- नंदकिशोर पाटील

‘केल्याने देशाटन...चातुर्य येते’, अशा अर्थाची एक आर्या लहानपणी आपण घोकून तोंडपाठ केलेली असते. पण या आर्याचा खरा अर्थ कळतो ते आपण परदेशी गेल्यानंतरच! परदेशी जाण्यात पूर्वीइतकी अपूर्वाई राहिली नसली तरी, आपण कुठे जातो यावर बरंच काही अवलंबून असतं. निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळं, मुझियम्स, समुद्रकिनारे, प्राणिसंग्रहालयं, गिर्यारोहण, बोटिंग, रायडिंग... इ. कोणत्याही पर्यटकांसाठी खुणावणारी ही ठिकाणं असतात. आपल्याकडे जे नाही, अथवा आपल्याहून वेगळं काही तरी बघण्यातच खरी मौज असते.
हिंद आणि प्रशांत महासागरांच्या कुशीत वसलेला निसर्गसंपन्न आॅस्ट्रेलिया आज जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण बनला आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते पुरातनकाळी आॅस्ट्रेलिया खंड गोंडवनभूमीचा भाग असून दक्षिण अमेरिका, भारत व आफ्रिका यांना जोडलेला होता. परंतु खंडविप्लवामुळे हे सर्व प्रदेश वेगवेगळे झाले असावेत. आॅस्ट्रेलियाच्या उत्तरेस तिमोर व आराफूरा समुद्र, ईशान्येस कोरल समुद्र, पूर्वेस पॅसिफिक महासागर व टास्मन समुद्र आणि दक्षिणेस व पश्चिमेस हिंदी महासागर असून टास्मानिया बेटही दक्षिणेकडेच आहे. उत्तर किनारपट्टीवर कार्पेटेरियाचे आखात व दक्षिणेकडे ग्रेट आॅस्ट्रिेलियन बाइट व स्पेन्सर आखात आहे. न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया, साऊथ आॅस्ट्रेलिया, क्विन्सलँड, वेस्टर्न आॅस्ट्रेलिया व टास्मानिया ही राज्ये असून नॉर्दर्न टेरिटरी व आॅस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी हे केंद्र्रशासित प्रदेश आहेत. आॅस्टेÑलियाची भौगोलिक रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
सिडनी, ब्रिस्बेन, पर्थ ही शहरं तशीही भारतीयांना क्रिकेटमुळे परिचित आहेत. हनिमून कपल्ससाठी तर सिडनी हे ड्रीम डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. सिडनी हे समुद्रकिनारी वसलेले आॅस्ट्रेलियातील सर्वात प्राचीन आणि तितकेच सुंदर शहर आहे. आधुनिक वास्तुकला, सोनेरी रंगाच्या चमचमत्या वाळुचे बिचेस, डार्लिंग हार्बर, विश्वविद्यालये, रॉयल बॉटनिक गार्डन, बॉण्डी बीच, निल्सन पार्क, नेशनल मेरिटाइम म्युझियम, चाइनीज गार्डन, म्युझियम आॅफ कंटैम्परेरी आर्ट, म्युझियम आॅफ सिडनी, सिडनी एक्वेरियम, अशी कितीतरी ठिकाणं पर्यटकांना खुणावत असतात.
सूर्योदयाच्या सुमारास सिडनीच्या उत्तरेस असलेल्या बॉण्डी बीचवरून केलेला मॉर्निंग वॉक पर्यटक आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. सहा मैल अंतराच्या या बिचलगतच्या उंच-सखल खडकाळ पायवाटेवरून चालताना तुम्हाला आॅस्ट्रेलियातील प्रसिद्ध उद्योगपती, खेळाडू, चित्रपट तारे-तारका भेटू शकतात. तुम्ही त्यांच्यासोबत सेल्फीही काढू शकता. बॉण्डी बीच खास करून बॅक पॅकर्ससाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे जगप्रसिद्ध रेस्टॉरण्ट्स, हॉटेल्स् आणि रिफ्रेशमेन्ट्साठी कॉफी शॉप्स्, बुटिक्स् आहेत.
ऐतिहासिक सिडनी ब्रिज, आॅपेरा हाऊस ही शहराला जागतिक ओळख निर्माण करून देणारी ठिकाणं. जगभरातील सैलानी खास या स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. नव्याने उभारलेल्या बारंगारू हार्बरवरची सफर अविस्मरणीयच. बॉण्डी बिचवरून आल्यानंतर तुम्ही इथे तुमची दुपार घालवू शकता. लंचनंतर तिथूृन फेरीद्वारे सिडनी ब्रिजखालून तुम्ही आॅपेरा हाऊसला पोहोचता तेव्हा आनंदाला पारावार उरत नाही.

