ढाल-तलवारीच्या पलीकडचे 'छत्रपती संभाजी महाराज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:05 PM2018-05-14T17:05:43+5:302018-05-14T17:05:43+5:30

छत्रपती संभाजीमहाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने आधुनिक काळानुसार त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेण्याचा एका शिवव्याख्यात्याने केलेला हा प्रयत्न

Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti | ढाल-तलवारीच्या पलीकडचे 'छत्रपती संभाजी महाराज'

ढाल-तलवारीच्या पलीकडचे 'छत्रपती संभाजी महाराज'

निलेश जगताप|

 “इतिहास हा भविष्याचा आरसा असतो, या आरशाकडे तुम्ही ज्या नजरेने पाहता त्यानुसारच तुमची प्रतिमा मिळत असते, इतिहासाकडे पाहण्याची नजरच भविष्यातील प्रतिमा निश्चित करणारा मुख्य घटक आहे, इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतात. इतिहासात डोकावून पहिले तर आपल्याला दुसऱ्या कुठूनही प्रेरणा उसन्या घ्याव्या लागणार नाहीत, इतका प्रचंड प्रेरणादायी इतिहास आपल्या इतिहासपुरुषांनी निर्माण केला आहे. आता फक्त त्याच इतिहासाचा पुनर्जागर करण्याची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराजांसारखे युवकांना प्रचंड प्रेरणादायक ठरतील असे इतिहासपुरुष आपल्याकडे होऊन गेले. आपल्या ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य उभे केले ते सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनातील सर्वच क्षेत्रांना स्पर्श करून जाणारे आहे. त्यांच्या जगण्या आणि मरण्यातही जो पराक्रमाचा इतिहास आहे तो आजही प्रेरणादायी आहे. मात्र आज त्यांना फक्त ढाल, तलवार आणि धर्माच्या चौकटीतच बंदिस्त केलेले दिसते. आज त्यांच्या जयंतीदिनी तीच चौकट मोडून “ढाल-तलवारीच्या पलीकडचे छत्रपती संभाजी महाराज” समजून घेण्याचा प्रयत्न करूया:

काळाच्या ओघात छत्रपती संभाजी महाराजांवर काही इतिहासकारांनी कधी जाणीवपूर्वक, तर कधी अजाणतेपणे खूप मोठा अन्याय केला आहे. काही इतिहासकारांनी त्यांना बदफैली, व्यसनी म्हणून रेखाटले. तर काहींनी त्यांना धर्मवीर करून एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले. सोयराबाईंना त्यांनी भिंतीत चिणून मारले. असा काल्पनिक चुकीचा इतिहासही काही काळ रंगवला गेला. पराक्रमी पुरुषाला बदनाम करण्याचे षडयंत्रे नेहमीच रचली जातात हा जगाचा इतिहास आहे, शंभूराजे तरी त्याला कसे अपवाद ठरणार म्हणा! आज समाज जागृत होऊन खरा इतिहास समोर आलाय, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजसुद्धा श्रद्धास्थानी आलेले आहेत. सध्या लष्कराच्या ताब्यात असलेल्या पुरंदर किल्यावर जन्म झाल्यानंतर अवघ्या सव्वादोन वर्षात आई सईबाइंचे निधन झाल्यानंतर “आईच्या” मायेने जिजाऊमासाहेबांनी त्यांना वाढवले, आज देशात वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो. पुरंदरच्या तहावेळी हा छावा वयाच्या नवव्या वर्षी जयसिंगाकडे जामीन म्हणून राहतो आणि खऱ्या अर्थाने  राजकारणात प्रवेश करतो. एकीकडे ज्या वयात आजची मुले डोरेमन, पोगो बघतात, सुपर मारियो खेळत आहेत त्याच वयात छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्र ते दिल्ली हा लांबचा प्रवास केला, आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी म्हणून औरंगजेबाच्या दरबारात जाताना शंभूराजे रोज वेगळ्या वाटेने जायचे, कशासाठी? आग्र्यातून बाहेर जाणारा प्रत्येक रस्ता माहिती व्हावा यासाठी! आज २१व्या शतकात आजच्या मुलांना छत्रपती संभाजी महाराजांची तल्लख बुद्धिमत्ता आणि कमी वयात आलेली समज सांगणे आवश्यक आहे.

