अफजल खानाच्या वधाचा साक्षीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 02:11 AM2017-12-24T02:11:32+5:302017-12-24T02:12:13+5:30

प्रतापगडाला भेट देण्यासाठी आपण प्रथम महाबळेश्वर गाठावे. तेथून २१ कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वर एसटी स्थानकाहून प्रतापगडास जाण्यासाठी बसेस आहेत व खासगी वाहनांचीसुद्धा सोय आहे.

Afzal Khan's killer witness! | अफजल खानाच्या वधाचा साक्षीदार!

अफजल खानाच्या वधाचा साक्षीदार!

Next

- गौरव भांदिर्गे

इतिहास
शिवाजी महाराजांनी १५ जानेवारी १६५६ रोजी चंद्रराव मो-यांची जावळी जिंकून घेतली. जावळी मुलुखात पारघाटाच्या तोंडावर आणि रडतोंडी घाटाच्या नाकावर असलेल्या भोरप्याच्या डोंगरावर जेव्हा शिवरायांची नजर गेली तेव्हा लगेचच त्यांनी मोरोपंत पिंगळे यांना येथे किल्ला बांधण्यास सांगितले.
किल्ला बांधून झाल्यावर शिवरायांनी प्रथम आर्जोजी यादव व नंतर गणोजी गोविंद यांस नेमले. विजापूरहून निघालेल्या अफजलखानाला गोपीनाथ पंत बोकील यांच्या चतुराईने गडावर आणले व १० नोव्हेंबर १६५९, गुरुवार- मार्गशीर्ष शुद्ध षष्टीसह सप्तमी शके १५८१ रोजी शिवरायांनी अफजलखानाचा वध केला. काही काळ शत्रूच्या ताब्यात हा किल्ला होता. नंतर मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला. १६७१-७२मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्यांसाठी एक अंदाजपत्रक तयार केले; त्यात प्रतापगडाच्या डागडुजीसाठी १० हजार होन खर्च केले. १८१८मध्ये छत्रपती प्रतापसिंहराजेंमुळे हा किल्ला आज सुस्थितीत आहे. १९२९मध्ये भवानी देवीला अर्पण केलेले सर्व दागिने, सुवर्णछत्र इत्यादी मौल्यवान गोष्टी गडावर पडलेल्या दरोड्यात चोरीला गेल्या.

पाहण्याची ठिकाणे
वाहनतळापासून चालत गेल्यावर आपण गोमुखी बांधनीच्या महाद्वारापाशी पोहोचतो. हा दरवाजा पश्चिमाभिमुख असून आजही शिवकालीन नियमाप्रमाणे सूर्यास्तानंतर बंद व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महाद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूंस पहारेकºयांच्या देवड्या व एक तोफ आहे. तिथून पुढे गेल्यावर आपणास उजव्या बाजूस दिसतो प्रतापगडाची शान असलेला चिलखती बुरूज. तो पाहून आल्यावाटेने पायºयांच्या मार्गाने जावे. मार्गात रहाटाचं तळं लागतं व काही पायºया चढल्यावर आपण भवानी मंदिरात पोहोचतो. नेपाळचा राजा लीलासेन याच्याकडे मंबाजी नाईक पानसरे यांस पाठवून श्वेतगंडकी, त्रिशूलगंडकी व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरील उत्कृष्ट शिळा मिळवून ही भवानी देवीची मूर्ती घडवली गेली. या मूर्तीचे प्रथम राजगडी आगमन झाले व नंतर मोरोपंतांच्या हस्ते प्रतापगडी प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरातच स्फटिकाचे शिवलिंग आहे व मंदिराच्या बाहेर आल्यावर हत्तीच्या तोंडाचा आकार असलेल्या दोन भव्य दीपमाळा व काही तोफा, हस्तकला केंद्र आहे. तसेच पायºया चढून गेल्यावर समर्थांनी स्थापन केलेले हनुमान मंदिर आहे व पुढे गेल्यावर वेताळ मंदिर आहे. पुढे गेल्यावर आपण स्वयंभू केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचतो. येथेच सदर होती.
गडाच्या दुसºया व तिसºया दरवाज्याच्या दर्शनी भागावर ‘पंखविहीन केवल शरभ’ आहेत. तसेच पुढे देवाचे तळे, तलावाचा बुरूज, मोठे तळे, गोड तळे, नासके तळे व दक्षिण बुरूज, केदार बुरूज, चोरवाट, सूर्याबुरूज, कडेलोट व घोरपडीचे चित्र असणारा रेडे बुरूज, दुपदरी बांधनीचा यशवंत बुरूज, टेहाळणी बुरूज व शिवरायांचा पुतळा आहे व याच जागी शिवरायांचा वाडा होता.
गडावरील महत्त्वाच्या वास्तू पाहण्यासाठी ३ ते ४ तास लागतात व संपूर्ण गड अभ्यासपूर्ण पाहण्यासाठी ३ दिवस लागतात.

किल्यावर पोहोचण्याच्या वाटा
प्रतापगडाला भेट देण्यासाठी आपण प्रथम महाबळेश्वर गाठावे. तेथून २१ कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वर एसटी स्थानकाहून प्रतापगडास जाण्यासाठी बसेस आहेत व खासगी वाहनांचीसुद्धा सोय आहे.

Web Title: Afzal Khan's killer witness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड