नाच्यांचं दुखणं...

By सचिन जवळकोटे | Published: January 23, 2018 09:20 AM2018-01-23T09:20:53+5:302018-01-23T09:24:19+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून ‘सिव्हिल’च्या खाटेवर निमूटपणे झोपून राहिलेले बिच्चारे रुग्ण जेव्हा अकस्मातपणे उठून वेडेवाकडे अंगविक्षेप करतात. संगीताच्या तालावर थयथयाट करू लागतात, तेव्हा करावीशी वाटते डॉक्टरांच्या बुद्धीची कीव

udayanraje shivendra raje supporters dance in hospital | नाच्यांचं दुखणं...

नाच्यांचं दुखणं...

गेल्या दोन महिन्यांपासून ‘सिव्हिल’च्या खाटेवर निमूटपणे झोपून राहिलेले बिच्चारे रुग्ण जेव्हा अकस्मातपणे उठून वेडेवाकडे अंगविक्षेप करतात. संगीताच्या तालावर थयथयाट करू लागतात, तेव्हा करावीशी वाटते डॉक्टरांच्या बुद्धीची कीव. या मंडळींचा ‘मानसिक आजार’ न ओळखता त्यांना केवळ ‘शारीरिक खुराक’ देणाऱ्या प्रशासनाच्या चाकरीबद्दल घ्यावीशी वाटते शंका. या ‘नाच्यांचं दुखणं’ न ओळखता केवळ खोट्या उपचाराच्या ‘माल प्रॅक्टीस’मध्ये अडकलेल्या ‘सर्जन’च्या भोंदू सृजनशीलतेचा फाडावासा वाटतो बुरखा.

गेल्या दोन महिन्यांपासून आत अडकून पडलेली ही मंडळी किती साधी भोळी. अत्यंत सज्जन. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपापलं करून खाणारी. त्यांनी केवळ ‘राजेंवर निष्ठा’ ठेवली, एवढाच काय तो त्यांचा दोष ‘खाकी’वाल्यांना दिसला. रात्रीत उचललं. डायरेक्ट कस्टडीत टाकलं. अराऽऽराऽऽ आपापल्या नेत्यांचं नाव घेऊन अख्ख्या गावाला ढोस द्यायची इवलीशी गंमत करणारी ही कोवळी पोरं घाबरली. प्रत्येकाच्या छातीत दुखू लागलं. बिड्या फुकून पण कधी त्रास झाला नसेल एवढं दुखणं वाढलं. 

‘सिव्हिल’चे वरिष्ठ डॉक्टरही सरळसोट. माणुसकीला जागणारे. लेकरांचा त्रास पाहून त्यांना कळवळा सुटला. नंतर ‘थैली’ही सुटली, हा भाग वेगळा. बारा दिवसांच्या मुक्कामाला ‘बारा हजारी’ इनाम ठरलं. ‘जेलर’चा रेट तर म्हणे पूर्वीपासूनच ठरलेला. फिक्स्ड डिपॉझीट पंचवीस. एक दमडीही कमी नाही. लेकरांची व्यवस्थित काळजी घेण्याचा शब्दही पाळला गेला. ‘प्रिझन’ वॉर्डात ‘शाही पाहुणचार’ करताना बंदोबस्ताला असलेल्यांनीही कुठं कसूर ठेवली नाही. थंड पाण्याच्या मोठ्या जारमधून काठोकाठ भरून ‘मदिरा’ आतमध्ये पोहोचू लागली. सकाळी चूळ भरायलाही म्हणे याचीच तोटी उघडली जायची. सोबतीला रश्श्यात बुडालेल्या नळ्यांचा घमघमाट होताच. आता लेकरांच्या छातीतलं दुखणं कमी करण्यासाठी हे सारं करणं प्रशासनाला गरजेचं होतंच.

साताऱ्याच्या राजधानीत एकोपा अन् सामंजस्य किती गरजेचं, हे भलेही दोन्ही राजेंना समजलं नसेल... परंतु या कार्यकर्त्यांनी मात्र अचूक ओळखलेलं. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ग्लास रिकामे करताना मांडीला मांडी लावून नळ्याही फोडल्या जायच्या. एकमेकांच्या मोबाइलवरचा ‘आवडीचा व्हिडीओ’ मोठ्या चविष्टपणे बघितला जायचा. आता या वयात त्यांनी बघायचं नाही तर कुणी बघायचं?  त्यामुळंच की काय धाकट्या राजेंच्या साथीदारांना जामीन मिळताच थोरल्या राजेंचे सहकारीही दचकले. आता आपल्यालाही इथल्या आलिशान सुखसोयी सोडून पुन्हा उन्हा-तान्हात बाहेर पडावं लागणार, या विचारानं भेदरलेले. त्याच तणावात चार घोट पोटात जास्त गेले. मग काय, शरीराला थरथरी सुटली. जुन्या दुखण्यानं पुन्हा उचल खाल्ली. ‘डीजे’ची चटक लागलेलं रक्त उसळी मारू लागलं. ‘ब्ल्यू टुथ’ स्पिकरच्या आवाजात अंगातली कला बाहेर पडू लागली; कारण छातीचा त्रास कमी होण्यासाठी डॉक्टरांनीच असा व्यायाम सांगितलेला.. अन् हाच तो थयथयाट मोबाइलमध्ये कॅमेराबद्ध जाहला.

