निळ्या पाखरांचा 'पँथर'!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 10:57 PM2018-03-30T22:57:02+5:302018-03-30T22:57:02+5:30

भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी २६ मार्चला सोमवारी मुंबईत धडकलेल्या वादळाने शिवाजी-फूले-शाहू-आंबेडकरांची जनता अजूनही लढणे विसरलेली नाही हेच दाखवून दिले आहे. भारीप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना विविध संघटनांनी दिलेला पाठींबा पाहता पुन्हा नव्याने पँथरचा जन्म झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये जागृत झाल्याचे जाणवले. ही एकी टिकवून ठेवण्यात बाळासाहेब आंबेडकर यांना यश आल्यास याचे आगामी काळात निश्चितच दूरगामी परिणाम पाहायला मिळतील अशी शक्यता असल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे या आंदोलनातून दिसले.

Blue Pants 'Panther'! | निळ्या पाखरांचा 'पँथर'!

निळ्या पाखरांचा 'पँथर'!

- धनाजी कांबळे
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला आलेल्या हजारो नागरिकांवर, बायाबापड्यांंवर हल्ला करण्यात आला. यात अनेकजण जखमी झाले. एकाचा मृत्यू झाला आहे. एक जण अजूनही उपचार घेत आहे. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. वाहनांना आग लावण्यात आली. लहान मुलांना कडेवर घेऊन चालत निघालेल्या जनतेलाही लक्ष्य करण्यात आले.

तरीही पोलीस यंत्रणा आणि सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे २ आणि ३ जानेवारीला उत्स्फूर्त बंद झाला. या वेळी काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे तथाकथित दलित नेत्यांनी या बंदची जबाबदारी घेण्याचे धाडस दाखविले नाही. म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी या ह्यबंदह्णची जबाबदारी घेऊन लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यामुळे बंद शांततेत यशस्वी झाला. या वेळी सरकारने दंगलीतील आरोपींना तातडीने अटक करू. तसेच विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात सरकारने केवळ वेळ मारून नेली आणि दंगलीतील आरोपींना पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असेच अप्रत्यक्षपणे पाहिले असा आरोप त्यानंतर झाला.

बाळासाहेब आंबेडकरांनी मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचा यात हात असल्याचे सांगून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. मात्र सरकारने केवळ वेळकाढूपणा केल्याचा आरोप नंतर बाळासाहेब आंबेडकर यांनीच केला होता. सुरूवातीला मराठा आणि बौद्ध समाजात दंगल घडावी यासाठी गैरसमज पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचे जाणवत होते. मात्र मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने पुढे येऊन आम्ही या दंगलीचा निषेध करतो असे म्हणून आम्ही तमाम दलित समाजसोबत असून याप्रकरणी ज्यांची नांवे समोर आली आहेत त्यांना अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे संभाव्य धोका टळला. जनतेचा दबाव आणि न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्याने समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केली. पण संभाजी भिडे यांची चौकशी करण्याची तसदीही पोलिसांनी घेतल्याचे दिसले नाही.

उलट सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आणखी बळकट होत गेला. त्यामुळे २५ मार्चपर्यंत पोलीस आणि सरकारने भिडेना अटक न केल्यास २६ मार्चला मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता. तरीही सरकारने भिडेना अटक केली नाही. त्यामुळे २६ मार्चला मुंबईचा दिवस उजाडला तो सरकारविरोधातील आक्रोश घेऊन दाखल होणाऱ्या मोर्चेकºयांच्या आगमनाने. त्यांच्या जयभीमच्या घोषणांनी. मुंबईकर कामावर जायला निघाले तेंव्हा दक्षिण मुंबईचे रस्ते थांबले होते. जयभीमच्या घोषणा आभाळाला भिडत होत्या. तशाच त्या मंत्रालयाला धडकत होत्या. राज्यकर्त्यांना एव्हाना कानोकाणी खबर पोचली होती. त्यामुळे काही रस्ते बंद करण्यात आले. बॅरिकेड्स लावण्यात आले. तरीही लोकांची पावले चालत होती. भिडेना अटक झालीच पाहिजे ही मागणी जोर धरत होती. मध्येमध्ये डफावरची थाप शाहीर अमरशेख, अण्णा भाऊ साठे यांची आठवण जागवत होती. व्हिटीवर एकत्र येणाºया जनतेला आझाद मैदानाकडे पोलीस वळवत होते. त्यामुळे या ठिकाणी बाचाबाची झाली. अखेर बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जनता आझाद मैदानावर जमली. याठिकाणी जनतेला संबोधित करताना बाळासाहेब आंबेडकरांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचे आझाद भाषण हे त्यांच्या राजकीय आयुष्यातील जननेता पद्धतीचे भाषण होते. फडजिंकू भाषण करणे हा त्यांचा मूळचा पिंड नाही. अगदी ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेतही शनिवारवाड्यावरही त्यांनी वैचारिक मांडणी केली होती. आझाद मैदानात त्यांनी मोदींना थेट आव्हान दिले. दुपारीच माध्यमांशी बोलताना भिडे यांना अटक झाली नाही तर आमचे पुढचे टार्गेट मोदीच असतील असे स्पष्ट केले होते.
मोदींनी आमच्या नादी लागू नये. हिटलरलाही आत्महत्या करायला लागली होती हे त्यांनी ध्यानात ठेवावे. आम्ही लोकशाही मानतो आणि मनमानी करायला इथे राजेशाही आलेली नाही, असा हल्लाबोल केला. आधार कार्डवरूनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला. आठ दिवसांत भिडेंना अटक करणार नसाल तर विधानभवनाला घेराव पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
बाळासाहेबांचे हे भाषण माणसा-माणसात एक जोश आणि चैतन्य पेरत थेट काळजाचा ठाव घेत होते. अधूनमधून त्यांनी जनतेला प्रश्न केले. उत्तरे घेतली व संवाद साधत ...लढाई अजून संपली नाही यारो, असे सांगून ही लढाई दीर्घपल्ल्याची असल्याची जाणीव देऊन बाबासाहेबांनी दिलेल्या मताची किंमत समजून घ्या असा सूचक संदेशही दिला. लोकांनी केलेला जल्लोष पाहता त्यांचे एकमुखी नेतृत्त्व आज आंबेडकरी जनतेत मान्य झाले आहे, जे पुढे जावून ओबीसीही स्वीकारतील. त्यांच्या भाषणातला आलुतेदार-बलुतेदार हा उच्चार नेतृत्त्वाची कक्षा विस्तारल्याचे प्रत्यंतर देत होता. मराठा समाजातील गरीब कष्टकरी पिचलेला समाज आपलाच आहे. आपण सगळे एक आहोत, असेही त्यांनी भाषणातून सुचवले. आपली सर्व कार्ड ओपन न करता सरकारवर दोन दिवस दबाव ठेवून त्यांनी आंदोलन यशस्वी केले आहे.