वयाच्या १४ व्या वर्षी आजची लेकरे स्मार्टफोनमध्ये आपला अमुल्य वेळ घालवत असतात. त्यात काही वावगे आहे असेही म्हणायचे नाही. मात्र त्याच वयात संभाजी महाराजांनी  प्रशासन कसे चालवावे यावर आधारित बुधभूषणम् नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. संभाजी महाराज साहित्यिक म्हणून आजही उपेक्षित राहिलेत हे दुर्दैव आहे. नायिकाभेद, नखशीख, सातसतक हे ब्रज भाषेतील ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेत. गागाभट्टांसारख्या संस्कृत पंडितांने ‘समनयन’ नावाचा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला आहे. संभाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी “ज्याच्या तलवारीच्या पराक्रमाने दिशा उजळून गेल्या आहेत” असा केला आहे. १६७१ ते १६७४ या काळात स्वराज्याचा मुलकी कारभारसुद्धा त्यांनी सांभाळला आहे. १६७८ साली संभाजी महाराज दिलेरखानच्या छावणीत सामील झाले. अनेक इतिहासकारांनी संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले असेच लिहिले, मात्र या ११ महिन्याच्या काळात मोगलांनी  स्वराज्यावर कुठेही आक्रमण केले नाही. अपवाद  फक्त भूपालगडाचा. तो सुद्धा मराठ्यांनी अवघ्या पंधरा दिवसांत परत घेतला. मुळात ती छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराजांची रणनीती होती, हे समजून घेणे आता गरजेचे झाले आहे. एकीकडे आज महाराष्ट्रात रोजच शेतकरी आत्महत्या करतोय, त्या आत्महत्या जरी वाटत असल्या तरी त्या आत्महत्या नाहीत तर इथल्या व्यवस्थेने केलेल्या हत्या आहेत. दाभोळचे ठाणेदार मल्हार रंगनाथ संगमेश्वर सुभ्यातील शेतकरी बांधवांसोबत राजांसमोर प्रस्ताव मांडतात कि “ओढ्याला बांध घालून पाण्याचा प्रवाह डोंगरातून दुसरीकडे वळवायचा व आजबाजूच्या दोन-तीन गावातील कायम स्वरूपी दुष्काळ कायमचा दूर करायचा” त्यासाठी गरज होती फक्त चौदाशे हात लांबीचा चर खोदण्याची आणि अडचण होती त्यासाठी लागणाऱ्या निधीची, संभाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एक हजार होणांची उचल त्याच वेळी देऊ केली. आणि त्या प्रकल्पाचे झालेले कामकाज पाहण्यासाठी ते स्वतः जातीने हजर राहिले, फक्त निधी उपलब्ध करून स्वस्थ बसणारा राजा काय कामाचा! आपण दिलेल्या निधीचा विनियोग कशा प्रकारे होतो हे पाहण्याची जबाबदरी सुद्धा राज्यकर्त्यांची असते, अन्यथा गैरकारभाराला उत येऊ शकतो. भ्रष्टाचारमुक्त कारभारातून शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यभिषेक झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसात बर्हाणपूर या मोगलांच्या वैभवशाली नगरीवर छापा टाकला होता. सुरतेपेक्षाही समृद्ध असणारी ती नगरी. बऱ्हाणपूरपासून जवळच्या प्रदेशातच अरबस्तान वरून आलेला उस्मान हा घोड्यांचा सौदागर अरबी घोडे विकायला घेऊन आला होता. त्याच्याकडील ४००० उमदी अश्वसंपत्ती छापा टाकून घेऊन जाणे राजांसाठी सोपे होते. मात्र त्यांनी जेवढी किंमत घोड्यांची आहे तेवढी रोखीने अदा केली. राज्य चालवण्यासाठी लागणारा निधी उभारताना शत्रूच्या ताब्यातील एखाद्या वैभवसंपन्न नगरीवर छापा घालणे त्यावेळच्या परिस्थितीनुसार क्रमप्राप्त होते, मात्र गरज पडेल ती वस्तू रोखीने विकत घ्यावी, जोर-जबरदस्ती करू नये, हाच शिवरायांचा शिरस्ता आणि त्यांचे पालन संभाजी महाराजांनी आयुष्यभर तंतोतंत केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे जो सागरावर वर्चस्व गाजवेल त्याच्या सीमा दिल्ली यमुनेच्या तख्ताला भिडतील, शिवाजी महाराजांच्या काळात अपूर्ण राहिलेली कुलाबा किल्ल्याची तटबंदी संभाजी महाराजांनी अवघ्या ६ महिन्यात पूर्ण करून घेतली, जहाज बांधणी केंद्र बाणकोट येथे भेट देऊन जहाज बांधणीसाठी प्रोत्सहन दिले. महाड, कल्याण, जैतापूर, राजापूर असा अनेक ठिकाणी जहाज बांधणीचे काम त्यांनी अहोरात्र केले होते. अरबांचा सेनापती जंगेखान याने  पाण्यातील युद्धाचे प्रशिक्षण मावळ्यांना दिले, स्वराज्याचे आरमार गोऱ्यांच्या तुलनेत आधुनिकतेच्या बाबतीत कोठेही मागे पडणार नाही याची कायम व्यवस्था करण्यासाठी संभाजी राजे सावधान होते .२६ एप्रिल १६८४ साली छत्रपती संभाजी महाराजांनी बीरवाडीच्या किल्ल्यामध्ये इंग्रजांसोबत करार केला , या करारात शेवटचे कलम होते. “स्वराज्याच्या हद्दीतील कोणीही मनुष्य मात्रास गुलाम म्हणून किंवा धर्मांतर करून ख्रिस्ती करण्यासाठी इंग्रजांना विकत घेण्यावर निर्बंध.” आमिषाच्या बळावर किंवा मारून मुटकून धर्मांतर होऊ नये यासाठी धर्मांतर बंदीचा कायदा करणारा राजा म्हणूनही भारताने छत्रपती संभाजी महाराजांना लक्षात ठेवायेला हवे होते. अगदी ३५० वर्षापूर्वी अशा प्रकारे गुलामगिरी विरोधात वेठबिगारी विरोधात, बालकामगार विरोधात व धर्मांतराबाबत कायदे करून एक आदर्श राजा असल्याचे संभाजी महाराजांनी सिद्ध केले, परंतु काही इतिहासकारांनी संभाजीराजांची ही रूपे आणि सामाजिक सुधारणा कधीच लोकांसमोर येणार नाहीत याची दक्षता घेतल्यानेच हा इतिहास आजवर लपून राहिला हेही तेवढेच खरे.

