भाषाशुद्धीबाबत सावरकरांची भूमिका नेमकी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 07:03 AM2018-02-26T07:03:26+5:302018-02-26T07:12:33+5:30

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज ५२वा आत्मर्पण दिवस! २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी भारतमातेच्या या लढवय्या सुपुत्राने मुंबईतील दादर येथील निवासस्थानी प्रायोपवेशनाद्वारे (अन्न- औषधोपचारांचा त्याग करून) देह ठेवला.

What is Savarkar's role in language purification? | भाषाशुद्धीबाबत सावरकरांची भूमिका नेमकी काय?

भाषाशुद्धीबाबत सावरकरांची भूमिका नेमकी काय?

googlenewsNext

- संकेत सातोपे
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज ५२वा आत्मर्पण दिवस! २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी भारतमातेच्या या लढवय्या सुपुत्राने मुंबईतील दादर येथील निवासस्थानी प्रायोपवेशनाद्वारे (अन्न- औषधोपचारांचा त्याग करून) देह ठेवला. क्रांतीकारक सावरकर, हिंदुहृदयसम्राट सावरकर, महाकवी सावरकर, नाटककार सावरकर, राजकारणी सावरकर ते गांधीवादाचे विरोधक सावरकर अशा सावरकरांच्या अनेक पैलुंवर आजवर विपुल लिहिले- बोलले गेले; मात्र अस्पृश्यता-जातीभेद निवारक सावरकर आणि भाषा- लिपीशुद्धीचे पुरस्कर्ते सावरकर या त्यांच्या सोनेरी पैलूंकडे त्यांच्या समर्थक नि विरोधकांचेही काहीसे दुर्लक्ष झाले. यातील भाषाशुद्धीबाबतच्या त्यांच्या भूमिकेची आपण आजच्या संदर्भाने माहिती घेऊया.

भाषाशुद्धी हा शब्द उच्चारणाऱ्यावर, अनेक कथित विद्वान तुटून पडतात. त्यांची काही पठडीतली वाक्य असतात; ती म्हणजे ‘भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते; ती प्रमाण किंवा बोली असते. पुणेरी म्हणजेच शुद्ध मराठी का? आनी- पानी, सकाली-संद्याकालीला अशुद्ध ठरवणारे तुम्ही कोण?’ खरंतर हा युक्तीवाद अगदीच योग्य आहे. केवळ मूठभर कथित उच्चवर्गीयांची मूळमूळीत भाषा म्हणजेच मराठी नव्हे. मात्र त्याच वेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की, भाषाशुद्धी चळवळीत प्रमाण भाषाविरुद्ध, बोलीभाषा असा वाद अपेक्षितच नाही. तिथे वाद आहे तो स्वकीय भाषा की परकीय भाषा इतकाच. म्हणूनच या चळवळीतील मंडळींनी बोलीभाषेतील अनेक शब्द, वाक्प्रचार, अव्यय त्यांच्या प्रमाण भाषेतील लिखाणात वापरले. उदाहरणच द्यायचे झाले, तर स्वा. सावरकरांनी वापरलेल्या ‘नि’ या अव्ययाचे देता येईल. ‘आणि’ या अर्थाच्या ‘व’ या एकाक्षरी अव्ययाला पर्याय म्हणून सावरकरांनी हेतुपुरस्सर दीर्घ ‘नी’ त्यांच्या लिखाणात आणला. ‘तू नी मी संग्ती- संग्ती जाऊ’ अशा प्रकारे ग्राम्य बोलीत तो त्यापूर्वी वापरला जात होता. सावरकरांपाठोपाठ भाषाशुद्धीवादी ज्येष्ठ कवी माधव ज्युलियन यांनी लघु- गुरू आणि मात्रांच्या हिशेबातही ‘नी’ हा ‘व’ला चपखल पर्याय ठरावा, यासाठी एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावेत, या मराठी शुद्धलेखनाच्या नियमाला फाटा देत ऱ्हस्व ‘नि’ वापरण्यास सुरुवात केली. हा प्रचार इतका धडाकेबाज होता की, मराठी शुद्धलेखनात अपवाद म्हणून ऱ्हस्व ‘नि’ आजही विराजमान आहे. अगदी भाषाशुद्धीचे विरोधकही तो तसाच लिहितात.

