गिरीशभाऊ जरा दमानं घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 05:34 PM2017-11-30T17:34:29+5:302017-11-30T17:34:33+5:30

सकारात्मक किंवा नकारात्मक प्रसिद्धीच्या मोहासाठी जळगावकरांचे संभाव्य नुकसान हे परवडणारे नाही. त्यामुळे सध्यातरी ‘गिरीशभाऊ जरा दमानं...’ हेच म्हणावंसं वाटतंय....

Just take a breath ... | गिरीशभाऊ जरा दमानं घ्या...

गिरीशभाऊ जरा दमानं घ्या...

Next

- विलास बारी

जळगाव जिल्हा हा राज्याच्या राजकारणात नेतृत्व आणि कर्तृत्वाची खाण आहे. शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्याने माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासारखे नेतृत्व राज्याला दिले आहे. या सर्व नेत्यांनी आपले कर्तृत्व आणि वक्तृत्वाच्या बळावर जनतेच्या मनावर राज्य केले आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीला जनतेने ‘ब्रेक’ देत शिवसेना व भाजपाला तीन वर्षांपूर्वी राज्यात संधी दिली. राज्याच्या मंत्रीमंडळात नाथाभाऊ, गिरीशभाऊ, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांची वर्णी लागणार असल्याने जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून निघणार या कल्पनेनेच जळगावकर नागरिक भारावला. जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, महिला, ठेवीदार या साºयांच्या मनात आपल्याला न्याय मिळेल, अशी भावना निर्माण झाली. तत्कालिन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी त्या दृष्टीने कामालादेखील सुरुवात केली. प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, शेळगाव बॅरेज, पाडळणे धरण, कृषी संशोधन केंद्र, वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रासह अनेक प्रकल्पांच्या निधीसाठी पाठपुरावा करून तो खेचून आणण्याची धमक ठेवली. एकनाथराव खडसे यांची मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाहेर आली. त्यानंतरच्या काळात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या पत्नीसोबतचे कथित संभाषण, भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणावरून त्यांच्यावर आरोपाच्या फैरी झडल्या. चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी एकनाथराव खडसे यांची स्थिती झाली. शेवटी खडसे यांच्या राजीनाम्यानंतर प्रकरण काही काळ शांत झाले. त्यांचा मंत्रिमंडळातील समावेशही सतत चर्चेची बाब राहिली. ‘मीडिया ट्रायल’मुळे आपला बळी गेला, अशी खंत एकनाथराव खडसे यांची नेहमी राहिली आहे. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे वैयक्तिक नुकसान झाले, त्यापेक्षा जळगावचे जास्त नुकसान झाले. या साºयात एकनाथराव खडसे विरूद्ध गिरीश महाजन या गटाचे छुपे शीतयुद्ध राजीनाम्यानंतर उघडपणे सुरु झाले. दोन्ही गट एकमेकांना नामोहरण करण्याची प्रत्येक संधी शोधू लागले. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जळगावकरांच्या संपूर्ण आशा या जलसंपदासारखे महत्त्वाचे खाते सांभाळणा-या गिरीश महाजन यांच्यावर स्थिरावल्या. आरोग्य क्षेत्रात चांगले काम करीत त्यांनी जिल्हाभरात अनेक आरोग्य शिबिरेही घेतली. जळगाव शहरात विविध पॅथींचा समावेश असलेले वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यानच्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने जिल्ह्यात एकहाती वर्चस्व मिळविले. जिल्ह्याच्या राजकारणात गिरीशभाऊंचा प्रभाव वाढत असताना त्यांना तितकाच विरोधदेखील सुरु झाला. गणेश मंडळाच्या मिरवणुकीत लेझीम खेळणारे, जामनेरात एखाद्या घरात साप निघाल्यानंतर तो स्वत: पकडणारे, अपघातानंतर ट्रक स्वत: चालवून तो पोलीस स्टेशनपर्यंत नेणारे, बुलेटवर सैर मारणारे आमदार गिरीशभाऊ हे सर्वांना परिचित आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून काम करण्याच्या त्यांच्या गुणामुळे त्यांनी नाशिक येथील कुंभमेळा यशस्वी करून दाखविला. मात्र जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण अशा महत्त्वपूर्ण खात्याचा पदभार गिरीशभाऊंकडे असताना जळगावकर मात्र तहानलेला राहिला. शेळगाव बॅरेज, पाडळसे धरणाचे काम किंवा गिरणा धरणावरील बलून बंधाºयाच्या कामाच्या केवळ घोषणाच सुरु राहिल्या. तीन वर्षात जळगाव जिल्ह्यातील एकाही प्रकल्पाच्या बांधकामाची वीट ठेवण्यात आलेली नाही. दुसरीकडे शतप्रतिशत भाजपाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीसोबतचा घरोबा हा संघ आणि भाजपाच्या विचारांशी जुळलेल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा आहे. गिरीशभाऊ यांचे नेतृत्व आता जामनेर किंवा जळगावपर्यंत मर्यादित न राहता, ते भाजपाच्या पहिल्या फळीतील नेतृत्व म्हणून उदयास येऊ लागले. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे सहकारी म्हणून त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण होऊ लागला. म्हणूनच मग जळगाव येथील विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून भाषण असो किंवा साखर कारखान्याच्या गाळप कार्यक्रमाच्यावेळी मद्याच्या बाटलीला महिलांचे नाव देण्याचा अजब सल्ला, या साºयात टीकेची झोड उडून ते पुरते घायाळ झाले. त्यातच चाळीसगाव तालुक्यातील वनक्षेत्रातील नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी स्वत: हातात बंदूक घेत शिकारीला निघाल्यानंतर पुन्हा चहूबाजूने टीकेची झोड उठली. गिरीशभाऊ तुम्ही दारूच्या बाटलीला महिलेचे नाव देण्याचा अजब सल्ला शहादा येथील साखर कारखान्यातील कार्यक्रमावेळी दिला आणि दुसºयाच आठवड्यात पिस्तूल घेऊन बिबट्याला मारण्यासाठी निघाल्यानंतर झालेल्या आरोपांवर ‘आयुष्यात चिमणीदेखील मारली नाही’, असे स्पष्टीकरण देऊन मोकळे झालात. आरोप-प्रत्यारोपांच्या फे-यात मुख्यमंत्रीपदाची क्षमता असलेल्या एकनाथराव खडसे यांना यापूर्वीच मंत्रीमंडळातून बाहेर रहावे लागल्याने जळगावच्या विकासाच्या दृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सकारात्मक किंवा नकारात्मक प्रसिद्धीच्या मोहासाठी जळगावकरांचे संभाव्य नुकसान हे परवडणारे नाही. त्यामुळे सध्यातरी ‘गिरीशभाऊ जरा दमानं...’ हेच म्हणावंसं वाटतंय....

Web Title: Just take a breath ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.