कणभर सैन्य असताना छत्रपती संभाजीमहाराजांनी मनभर असलेल्या मोगलांच्या नाकीनऊ आणले होते. मात्र आज आमची अवस्था काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी झाली आहे. संभाजीमहाराजांनी १६८५ साली या मराठी मुलखातील जनाचे मेंदू आणि मन बळकट करणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा “इनामदार” पदवीने गौरव करून त्यांना लष्करी संरक्षण दिले. सोबतच वारीसाठी लागणारा सर्व खर्च करण्याची तयारी ठेवली. आळंदी ते पंढरपुर या दिंडी सोहळ्याचे पालखी सोहळ्यात रुपांतर केले. सॅम्यूएल ऑस्टीन नावाचा इंग्रजी व्यापारी जेव्हा १६७४ ला रायगडावर व्यापारी परवाना मिळवण्यासाठी आला त्यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज रायगडावर नव्हते, त्यामुळे संभाजीमहाराजांनी त्याच्याशी संवाद साधताना दोन गोष्टी त्याला सांगितल्या. एक म्हणजे ते राजपुत्र आहेत राजा नाही त्यामुळे व्यापारी परवाना राजे स्वतःच देऊ शकतात. राजपुत्र नाही आणि दुसरी म्हणजे ऑस्टीन विदेशी असल्याने गडावरील थंड हवा त्याच्या प्रकृतीला मानवणारी नाही. त्यामुळे त्याने पाचाडला जिजाऊंच्या वाड्यावर थांबावे. या दोन बाबी सॅम्युएल ऑस्टीन याने त्याच्या रोजनिशीत लिहिल्या आहेत. संभाजी महाराजांना सोळा भाषा येत होत्या. जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल तर बहुभाषिक व्हाव लागते हे संभाजीमहाराजांकडून आजच्या युवकांनी शिकणे गरजेचे आहे.

लढाईचा काळ आता गेलाय, आता पढाईचा काळ आला आहे. छत्रपती संभाजीमहाराज आज पुन्हा जन्माला येणार नाहीत. मात्र चुकून आलेच जन्माला तर? संभाजी महाराज आज जन्माला आलेच तर लेखणीचा तलवारीसारखा वापर करत त्या जोरावर शिक्षणगड जिंकतील. माध्यमगड जिंकून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा पाया मजबूत करतील, प्रशासनगड जिंकून कार्यक्षम प्रशासक कसे असावेत ते दाखवून देतील. राजे काळासोबतच चालतील, वाघाचा जबडा फाडण्याएवडी टाकत त्यांच्या बाहूंमध्ये होती, मृत्यूलाही झुकवेल, एवढी उच्चकोटीची दुर्दम्य इच्छाशक्ती ,आत्मविश्वास, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम संभाजी महाराजांमध्ये ठासून भरले होते. इतिहासाच्या पटलावर बदनामीचे सर्वाधिक वार  झेलूनही ज्याचा इतिहास मिटवणे इतिहासकारांना कधीच शक्य झाले नाही, त्या संभाजी महाराजांचा इतिहास केवळ ढाल-तलवारीचा नाही. संभाजीमहाराजांची प्रेरणा घेऊन डोकी भडकावण्यापेक्षा त्यांचा प्रेरणात्मक इतिहास समजून घेतला पाहिजे. आपले हे एक पाऊल बदलाची सुरवात ठरेल.   
 
( लेखक हे शिवचरित्रावरील व्याख्याते आहेत ) 

Web Title: Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.