सारखेत मीठ मिसळले, तांदळात खडे मिसळले की, भेसळ होते आणि जे भेसळयुक्त आहे ते अशुद्ध. त्यामुळे मराठी या अस्सल देशी भाषेत अरबी- फारसी, इंग्रजी अशा परदेशी शब्दांची झालेली सरमिसळ दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे ‘भाषाशुद्धी.’ मराठीच्या अन्य बोलींचा, इतकेच काय संस्कृत, पंजाबी, कानडी अशा कुठल्याही भारतीय भाषांना किंवा त्यातील शब्दांना- रचनांना विरोध करण्याचा या चळवळीचा मूळीच हेतु नव्हता. स्वदेशी शब्दांना शुद्धीवादी मंडळींनी आक्षेपही घेतलेला दिसत नाही. सावरकरांना भारताचे अस्सल देशी राष्ट्रीयत्व अपेक्षित होते, त्याच अनुषंगाने त्यांनी देशी धर्म, देशी भाषा, देशी संस्कार आणि जीवन पद्धतीचा आजन्म पुरस्कार केला. रत्नागिरी येथील स्थानबद्धतेच्या काळात त्यांना राजकारणात भाग घेण्यास बंदी होती, या काळात त्यांनी जातपात निवारण आणि भाषाशुद्धीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केलेले दिसते. त्यासाठी दै. केसरीतील लेख मालिकेतून त्यांनी भाषाशुद्धीबाबत त्यांची भूमिका मांडली आणि त्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपांचा प्रतिवादही केला. विशेष म्हणजे स्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य शासनाने यापूर्वी प्रकाशित केलेले नव्हते; त्यांचे मराठी भाषेचे शुद्धीकरण हे एकमेव पुस्तक शासकीय मुद्रणालयाने काही दशकांपूर्वी मुद्रित- प्रकाशित केले. त्यामुळे कितीही मतभेद असले, तरी सावरकरांची भाषाशुद्धी ‘राजमान्य’ही झाली आहे, असे म्हणण्याला प्रत्यवाय (हरकत हा परका शब्द इथे जाणीवपूर्वक टाळतो) नाही.

 ‘जगातील कोणतीच भाषा शुद्ध नसते. जगभरातील शब्द घेत गेले, म्हणूनच इंग्रजी जागतिक भाषा झाली. अजूनही ते त्यांच्या शब्दकोशात नवनवीन शब्द खुशाल घेत असतात.’ ही आणखी एक बाब सातत्याने याबाबत मांडली जाते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. इंग्रजांनी जगभर राज्य केले, ते जिथे जिथे गेले तिथे जेते म्हणून गेले. त्यामुळे तिथून आणलेल्या वस्तू काय किंवा शब्द काय त्यांच्यासाठी भूषणावहच ठरणार. जसे १९७१च्या युद्धात आपण पाकिस्तानात घुसून उद्ध्वस्त केलेले त्यांचे ‘पॅटर्न रणगाडे’ आपल्या पराक्रम आणि अभिमानाची चिन्ह म्हणून अनेक ठिकाणी प्रदर्शनात मांडले आहेत. पण तेच मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यानंतर ‘ताज’ला पडलेली भगदाडे तातडीने बुजवून हॉटेल लवकरात लवकर सुरू करण्यात आणि मागे काही झालेच नव्हते अशा आवेशात उभे राहण्यात आपण धन्यता मानतो, यालाच ‘मुंबई स्पीरिट’ही म्हणतो. त्याचप्रमाणे भारतीय भाषांवरील अरबी, फारशी, इंग्रजीचा प्रचंड प्रभाव, या परकीय आक्रमकांनी केलेल्या आपल्या राष्ट्रीय जखमा आहेत आणि त्यांचे व्रण स्वकीय शब्दांनी भरून काढावेत. याकामी अन्य भारतीय भाषा आणि संस्कृतसारखी प्रचंड प्रसव क्षमता असलेल्या भाषेचाही आधार घेता येईल, अशी सावरकरांची भूमिका होती. हीच भूमिका हिंदवी स्वराज्य संस्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली होती. त्याचसाठी त्यांनी तत्कालीन मुघली दरबारी रितींना फाटा देत, अस्सल भारतीय शिष्टचार आणले. त्यांनी किल्ले हा फारसी शब्द वगळून गड- दुर्ग असे शब्द वापरले. (उदा. रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, आदी). दरबाराला राजसभा म्हटले, वजीर, सरलष्कर आदी पदे घालवून पंतप्रधान, सुरनीस, सेनापती अशी नावे योजिली. राजमुद्रा, चलनसुद्धा संस्कृतमधूनच ठेवले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यकारभारातून अरबी- फारशी शब्दांना पूर्णपणे सीमापार करण्यासाठी अष्टप्रधान मंडळातील रघुनाथ पंडितांकरवी संस्कृत प्रतिशब्द सुचविणाऱ्या ‘राज्यव्यवहार कोश’ या ग्रंथाची निर्मिती करविली.