सर्व समाजांचा सहभाग
या आंदोलनात केवळ दलित-बौद्ध समाज नव्हता तर आलुतेदार-बलुतेदार समाज एकवटला होता हे या आंदोलनाचे विशेष होते. मराठा, ओबीसी, लिंगायत, धनगर, मुस्लिम समाजाचे नेते कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे या आंदोलनातून आगामी काळात राजकीय समीकरणेही बदलण्याची ताकद निर्माण केली आहे.

विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल किंवा टाटा सोशल सायन्समधील विद्यार्थांचा प्रश्न याबाबत बाळासाहेबांनी आवाज उठवल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. पँथर चळवळीत ज्या पद्धतीने जान भरणारे नेते होते. त्या पद्धतीने बाळासाहेबांनी पुन्हा एकदा आम्ही पँथर असल्याचे आणि अजूनही पँथर जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले असून, राज्याच्या विविध भागातून जनता भाजी-भाकरी बांधून आंदोलनासाठी आली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करणारा बौद्ध समाज स्वाभिमानी आहे. तो डोळे झाकून कुठे जात नाही, मात्र काही नेते खुर्चीसाठी-सत्तेसाठी जातीवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत अशा वेळी जनतेच्या बाजूने स्वाभिमानाने उभे राहणारे आज बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलनासाठी आल्याचे अनेक लोकांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. सध्या बाळासाहेबांच्या बाजूने जनता आहे ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. मात्र आगामी काळात ही जनता टिकून राहिल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद बौद्ध समाजात आहे हेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
बाळासाहेब आंबेडकर जेव्हा राज्यसभा आणि लोकसभेत खासदार होते. त्या काळात त्यांनी शेतकरी, कष्टकºयांच्या बाजूचे अनेक निर्णय करायला सरकारला भाग पाडले आहे. प्रामुख्याने शोषित श्रमिक आणि दलित समाजाच्या प्रश्नांना राजकीय पटलावर आणून सामाजिक न्यायाची भूमिका आग्रहाने मांडली आहे. आजही त्यांचा देशाच्या राजकारणात एक दबदबा आहे. त्यांच्या पाठीशी एक जनसमूदाय आहे. विविध राजकीय पक्षांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्या राजकीय, सामाजिक विद्वतेचा समाजविकासासाठी निश्चितच उपयोग होत आला आहे. पुढेही होत राहील. मात्र, आता भीमा कोरेगाव दंगलीनंतर त्यांची आक्रमक भूमिका देशासमोर ठळकपणे अधोरेखीत झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते पेटून उठतील. चवदार तळ््याचा सत्याग्रह असो, अथवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांनी सामाजिक गुलामगिरीवर हल्लाबोल करून सत्याचा आणि स्वाभिमानाचा आग्रह धरल्याचे दिसते. बाबासाहेबांचा तोच वैचारिक वारस गुलामगिरीतून मुक्त झालेला समाज पुन्हा गुलाम होवू नये, म्हणून झगडत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे या मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांनी सांगितले. ज्येष्ठ महिला-पुरुष कार्यकर्त्यांसह तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्याबरोबरच वेगवेगळ््या समाजांच्या समूहांचा सहभाग हे सोशल इंजिनिअरिंग आगामी काळात कशापद्धतीने आणि कोणत्या दिशेने झेपावते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Blue Pants 'Panther'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.