भारतातून येणारे प्रवासी वाढले
पर्यनटस्थळांसाठी भारतीय पर्यटक सर्वाधिक पसंती कांगारूची भूमी असलेल्या आॅस्ट्रलियाला देत आहेत. जून २०१७ पर्यंत २ लाख ७७ हजार १०० भारतीय पर्यटकांनी आॅस्ट्रलियाला भेट दिली. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा १५ टक्कांनी वाढला आहे. भारत ही आॅस्ट्रेलियासाठी पर्यटकांबाबत नवव्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. देशातील पर्यटकांपैकी महाराष्ट्रीयन पर्यटकांची संख्याही मोठी असून यंदाच्या त्यात १८ टक्कांनी वाढ झाली आहे.
इंडिया अ‍ॅन्ड गल्फ टुरिझम आॅस्ट्रेलियाचे कंट्री मॅनेजर निशांत काशीकर यांनी सांगितले की, मराठी पर्यटकांनी त्यांची पुढील सुटी घालवण्यासाठी आॅस्ट्रेलियाची निवड करावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्रतील पर्यटकांना पाणी आणि समुद्रकिनारे, निसर्ग, वन्यजीवन, साहसी उपक्रम, सेल्फ-ड्राइव्ह आदी बाबी आॅस्ट्रेलिया सहलीत अपेक्षित असतात.
भारतीय बाजारपेठेची क्षमता मान्य करून टुरिझम आॅस्ट्रेलियाने नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राला ‘फ्रेण्ड आॅफ आॅस्ट्रेलिया’ म्हणून नियुक्त केले आहे. आॅस्ट्रेलियातील पर्यटनासोबत जोडली गेलेली आणि हा सन्मान मिळवणारी ती पहिलीच भारतीय स्त्री ठरली आहे.

आॅपेरा हाउस : वास्तुकलेला अप्रतिम नमुना असलेले जगप्रसिद्ध आॅपेरा हाउस आतून-बाहेरून बघताना डोळ्यांचे पारणे फिटते. सकाळी सातपासून पर्यटकांनी हा परिसर गजबजलेला असतो. जॉर्न उत्जॉन या डॅनिस वास्तुरचनाकाराने या अप्रतिम वास्तूची रचना केली आहे. तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही तिथे लाइव्ह शोदेखील पाहू शकता.


फेदरडेल वाइल्डलाइफ पार्क : सिडनीपासून साठ-सत्तर मैलाच्या अंतरावर बघण्यासारखा फेदरडेल वाइल्डलाइफ पार्क आहे. सुमारे सात एकरावर उभारण्यात आलेल्या या पार्कमध्ये तुम्हाला कांगारू भेटतात. कांगारूसारखा मायाळू प्राणी नाही. तुमच्या हातांनी तुम्ही त्यास घास भरवू शकता. मायेने जवळ घेऊ शकता. आॅस्ट्रेलियातील प्राणिजीवनात विविधता आढळते. प्लॅटिपस व एशिड्ना हे दोन अंडी घालणारे सस्तन प्राणी फक्त आॅस्ट्रेलियातच दिसतात. सस्तन प्राण्यांत कांगारु शिवाय एक प्रकारचा लांडगा, चिचुंद्री, मांजर, अँटईटर हे प्राणी आढळतात. कोआला हा छोटासा वृक्षवासी प्राणी असून तो निलिगरीची पाने खाऊन गुजराण करतो. फ्लँजर हा झाडावरच राहतो; तो पाने, मध व कीटक खाऊन राहतो. या सर्व प्राणि आणि पक्षांचे दर्शन तुम्हाला या पार्कमध्ये घेता येते.

सिनिक वर्ल्ड : जागतिक वारसा लाभलेल्या ब्यु मॉन्टेन्सचा अद्भूत नजरा पाहाण्यासाठी पर्यटक सिनिक वर्ल्डकडे कूच करतात. जागतिक आश्चर्च आणि प्रगत तंत्रज्ञानाची किमया म्हणून ओळख असलेल्या रेल्वेत बसून सुमारे दीड हजार मीटर खोल दरीत जाणे हा रोमांचकारी अनुभव इथे घेता येतो. पूर्वीच्या काळी दरीतील कोळसा पहाडावर आणण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला जात असे. याच सिनिक वर्ल्डच्या माथ्यावरून जगप्रसिद्ध ‘थ्री सिस्टर्स’ नावाचे उभे तीन पहाड पाहाता येतात. गंमत म्हणजे, या ‘थ्री सिस्टर्स’ सुळक्यांची सीता, गीता आणि बबिता अशी भारतीय नावं असल्याचे तेथील गाईड सांगत होता. सुमारे अडीच कि.मी. अंतराच्या केबल वे, स्काय वे चा विलक्षण रोमांचक अनुभव इथे घेता येतो. थोडक्यात, सिडनी शहर आणि भोवतीचा परिसरच इतका रम्य आहे की, दोन-तीन दिवस पुरत नाहीत.