भाषाशुद्धी चळवळीमुळे मराठी कमकुवत होईल आणि त्यात नव्या संकल्पना नि संज्ञांसाठीच्या शब्दांची वानवा होईल, असेही आक्षेप आहेत. प्रत्यक्षात या चळवळीने मराठीला शेकडो नवे शब्द दिले. हे नवे शब्द शासकीय प्रतिशब्दांप्रमाणे केवळ पुस्तकबंद राहिले नाहीत, तर ते सर्वसामान्यांच्या ओठी स्थिरावलेही. वानगीदाखल, महापौर, दिनांक, विधिमंडळ, विधानसभा, हुतात्मा, चित्रपट, दिग्दर्शक, बोलपट, न्यायालय, कार्यालय, नभोवाणी, दूरध्वनी, भूदल, नौदल, वायूदल असे अनेक शब्द सांगता येतील. केवळ शब्द देऊन सावरकर थांबले नाहीत. त्यांनी भाषाशुद्धीचा विचार मांडला. त्याची काही तत्त्वे निश्चित करून दिली. त्यामुळेच त्यांच्यानंतरच्या काळातही संगणक, भ्रमणध्वनीसारखे नवे शब्द पाडले आणि प्रचारले जात असताना आपल्याला दिसते. तंत्रज्ञानाच्या रेट्यासोबत येणारे परकीय शब्द, प्रतिशब्द सापडताच टाकून देऊन, प्रतिशब्दच प्रचारात आणल्यास ही चळवळ आजही पुढे रेटली जाऊ शकते. प्रतिशब्द पाडण्याच्या या हिरीरीमुळेच कोणत्याही भाषेची नवशब्द प्रसवक्षमता टिकून राहात असते, हे लक्षात ठेवायला हवे.

सावरकरांनी मांडलेला लिपीशुद्धीचा विचार हा प्रामुख्याने तत्कालीन मुद्रण व्यवस्थेच्या सोयीसाठी होता, असे दिसते. ‘सर्व, कृष्ण, क्रूर’ अशा अर्ध्या ‘र’च्या उच्चारासाठी एकच पद्धत योजावी. वेळेला संदर्भाने उच्चार ओळखावा लागला, तरी चालेल. तसेच अ, आ यांच्या पुढील स्वर अि अी अु अू अे अै असे लिहावेत, जेणेकरून जुळणीसाठी कमी खिळे लागतील आणि कामाचा वेग वाढू शकेल, असे सावरकरांचे म्हणणे होते. यात आणखीही काही मूळाक्षरांत बदल त्यांनी सूचविले होते. मात्र पुढे छपाई आणि टंकलेखनाच्या नवनव्या पद्धती विकसित झाल्याने या लिपीतील बदलांचा फारसा प्रसार होऊ शकला नाही.

आज सावरकरांनी सूचविलेले लिपीतील बदल किती आवश्यक, किती कालबाह्य यावर विद्वानांत चर्चा होऊ शकेल, मात्र मराठी भाषेतील काही उच्चारभिन्नता दाखविण्यासाठी देवनागरी-बाळबोध लिपीत काही सुधारणांची आवश्यकता आहे, हे बहुतांश लोक मान्य करतील. यात प्रामुख्याने ‘ज’ आणि ‘च’ यांच्या उच्चारणभिन्नता दाखविण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे दिसते. ‘जगतात’ हा शब्द ‘ज’चे मराठीतील दोन स्वतंत्र उच्चार दाखविण्याची सोय नसल्याने ‘जगात’ याअर्थाने आणि ‘जीवन जगतात’ या अर्थानेही वाचला जाऊ शकतो. म्हणूनच कुसुमाग्रज जेव्हा कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत “कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अन् मरती”, असे म्हणतात; तेव्हा ‘ज’चा नेमका कोणता उच्चार आणि अर्थ अपेक्षित आहे, हे आपल्याला सांगता येत नाही. बरं, हा शब्दांशी खेळण्यासाठी वापरलेला श्लेष नव्हे, तर लिपीचे न्यूनत्वच आहे. म्हणूनच ते दूर व्हायला हवे. आणखी एक उदाहरण ‘जप’चे पाहता येईल. 'माळ जप' आणि 'स्वत:ला जप', या दोन्ही वाक्यांत तो वेगळ्या उच्चारांचा आणि म्हणूनच अर्थांचा दिसतो. 'च'च्या बाबतीतही तेच सांगता येईल, चलन आणि चमचा, चक्र आणि चकाकी, चकीत आणि चकवा या शब्दजोड्यांमध्ये पहिल्या शब्दांतील ‘च’ अकार आणि दुसऱ्या शब्दांतील ‘च’चा अकार यात भिन्नता आहे. हे भेद दाखविण्याची सोय व्हावी, यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी हिंदीतील नुक्ता वापरण्याची पद्धत मराठीत रुढ करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र ही पद्धत फारसी रुळली नाही.

स्वा. सावरकर आत्मार्पण दिन आणि त्याला जोडून येणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त मातृभाषा जतनाचा वसा, आपण हाती घ्यायला हवा! तरच स्वा. सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन करीत मराठी भाषा दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला, असे म्हणता येईल.

Web Title: What is Savarkar's role in language purification?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.