व्हॉटस्अ‍ॅप: सापही मरावा अन् लाठीही तुटू नये!

By रवी टाले | Published: August 25, 2018 07:33 PM2018-08-25T19:33:40+5:302018-08-25T19:57:13+5:30

 Whotswap: Snake should die and stick should not be broken! | व्हॉटस्अ‍ॅप: सापही मरावा अन् लाठीही तुटू नये!

व्हॉटस्अ‍ॅप: सापही मरावा अन् लाठीही तुटू नये!

Next

    अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच व्हॉटस्अ‍ॅप ही हल्ली भारतीयांची मूलभूत गरज झाली आहे. या वाक्यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी, व्हॉटस्अ‍ॅपशिवाय आज भारतीयांचे पान हलत नाही, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच! माहितीच्या अतिजलद आदानप्रदानासाठी     व्हॉटस्अ‍ॅप खूप उपयुक्त ठरले आहे; पण त्यासोबतच अफवा व तिरस्काराच्या प्रसारासाठीही ते कारणीभूत ठरत आहे. नेमके हेच कारण पुढे करीत, भारत सरकारने व्हॉटस्अ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्किंग सेवा पुरविणाºया कंपनीकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एक मागणी वगळता इतर सर्व मागण्या फेसबुकने मान्य केल्या आहेत. ज्या एका मागणीसंदर्भात भारत सरकारपुढे मान तुकविण्यास फेसबुकने नकार दिला, ती मागणी व्हॉटस्अ‍ॅपवरील एखाद्या संदेशाचे उगमस्थान अथवा मूळ शोधून काढण्यासंदर्भातील होती. व्हॉटस्अ‍ॅपमध्ये असे एक फिचर समाविष्ट करावे, जेणेकरून एखादा विशिष्ट संदेश सर्वप्रथम कुणी धाडला होता, याचा शोध घेता येईल, अशी मागणी भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केली होती. 
    एका अंदाजानुसार भारतात व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करणाºयांची संख्या सुमारे २० कोटींच्या घरात आहे. ते दररोज अक्षरश: अब्जावधी संदेशांचे व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून आदानप्रदान करीत असतात. त्यामध्ये टेक्स्ट मेसेज, छायाचित्रे, ध्वनिफिती, चित्रफिती यांचा समावेश असतो. व्हॉटस्अ‍ॅपच्या प्रचंड व्याप्तीचा लाभ घेऊन, खोट्या बातम्या, अफवा, द्वेषमुलक मजकूर पसरविण्यासाठी या मेसेंजर अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अलीकडेच भारतात मोठ्या प्रमाणात जमावाद्वारा हत्या (मॉब लिचिंग) झाल्या. त्यापैकी अनेक घटनांमागे व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून पसरविण्यात आलेल्या अफवा अथवा द्वेषमुलक मजकुराची भूमिका असल्याचे दिसून आले आहे. मॉब लिचिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने विरोधी पक्ष सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आरोपीच्या पिंजºयात उभे करीत आहेत. या पृष्ठभूमीवर भारत सरकारने फेसबुककडे व्हॉटस्अ‍ॅपसंदर्भात काही मागण्या केल्या. त्यापैकी भारतात ग्रिव्हान्स आॅफिसरची नेमणूक व कार्यालय, फॉरवर्ड केलेल्या संदेशांवर तसा उल्लेख आदी फुटकर मागण्या फेसबुकने मान्य केल्या आहेत; परंतु एखाद्या संदेशाचे मूळ शोधता यावे, ही सर्वात महत्त्वाची मागणी मात्र धुडकावून लावली आहे. मुळात व्हॉटस्अ‍ॅप वापरकर्त्यांनी एकमेकांना पाठविलेल्या संदेशांची आम्ही कोणतीही नोंद अथवा माहिती आमच्याकडे ठेवत नाही आणि त्यामुळे एखाद्या संदेशाचे मूळ शोधणे शक्य नाही, अशी भूमिका फेसबुकने घेतली आहे. व्हॉटस्अ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ख्रिस डॅनिअल्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दरम्यान पार पडलेल्या बैठकीत, भारतातील कायदे अंमलबजावणी आणि नियामक संस्थांना सहकार्य करण्याचे मात्र व्हॉटस्अ‍ॅपने मान्य केले आहे.
