहून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी मार्ग केलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या दस्तापूर आणि नागद गावातूनसुद्धा चालत किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येते. हा किल्ला पंधराव्या शतकात कुणा एका मराठा सरदाराने बांधल्याचे सांगितले जाते. परिसरातील इतर किल्ल्यांप्रमाणे अंतूर किल्ल्याच्या निर्मितीबद्दल अधिक माहिती मिळत नाही. 
नागापूरहून येताना दिसणाºया दगडी खांबावरील दिशादर्शक फारशी शिलालेख, किल्ल्याच्या तिसºया दरवाजावरील मलिक अंबरचा लेख आणि मशिदीवरील शिलालेख सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीला अहमदनगरच्या निजामशाही राज्यात किल्ला होता हे दर्शवितात. पुढे अंतूरजवळ मुगल सरदार दिलेरखान आणि मराठे यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचा उल्लेखही इतिहासात सापडतो. परिसरातील इतर किल्ल्यांसारखी अंतूरवरील मुगल आणि पुढे हैदराबादच्या निजामकाळातील अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. इ.स. १८८४ मधील औरंगाबाद गॅझेटियरमधील नोंदीमुळे मराठ्यांकडेसुद्धा किल्ल्याचा ताबा असल्याचे कळते. या नोंदीनुसार इ.स. १८२० च्या सुमारास मराठ्यांविरुद्ध शेवटच्या मोहिमेत ब्रिटिश आणि निजामाच्या संयुक्त सैन्यापुढे अंतूरच्या किल्ल्याने शरणागती पत्करली. मुगल काळापासून किल्लेदारी एका राजपूत घराण्याकडे असल्याचीही नोंद आहे.

स्थापत्य रचना
सर्व बाजूंनी डोंगराच्या नैसर्गिक उभ्या कातळामुळे या गिरिदुर्गाला भक्कम संरक्षण लाभले आहे. काही ठिकाणी हा कातळ मानवनिर्मित असावा, असेही लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी अजूनही बºयाच प्रमाणात उभी आहे. नागापूरकडून गाडी मार्गाने आले की, तिहेरी तटबंदीने अभेद्य झालेला गोलाकार बुरूज आपल्याला दिसतो. डोंगररांगेतून किल्ल्याला वेगळे करण्यासाठी खिंड खोदून त्यावर हा बुरूज बांधलेला आहे. मुख्य दरवाजाकडे जाणारी वाट या बुरजाच्या उजव्या अंगाने जाते. एकमेकांशी काटकोन साधणारे तीन दरवाजे आणि त्या अनुषंगाने वळणावळणाने जाणारा मार्ग किल्ल्याच्या संरक्षणरचनेचा भागआहेत.

किल्ल्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरूज आहे. येथे तोफा ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते. प्रवेशाचा मार्ग चढून वर आल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बंदिस्त तलाव आहे. तलावाच्या पूर्व दिशेला एक कमानीची बांधणी आहे. तलावाच्या उत्तरेला इमारतींचे अवशेष दिसतात. त्यांचे घुमटाकार छत १५-१६ व्या शतकातील निजामकालीन वास्तुशैलींशी साधर्म्य दाखवते.

किल्ल्यावरील तलावाच्या शेजारील मशीद, दर्गा व काही थडगी अशा धार्मिक इमारती आहेत. किल्ल्यात प्रवेशापूर्वी ज्या मोठ्या बुरजाला फेरी मारून आपण दरवाजाकडे मार्गस्थ होतो त्या बुरजावर जाण्यासाठी मार्गावर जाताना तळघर असलेल्या इमारतीचे अवशेष आणि एक भव्य दरवाजा पाहावयास मिळतो. दक्षिणेच्या या बुरजामध्ये पहारेकºयांसाठी देवड्या आणि एक पिराचा दर्गा आहे.

त्याकाळी किल्ल्यावरील पाण्याची गरज मोठा तलाव आणि किल्ल्याच्या डाव्या अंगाला असलेली पाण्याची टाकी भागवत असणार. अनेक इमारतींचे आणि संरक्षण रचनेचे अवशेष इतक्या मोठ्या प्रमाणावर अजूनही अंगावर बाळगून असणारा या किल्ल्याला ‘अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील दुर्गराज’ असे म्हणून नावाजले जाते.

आज पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येणाºया या किल्ल्यात अलीकडेच अनेक संवर्धन आणि दुरुस्तीची कामे हातात घेण्यात आली. त्यात बुरूज व तटबंदीची दुरुस्ती, पायवाटा बांधणी, तलावाची दुरुस्ती, दर्ग्यासमोर फरसबंदी, दगडी पटांगण ही कामे प्रामुख्याने होती. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी तळामुळे किल्लेप्रेमींची बरीच सोय झाली आहे. सरकारने किल्ल्यांचे सुनियोजित पद्धतीने संवर्धन, देखभाल करायला हवी आणि आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, हे निश्चितच; पण त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी घडलेली येथील तोफेच्या चोरीची आणि जवळच्या रानात ती तोफ अर्धी कापलेली मिळाल्याची घटना आणि किल्ल्यावर ठिकठिकाणी कोरून ठेवलेल्या प्रेमवीरांच्या कथा, प्लास्टिकचा कचरा मात्र मनात प्रश्न उभा करतात. आपल्या सांस्कृतिक ठेव्याची काळजी फक्त सरकारलाच असावी का... चांगल्या सोयी-सुविधा हव्यात हे आपल्याला कळते; पण फक्त सरकारला दोष न देता आपण सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून वागायला कधी शिकणार....? 

(लेखिका पुरातत्वज्ञ  आणि  वास्तुसंवर्धनतज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Durgraj in Ajitha mountain range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.