‘सिव्हिल’ रूममध्ये नाचण्याचा व्यायाम करणाऱ्या या रुग्ण मंडळींच्या अंगावर केवळ टी-शर्ट अन् बर्मुडा. आता छातीत कळ आल्यानंतर सुटणारा घाम वाळायला नको का? त्यासाठी गोवा बीचवरचे कपडे डॉक्टरांनीच घालायला सांगितले असावेत. एका हातात मोबाईल घेऊन ताल-सुराचा ठेका धरू पाहण्यात ढेकणेंच्या बाळूचा हात कुणीच धरू शकणार नाही. सोबतीला चव्हाणांचा शेखर, शेंडेंचा विकी अन् बागवानांचा इम्तियाज हे होतेच. हे कमी पडलं की काय म्हणून सोडमिसेंचा नितीन, क्षीरसागरांचा प्रताप अन् कोळींचा उत्तम यांनीही साथ दिलेली. जामीन धाकट्या राजे गटाला मिळाला. आनंद व्यक्त केला थोरल्या राजेंच्या कार्यकर्त्यांनी. व्वाऽऽ क्या बात है. एकी असावी तर अशी.

विशेष म्हणजे हे सारं कॅमेराबद्ध केलं सोळंकीच्या चेतननं अन् तपासेंच्या अनिकेतनं. त्यांच्या अँगलाचाही नादच खुळा. मात्र, अनिकेतनं नंतर अतिउत्साहाच्या भरात हा व्हिडीओ मोठ्या विश्वासानं एका व्यक्तीला ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर पाठविला.. अन् इथंच गणित बिघडलं. समीकरणं फिरली. ही क्लिप बघता-बघता पद्धतशीरपणे वेगवेगळ्या ठिकाणी फिरली. व्हायरल झाली. आता झाली की केली गेली, याचा शोध म्हणे थोरल्यांच्या गटाकडून घेतला जातोय. रूममधली नाच्यांची गेम बाहेर डबलगेम होण्यात त्यांचाच तोटा अधिक़.. कारण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जामिनाचा अद्याप निर्णय व्हायचाय नां. खरंच, सातारी राजकारण लईऽऽ भारी. लईऽऽ डेंजर.

 

जाऊ द्या नां बाळासाहेब - पार्ट टू 
‘सुरूचि’वर राडा झाला, तेव्हा ‘राजेंचा घात झाला,’ या सातारनाम्यात ‘खंदारेंचे बाळू’ चमकलेले. आता ‘सिव्हिल’मध्ये ‘ढेकणेंचे बाळू’ ज्या पद्धतीनं थिरकले, ते पाहता त्यांचाही गौरव इथं करायलाच हवा. अर्थात जाऊ द्या नां बाळासाहेब - पार्ट टू. राजेंच्या वाढदिनी बाहेर मैदानावर चेंडू फळा खेळविण्याइतकं ‘आत’ राहणं सोपं नाही, हे बाळूच्या लक्षात आलेलं असावं.. म्हणूनच की काय, गेल्या काही दिवसांत त्यांचा त्रागा म्हणे ‘आत’मध्ये सोबतीला असणाºयांना गुपचूपपणे सहन करावा लागला. दोन घोट जाताच भोगावा लागला. बहुधा याचाच वचपा या ‘व्हिडीओ व्हायरल’ मधून काढला गेलाय की काय? सीबीआय चौकशीची मागणी करायला हरकत नसावी.
असो.. बाकी खांद्यावर टॉवेल टाकून बाळू नाचले जोरात. फक्त चव्हाणांच्या पंकजकडून दोन-चार स्टेप्स् शिकून घेतल्या असत्या तर व्हिडीओला अधिक हीट मिळाले असते. पण काय सांगावं.. ‘सुरुचि’ राड्यापासून पंकजही म्हणे एकदम गायब. राजेंच्या नावावर बच्चनगिरी करण्याचे फायदे भरपूर असले तरी कधी-कधी आत जाण्याचे तोटेही सहन करावे लागतात, हे प्रथमच लक्षात आलं असावं बहुधा... परंतु ‘खाकी’नं माणुसकी दाखविली म्हणून सुटला बिच्चारा. अन्यथा ‘सिव्हिल’च्या रूममध्ये रोज हात जोडून म्हणावं लागलं असतं, ‘जाऊ द्या नां बाळासाहेब.’

Web Title: udayanraje shivendra raje supporters dance in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.