लढाऊ बाण्याचा किल्ले औसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:49 PM2017-10-15T12:49:02+5:302017-10-15T12:53:29+5:30

स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांची तोंडओळख करून घेण्याची ही लेखमालिका पुढे चालू ठेवताना औरंगाबाद जिल्ह्यामधील देवगिरी वगळता छोट्या-मोठ्या ८ किल्ल्यांनंतर परत आपण मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडे वळूया. पहिल्या सहस्रकातील बदामीचे चालुक्य- राष्ट्रकुटांपासून बहामनी, मुघल आणि अगदी विसाव्या शतकातील असिफजाही निजामापर्यंत वेगवेगळ्या राजवटी तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाची धार अनुभवलेला मराठवाड्यातील लातूर जिल्हा. औसा या तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या दक्षिणेला एक मोठा देखणा भूदुर्ग वसलेला आहे.

Ausa castle the worrior fort | लढाऊ बाण्याचा किल्ले औसा 

लढाऊ बाण्याचा किल्ले औसा 

googlenewsNext

- तेजस्विनी आफळे

इतिहास अभ्यासकांच्या मते औसा गावाचा ‘उच्छिव’ असा उल्लेख बदामीच्या चालुक्य घराण्यातील विजयादित्याच्या बोरगाव ताम्रपटात आढळतो. राष्ट्रकूट आणि कल्याणी चालुक्यांच्या काळात या असाईनगरीत जैनांचे प्रमुख केंद्र होते. काकतियांच्या आक्रमणापासून बचावासाठी यादवांनी आपल्या प्रमुख सैनिकी छावण्या इथे ठेवल्या होत्या. मात्र, या काळातील किल्ल्याच्या स्वरूपाबद्दल आपल्याला फारशी साहित्यिक आणि पुरातात्विक माहिती अजून नाही.

पंधराव्या शतकात नावाजलेला बहामनी वजीर महमूद गवानच्या कारकीर्दीत उदगीर आणि परंडाबरोबरच औसा किल्ल्याचीही बांधणी अथवा पुनर्बांधणी झाली. त्याच्या मृत्यूनंतर बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यावेळचा औशाचा सुभेदार कासीम बरीद पुढे बारीदशाहीचा सुलतान बनला. लवकरच किल्ला अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात गेला. मुघलांनी अहमदनगरचा पाडाव केल्यावर मलिक अंबरने निजामशाही राजधानी औसा किल्ल्यात हलवली आणि नाव दिले अंबरपूर. या काळात झालेल्या तटबंदीच्या दुरुस्त्या व इतर अनेक बांधकामांचा उल्लेख किल्ल्यातील शिलालेखांमध्ये आढळतो. अनेक तोफा घडविल्या गेल्या. सतराव्या शतकात किल्ल्याचा कब्जा मुघलांकडे आला. त्यानंतर शिवाजी महाराज आग्-याहून परतल्यावर नेताजी पालकरांच्या फौजांनी औसा, उदगीरच्या परिसरात धुमाकूळ घालत मुघल सैन्याला जेरीस आणले होते. तशी मुळी तक्रारच औशाच्या किल्लेदाराने औरंगजेबाकडे केली होती.

पुढे संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या काळातही हा शिरस्ता चालूच राहिला. मुघलांबरोबरच्या तहानुसार या परिसरातील चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार पेशव्यांना मिळाले होते. अठरावे शतक निजाम आणि मराठी फौजांमधील संघर्षाने गाजले. इंग्रजांनी मराठी राज्य संपवल्यावर हा प्रदेश निजामाच्या अधिपत्याखाली राहिला तो थेट मुक्तिसंग्रामानंतर मराठवाडा भारतात सामील होईपर्यंत. शंकरपाळ्याच्या आकाराचा हा भूदुर्ग दक्षिणोत्तर सुमारे साडेपाच एकरांवर पसरलेला आहे. या किल्ल्याला दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर बांधलेल्या तटबंदीचे, खंदकाचे व ३१ भक्कम बुरुजांचे संरक्षण लाभलेले आहे. किल्ल्याचा मुख्य प्रवेश उत्तर-पूर्वेला शहराच्या दिशेने आहे. आज खंदकावर प्रवेशासाठी कायमस्वरूपी पूल असला तरी पूर्वी काढ-घाल करता येण्याजोगी व्यवस्था असे दिसते. मुख्य प्रवेशाची स्थापत्यरचना लोहबंदी, नौबत, अरीतखान असे भक्कम दरवाजे, बलदंड बुरूज, वळणा-वळणांचा रस्ता, प्रांगणे आणि सैनिकांसाठीच्या देवड्या यांनी परिपूर्ण आहे.

किल्ल्यामधील ब-यापैकी सुस्थितीत असलेल्या इमारतींमध्ये तहसील कोर्ट, दारूखाना, मशीद, जल-महाल आणि तळघर यांचा समावेश होतो. मशिदीवरील शिलालेखावरून तिचे बांधकाम औरंगजेबाच्या सांगण्यावरून मुघल सरदार सोहराबखानाने इसवी सन १६८० साली केल्याचे समजते. किल्ल्यात पाणीपुरवठ्यासाठी दक्षिण कोपºयातील पाय-या पाय-यांची विहीर आणि तसेच बाहेरील तटबंदीतील विहिरी यांचा उपयोग होत असावा. इतर दुर्गांप्रमाणे इथेही वेगवेगळ्या बुरुजांवर तोफांची व्यवस्था होती. त्यापैकी काही ऐतिहासिकदृष्ट्या मौलिक तोफा आजही किल्ल्यावर आहेत. त्यापैकी एक तोफ एक वर्षापूर्वी चोरीला गेली. त्यानंतर राज्य पुरातत्व खात्याने सावधानता म्हणून लोखंडी पिंजरे उभारले आहेत. एकेकाळी शत्रूची दाणादाण उडवणा-या या तोफा आज स्वत:च तुरुंगात असल्यासारख्या वाटतायत खºया; पण या तोफांचे खरे मोल त्यांच्या धातूच्या किमतीहून कितीतरी जास्त आपला ऐतिहासिक ठेवा म्हणून आहे, हे आपल्याला कधी कळणार. ऐतिहासिक वस्तूंच्या चो-या, त्यावर काळजी न घेता चालणे, बसणे, लिहिणे, खराब करणे या तत्किंचित गोष्टींपलीकडे जाऊन आपण आपल्या संस्कृतीच्या या ठेव्याकडे बघणार का? ही जशी सरकारची तशीच आपलीही जबाबदारी नाही का?

(लेखिका पुरातत्वज्ञ आणि वास्तुसंवर्धनतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Ausa castle the worrior fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.