हे तर संशयाचे बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:18 PM2018-05-11T14:18:09+5:302018-05-11T14:31:07+5:30

संशय हा अवघा तीन अक्षरी शब्द आहे; मात्र या शब्दाने अनेकांच्या आयुष्याचा घात केला आहे. याच शब्दाला जर भूतबाधा, करणी अशा अंधश्रद्धांची जोड मिळाली तर मग एखाद्या भरल्या घराचे स्मशान होण्यास वेळ लागत नाही. अकोल्यातील धोतर्डी या गावात बुधवारी घडलेले हत्याकांड हे अशाच अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या संशयपिशाच्चाने घडविल्याचे समोर आले आहे

This is a victim of doubt! | हे तर संशयाचे बळी!

हे तर संशयाचे बळी!

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांनाही कोणीतरी तीच बाधा केल्याचा संशय प्रचंड बळावल्याने त्याने तीन मुलांच्या हत्याकांडाचे हे अघोरी कृत्य केले.पत्नीच्या निधनानंतर आलेले नैराश्य, आर्थिक विवंचना अशा वैयक्तिक कारणांसोबतच हरवत चाललेला सामाजिक संवाद हे कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. विष्णू इंगळेने मुलांना ठार करून स्वत:ही जीवन संपविण्याचा केलेला प्रयत्न हा या सर्व संशयाच्या घेऱ्यातून सुटका करण्यासाठीच असला, तरी हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे.

- राजेश  शेगोकार 

अकोला : संशय हा अवघा तीन अक्षरी शब्द आहे; मात्र या शब्दाने अनेकांच्या आयुष्याचा घात केला आहे. याच शब्दाला जर भूतबाधा, करणी अशा अंधश्रद्धांची जोड मिळाली तर मग एखाद्या भरल्या घराचे स्मशान होण्यास वेळ लागत नाही. अकोल्यातील धोतर्डी या गावात बुधवारी घडलेले हत्याकांड हे अशाच अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या संशयपिशाच्चाने घडविल्याचे समोर आले आहे. विष्णू इंगळे या बापाने पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांचा जिवापाड सांभाळ केला; परंतु तोच बाप असा निर्दयी का झाला? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता. या प्रश्नाचे उत्तर गुरुवारी विष्णू इंगळे याने दिलेल्या जबानीत मिळाले आहे. त्याच्या मनात असलेली प्रचंड अंधश्रद्धा, गावातील काही लोकांनी त्याच्या कुटुंबीयांवर जादूटोणा, करणी केल्यानेच पत्नीचा मृत्यू झाला. आता मुलांनाही कोणीतरी तीच बाधा केल्याचा संशय प्रचंड बळावल्याने त्याने तीन मुलांच्या हत्याकांडाचे हे अघोरी कृत्य केले.
भूतबाधा, करणी, मुंजा, पिशाच्च हे सारे मनाचे खेळ आहेत. प्रत्यक्षात असे काहीही नाही, ही गोष्ट सरकारी यंत्रणा, प्रबोधनकार, अंधश्रद्धा निर्मूलन समित्यांचे कार्यकर्ते कानीकपाळी ओरडून सांगत आहेत; मात्र या गोष्टींची समाजावर असलेली पकड कमी होण्यास तयार नाही. धोतर्डीतील हत्याकांडानंतर ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. केवळ अंधश्रद्धा हेच या हत्याकांडामागचे कारण नाही, तर पत्नीच्या निधनानंतर आलेले नैराश्य, आर्थिक विवंचना अशा वैयक्तिक कारणांसोबतच हरवत चाललेला सामाजिक संवाद हे कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. हत्या किंवा आत्महत्या ही दोन्ही टोकाची पावले कुठलाही व्यक्ती क्षणिक कारणांवरून उचलत नाही, असे मानसशास्त्र सांगते. अशा घटना घडण्यापूर्वी या घटनेतील कर्ता करवितांच्या मनात प्रचंड घालमेल सुरू असते. त्याचा निर्णय होत नाही अन् ज्या क्षणी निर्णय होतो त्याक्षणी मात्र अशी राखरांगोळी झाल्याचे समोर येते. धोतर्डी या घटनेतही हेच झाले. विष्णू इंगळे याचा गावातील कोणाशी संवाद होता? तो कोणाजवळ मन मोकळं करत होता का? नातेवाईक, मुले यांच्याशी बोलत होता का? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केला तर उत्तर नकारार्थीच मिळेल! दु:ख कोणाला सांगायचे, आपल्याला कोणाचा आधार नाही, ही भावना अन् करणी, जादूटोणाचा संशय अशा दुहेरी चक्रव्यूहात अडकलेल्या विष्णूने उचललेले टोकाचे पाऊल हे त्या हरविलेल्या सामाजिक संवादाचे मूळ आहे. विष्णू इंगळेने मुलांना ठार करून स्वत:ही जीवन संपविण्याचा केलेला प्रयत्न हा या सर्व संशयाच्या घेऱ्यातून सुटका करण्यासाठीच असला, तरी हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे. मुलं कोणाचीही असो, त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तर कुठलाही संवेदनशिल माणूस गहिवरतो, भावुक होतो; इथे तर पोटच्या मुलांचाच अतिशय क्रूरपणे खून केला गेला आहे. या घटनेत विष्णू वाचला. आता त्याला पश्चात्तापही होईल; पण काय फायदा. सोन्यासारखे तीन जीव स्वत:च्या हाताने संपविल्यावर त्याच्या आयुष्यात जगण्यासारखे उरले तरी काय? मात्र या घटनेपासून आता सामाजिक प्रबोधन करणाºयांसोबतच समाजानेही धडा घेण्याची गरज आहे. बदलत्या काळात मी आणि माझे कुटुंब यापलिकडे विचार करून हरविलेल्या सामाजिक संवादाचा पूल पुन्हा एकदा सांधता येईल, या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. धोतर्डी येथील हत्याकांडाला असलेल्या अंधश्रद्धेच्या कांगोºयामुळे पुन्हा एकदा श्रद्धा-अंधश्रद्धांचा जागर होईल! काही दिवसांनी सारे काही शांत, असे होता कामा नये. गावागावातील अशा विष्णूंच्या मनात शिरलेल्या संशय पिशाच्चांना कायमचे संपवायचे असेल तर सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. आर्थिक विवंचना हे तर कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच असतात; मात्र त्यातून येणाºया नैराश्यावर ‘संवाद’ हाच प्रभावी उपाय आहे. घराघरात अन् समाजपातळीवर तो व्हावा व अंधश्रद्धेच्या विरोधातील लढा तीव्र झाला तरच भविष्यात संशय पिशाच्चाने पछाडलेल्या गावागावातील विष्णूंची सुटका करता येईल अन् संशयाचे बळीही थांबविता येतील.

 

Web Title: This is a victim of doubt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.