- तेजस्विनी आफळे

औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगरी किल्ले, तर दख्खनचे प्रवेशद्वार संरक्षित करायला उभे होतेच; पण दक्षिण मराठवाड्यातील कमी उंचीच्या बालाघाट डोंगररांगेतील टेकाडे वा उंचवट्यांतील दरीचा मोठ्या खुबीने उपयोग करून बांधलेला धारूरसारखा मिश्रदुर्ग तसेच कंधार, उदगीर, औशासारखे भूदुर्ग हे त्यांच्या स्थानवैशिष्ट्यामुळे आवश्यक ठरले. आपला या वेळचा किल्लाही याच भूदुर्गांच्या पंगतीतील एक तालेवार सेनापतीच आहे जणू. किल्ले परांडा!! परांडा किल्ल्याचे महत्त्व लक्षात घेता या किल्ल्याची माहिती एका लेखात बसणार नाही. यामुळे दोन भागांत देण्यात येत आहे. दक्षिण मराठवाड्यात दक्षिणोत्तर पसरलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्याच्या सीमेला तटून परांडा या तालुक्याच्या ठिकाणी हा किल्ला उभा आहे. इतर अनेक किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्याच्याही पहिल्या सहस्रकातील अस्तित्वाबद्दल फारशी माहिती अजूनतरी उपलब्ध नाही. परांडाचा चालुक्य काळातील एका ताम्रपटात आलेला ‘पलियांडा ४०००’ असा उल्लेख प्रशासकीय स्थानमहत्त्व दर्शवितो. विद्वान यादव मंत्री हेमाद्री याने आपल्या राजप्रशस्तीमध्ये या स्थानाचा उल्लेख ‘प्रत्यंडक’ असा केला आहे. पंधराव्या शतकात कर्तृत्ववान बहामनी वजीर महमूद गावानाने परांडा किल्ल्याबरोबरच औसा, धारूर, नळदुर्ग, धारूर किल्ल्यांची बांधणी अथवा पुनर्बांधणी केली.

बहामनींच्या विघटनानंतर परांडा किल्ला अहमदनगर निजामशहाच्या ताब्यात आला. इ.स. १५२२ मध्ये आदिलशहाने किल्ला मिळवला खरा; पण तो काही काळापुरताच. निजामाने किल्ला परत घेतला ते अगदी सतराव्या शतकात निजामशाहीच संपेपर्यंत. इ.स. १६०० मध्ये मुगल सैन्याने चांदबीबीच्या नेतृत्वाखाली अहमदनगरचा किल्ला लढवत असलेल्या निजामशाही सैन्याचा पाडाव केला. ताबडतोब मुत्सद्दी निजामशाही सरदार मलिक अंबरने मुर्तझा निजामशहा दुसरा याला गादीवर बसवून काही काळ परांडा किल्ल्यात राजधानी हलवली आणि मुगलांविरुद्ध लढा सुरूच ठेवला. पुढे ही राजधानी दौलताबादला असताना जिजाऊंचे वडील लखुजी जाधव आणि त्यांच्या भावांची हत्या निजामशाही दरबारात झाली तेव्हा शहाजीराजे परांडा किल्ल्यात वास्तव्याला होते. तेव्हा ते निजामशाही सोडून आदिलशाहीला मिळाले. पुढे निजामशाही चाकरीत परत आले तेव्हा दौलताबादच्या पाडावानंतरही त्यांनी एका वारसाला गादीवर बसवून मुगलांविरुद्धचा लढा पुढे निकराने चालू ठेवला. त्याहीवेळी निजामी लढ्याचा केंद्रबिंदू परांडा होता. पुढे किल्ला आदिलशाही कब्जात आल्यावर मुगलांनी या किल्ल्यासाठी मोठी मोहीम सुरू केली. ही मोहीम चार महिने चालली. अखेर मुगल सरदार करतलबखानाने किल्ला ताब्यात घेतला ते लढाई जिंकून नाही, तर किल्लेदाराला लाच देऊन फंदफितुरीनेच!! पुढे शाहिस्तेखान पुण्यात वास्तव्याला असताना शिवरायांचे सेनापती नेताजी पालकरांच्या सैन्याने परांडा, औसा आणि उदगीर या मार्गाने लुटालूट करीत मुगल सैन्याला जेरीस आणले होते.

छत्रपती संभाजीराजांच्या निर्घृण वधानंतर राजाराम महाराज यांना मुगली सैन्याने परांड्याजवळ गाठायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्याच (काळात) शूर मराठी सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांच्या जोडीने मुगलांना या प्रदेशात गनिमी कारवायांनी पार हैराण करून टाकले होते. धनाजींची शहजादा बेदारबख्तबरोबरची एक लढाई या किल्ल्याजवळ  झाली. मुगलांच्या उतरत्या काळात हैदराबादच्या निजामाकडे किल्ला होता. खर्ड्याच्या लढाईनंतर काही काळ मराठी राज्यात राहून परत निजामी कब्जात आला. मराठवाडा मुक्तिसंग्रामात रझाकारांच्या अत्याचाराला प्रतिकार करीत मराठवाड्यातील इतर प्रदेशाबरोबरच परांड्याचा भाग स्वतंत्र भारतात विलीन झाला. आज किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी राज्याचा पुरातत्व विभागाकडे आहे. किल्ल्याची स्थापत्य रचना आणि त्यात वेगवेगळ्या राजघराण्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ८००-१,००० वर्षांत होत गेलेले बदल याविषयी पुढील भागात पाहूयात.

(लेखिका पुरातत्वज्ञ आणि  वास्तुसंवर्धनतज्ज्ञ आहेत.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.