    संदेशांचे मूळ शोधून काढण्यासंदर्भात फेसबुकने दाखविलेली असमर्थता चुकीची नाही. व्हॉटस्अ‍ॅप किंवा एनक्रिप्टेड स्वरूपात संदेशांची देवाणघेवाण करण्याची सेवा पुरविणाºया इतर कोणत्याही मेसेंजर सेवा पुरवठादाराकडे वापरकर्त्यांनी एकमेकांना धाडलेले संदेश वाचण्याची, बघण्याची अथवा त्यांनी एकमेकांना केलेले कॉल ऐकण्याची सुविधा नसते. वापरकर्त्यांनी पाठविलेले मेसेज किंवा केलेले कॉल त्यांच्या उपकरणातच (मोबाइल फोन अथवा टॅब) एनक्रिप्ट (विस्कळीत) अथवा डिक्रिप्ट (मूळ स्वरूपात) केल्या जातात. एखाद्या उपकरणातून एखादा संदेश निघण्यापूर्वीच क्रिप्टोग्राफिक लॉकद्वारा तो सुरक्षित केल्या जातो. या कुलुपाची चावी संदेश ज्याला धाडला आहे त्याच्या उपकरणात असते. प्रत्येक नव्या संदेशासाठी नवे कुलूप व चावी तयार होते. त्यामुळे व्हॉटस्अ‍ॅप किंवा तत्सम मेसेंजर सेवांमधील संदेश, ज्याला संदेश धाडण्यात आला त्याशिवाय इतर कुणालाही (अगदी सेवा पुरवठादारालाही) वाचता, ऐकता किंवा बघता येत नाहीत. 
      अफवा व द्वेषमुलक मजकुराच्या प्रसारास आळा घालण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवरील संदेशांचे उगमस्थान शोधण्याच्या भारत सरकारच्या मागणीत वरवर बघता काहीही चुकीचे वाटत नसले तरी, एकदा का ही कळ सरकारच्या हाती लागली, की मग सरकारच्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हॉटस्अ‍ॅपने भारतीयांच्या जीवनात असे स्थान निर्माण केले आहे, की ज्याच्या हाती संदेशांचे उगमस्थान शोधण्याची कळ लागली, त्याला जणू काही कुणाच्याही शयनकक्षात वाटेल तेव्हा डोकावण्याचा परवानाच मिळाला म्हणून समजा! 
व्हॉटस्अ‍ॅपवर कोण कुणाच्या संपर्कात आहे, कोण कुणाला काय पाठवत आहे, ही माहिती ज्याच्या हाती लागली तो व्हॉटस्अ‍ॅप वापरणाºया बहुतांश लोकांना वाटेल तसा झुकवू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. संदेशांचे उगमस्थान हुडकण्याच्या भारत सरकारच्या मागणीपुढे व्हॉटस्अ‍ॅपने मान तुकविल्यास भारतीय नागरिकांचा खासगीपणा संपलाच म्हणून समजा! तसे झाल्यास व्हॉटस्अ‍ॅपला मोठा फटका बसेल; कारण सरकार केव्हाही आपल्या खासगी बाबी जाणून घेऊ शकते, हे समजताबरोबर भारतीय मोठ्या संख्येने व्हॉटस्अ‍ॅपला रामराम करून तशीच सेवा पुरविणाºया इतर एखाद्या मेसेंजर अ‍ॅपकडे वळतील, हे निश्चित आहे. या भीतीमुळे व्हॉटस्अ‍ॅपलाही सावधगिरीने पावले उचलावी लागतील. शिवाय एकदा का सरकारला असे यश मिळाले तर मग नागरिकांची माहितीच्या महाजालातील कोणतीही गोष्ट खासगी राहणार नाही. उद्या सरकार कुणाचाही ई-मेल इनबॉक्सदेखील उघडून बघू शकेल. 
    हे सारे खरे असले तरी खोट्या बातम्या, अफवा आणि द्वेषमुलक मजकुरामुळे समाजविश्व नासत आहे, हे तथ्यदेखील नाकारता येणार नाही. अशा बाबींना आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा त्या माध्यमातून आपले इप्सित साध्य करू इच्छिणाºयांना मोकळे रान मिळेल. तसे घडू देता कामा नये. त्यामुळे नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यास धक्का न लावता दुष्ट प्रवृत्तींना लगाम घालण्याची तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे. त्यासाठी समाजातील चांगल्या लोकांचे साहाय्य घेता येऊ शकते. सुदैवाने अद्यापही समाजात चांगले लोक बहुसंख्येने आहेत. व्हॉटस्अ‍ॅपद्वारा प्राप्त एखादा संदेश अनिष्ट असल्याचे वाटल्यास तशी सूचना व्हॉटस्अ‍ॅपपर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करता आल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. असा संदेश खरोखरच अनिष्ट असल्याचे पडताळणीत आढळल्यास तो पुढे अग्रेषित होणार नाही, अशी व्यवस्था केल्या जाऊ शकते. भारतीयांच्या फॉरवर्डस्वर मर्यादा घालण्यात आल्याचा फायदा झाल्याचे आकडेवारी सांगते. आपण फॉरवर्ड करीत असलेला संदेश अनिष्ट असल्याचे ठरविल्या जाऊ शकते, ही जाणीव संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी दुसºयांदा विचार करण्यास प्रवृत्त करेल. असे किंवा यापेक्षाही जास्त चांगले आणखी मार्ग असू शकतात, ज्यामुळे नागरिकांचे व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखतानाच दुष्ट प्रवृत्तींना आळा घालता येऊ शकेल. तसे मार्ग सुचविण्याचे आवाहन भारत सरकार आणि व्हॉटस्अ‍ॅप करू शकतात. कुणी सांगावे, एखाद्या वेळी त्यातून सापही मरेल आणि लाठीही तुटणार नाही, असा एखादा मार्ग सापडेलही!

    

Web Title:  Whotswap: Snake should die and stick should not be broken!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.