ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना प्रत्येक दिवस सध्या न्यायालयाची किंवा पोलीस स्थानकाची पायरी चढावी लागत आहे.अधूनमधून त्यांना अटक चुकविण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी धाव घ्यावी लागत आहे.

- सद्गुरू पाटील

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना प्रत्येक दिवस सध्या न्यायालयाची किंवा पोलीस स्थानकाची पायरी चढावी लागत आहे. अधूनमधून त्यांना अटक चुकविण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी धाव घ्यावी लागत आहे. पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नेत्यावर ही पाळी आल्याने विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कामत यांच्यातील राजकीय शत्रूत्वाविषयी लोकांमध्ये आणि सोशल मिडियावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांमधील शत्रूत्व हे चक्क 5 सालापासूनचे असून त्यामागे वेगळी पाश्र्वभूमी आहे.

कामत हे एकेकाळी पर्रीकर यांच्याच भाजपामध्ये होते व ते पर्रीकर यांचे जानी दोस्तही होते. 1994 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी कामत यांना पर्रीकर यांनीच भाजपामध्ये आणले होते. कामत हे त्यावेळी मडगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटासाठी प्रयत्न करत होते. कामत त्यावेळी मडगाव पालिकेचे नगरसेवक होते. काँग्रेसने कामत यांना तिकीट नाकारले, त्यावेळी भाजपाकडेही मडगावमध्ये प्रबळ उमेदवार नव्हता. भाजपा-महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि शिवसेना अशी युती 94 च्या निवडणुकीवेळी झाली होती. गोव्यात आणि विशेषत: दक्षिण गोव्यात तेव्हा भाजपाचे बळच नव्हते. पर्रीकर आणि आताचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी मिळून कामत यांना भाजपचे तिकीट देऊ केले. स्व. प्रमोद महाजन व स्व. गोपिनाथ मुंडे हे त्यावेळी गोव्यातील भाजपाचे काम पाहत होते व त्यांनीही यास मान्यता दिली होती. कामत यांनी लगेच तिकीट स्वीकारले व ते 94 सालच्या निवडणुकीत मडगावमध्ये भाजपाच्या तिकीटावर जिंकुनही आले. पर्रीकर त्यावेळी पणजी मतदारसंघात जिंकले. श्रीपाद नाईक मडकई मतदारसंघात जिंकले. तिघेही प्रथमच आमदार झाले व विधानसभेत पोहचले. 

पर्रीकर कुटुंब आणि कामत कुटुंब यांच्यात घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. दक्षिण गोव्यात आणि विशेषत: ख्रिस्तीधर्मियांचे प्राबल्य असलेल्या सासष्टी तालुक्यात भाजपाला पक्ष काम वाढविण्यासाठी कामत यांची मोठी मदत होत होती. कामत यांचे काँग्रेसमधील नेत्यांशीही त्यावेळी देखील चांगले नाते होते. पर्रीकर आणि कामत हे दोघेही गोव्यात प्रबळ व उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या सारस्वत समाजातील आहेत. पर्रीकर सरकार गोव्यात अधिकारावर आले. त्यावेळी केंद्रात वाजपेयी सरकार होते. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात कामत हे नंतर लगेच मंत्री बनले. खाण खाते त्यावेळी कामत यांच्याकडे होते. पर्रीकर यांच्यानंतर दिगंबर कामत हे भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. मात्र 2005 साली गोव्यात राजकीय अस्थिरता सुरू झाली. भाजपाचे काही आमदार फुटले होते. भाजपच्या उर्वरित आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी कामत यांच्यावर होती पण र्पीकर यांना पूर्णपणो गाफील ठेवून फेब्रुवारी 2005 मध्ये कामत यांनी स्वत:च भाजपचा राजीनामा दिला. पर्रीकर यांच्यासाठी तो फार मोठा धक्का ठरला. भाजपमधील काहीजण सांगतात, की पर्रीकर यांच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले. कामत यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे संख्याबळ घटले व पर्रीकर यांचे सरकारही गेले. पर्रीकर त्यावेळी कामत यांच्यावर एवढे दुखावले की, त्यानंतर कामत व पर्रीकर यांच्यात पुन्हा चांगले नाते प्रस्थापित झालेच नाही.

कामत हे 2007 साली काँग्रेसचे मुख्यमंत्री बनले. विरोधी पक्षनेतेपदी पर्रीकर होते. पर्रीकर यांनी कामत यांची नेहमीच कोंडी केली. गोव्यातील हजारो कोटींच्या खनिज खाण घोटाळ्य़ामध्ये कामत हेच खलनायक आहेत असे चित्र 2012 सालच्या निवडणुकीवेळी पर्रीकर यांनी उभे केले. 2012 साली पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विजय मिळवला. पर्रीकर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर कामत यांची अग्नीपरीक्षा सुरू झाली. ती अजुनही कायम आहे. आता तर अटक चुकविण्यासाठी कामत यांना अज्ञातस्थळी जाऊन राहण्याचीही वेळ गेल्या शनिवारी आली होती. पोलीस त्यांचा शोध घेत होते. 2017 च्या निवडणुकीनंतर पर्रीकर पुन्हा मुख्यमंत्री बनले आणि ईडीची चौकशी यंत्रणा देखील कामत यांच्या मागे लागली आहे. मध्यंतरी लुईस बजर्र लाच प्रकरणही कामत यांच्यावर शेकायला आले होते. पर्रीकर यांच्याकडे सध्या खाण आणि गृह ही दोन्ही खाती आहेत. पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. एसआयटीकडून खनिज खाण घोटाळ्य़ांची चौकशी केली जात असून कामत यांच्याविरोधात काही गुन्हे नोंद झाले आहेत. ईडीने कामत यांच्या दोन मालमत्तांवर जप्तीही आणली होती. कामत यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा जेवढा लागला आहे, तेवढा तो अन्य कुठच्याच राजकीय नेत्याच्या मागे गोव्यात लागलेला नाही. पर्रीकर यांनी यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले काहीजण पर्रीकर यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री म्हणून आहेत. या उलट पर्रीकर यांचे एकेकाळी जानी दोस्त राहिलेले कामत हे अलिकडे दर दोन महिन्यांनी अटक चुकविण्यासाठी फिरत आहेत. कामत यांच्या मागे काँग्रेस पक्षही संघटीतपणो उभा राहिलेला नाही, कारण यापूर्वी निवृत्त न्यायमूर्ती शहा यांच्या चौकशी आयोगानेही गोव्याच्या खाण क्षेत्रतील प्रचंड भोंगळ कारभार दाखवून देऊन कामत यांच्याकडे बोट दाखविलेले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सरकार कामत यांच्याविरोधात राजकीय सूड उगवत असल्याचे नुकतेच म्हटले आहे पण कामत यांचे खाण सचिव म्हणून काम केलेले राजीव यदुवंशी यांनी खनिज खाण गैरव्यवहारांबाबत न्यायालयासमोर पोलिसांना जबानी देताना पूर्णपणो कामत यांच्याकडेच बोट दाखवले आहे. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.