That's right ... | यही हैं सही...
यही हैं सही...

केंद्र सरकारची एक जाहिरात आठवते. यातील ‘यही हैं सही’ हे स्लोगन नाही विसरले जाऊ शकत. सुहागरात्रीला बिछाण्यावर कंडोम, अर्थात निरोधचे एक पाकीट ठेवलेले असते. पती-पत्नी बिछाण्यावर बसून गप्पा मारत असतात. पती या पाकिटाकडे पाहून पत्नीला म्हणतो, ‘आज सिर्फ बाते’?... इथे ही जाहिरात संपते. दुसरी एक जाहिरात अशीच कायम स्मरणात आहे. ‘प्यार हुआ एकरार हुआ’ हे राज कपूर आणि नर्गीस यांचे गाणे दाखविले जाते आणि समारोपाला एका कंडोम कंपनीचे नाव घेतले जाते. कंडोम म्हणजे काय, हे न कळणाºया वयातही ही जाहिरात पाहताना काही आक्षेपार्ह असे वाटायचे नाही. ज्यांना जो संदेश मिळायला हवा तो मिळायचा. त्यामुळे आई-बाबा आणि मुलेही एकत्रितपणे ही जाहिरात पाहू शकायचे. कंडोमच्या अशा संस्कारित जाहिरातींचा जमाना कधीच गेला. आता बिपाशा बासूपासून ते सनी लिओनीपर्यंतचा काळ आहे. नको त्या वयात अनेक प्रश्न पडावेत, असेच हावभाव यात असतात. हे कमी म्हणून की काय यातही स्ट्रॉबेरी, पायनॅपल, ब्लूबेरी असे फ्लेव्हर्सही असतात. या आइस्क्रीम फ्लेव्हर्सचे मुलांना आकर्षण नाही झाले तरच नवल. त्यामुळे व्हायचे तेच झाले. संस्कार आणि संस्कृतीचे ढोल बडविणाºया सरकारने सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखविण्याला निर्बंध घातले. पोरांच्या भविष्याची चिंता लागलेल्या पालकांचा जीव एकदाचा भांड्यात पडला; पण म्हणून न कळणा-या वयात कुसंस्कार घडविणारे सारेच मार्ग बंद झाले का? स्मार्ट फोनचा हा जमाना आहे. त्यावर पोर्न साईटस्चा खुला बाजार आहे. हे कमी म्हणून की काय, प्राईम टाईमला दाखविल्या जाणाºया हिंदी आणि काही मराठी मालिंकामध्येही विवाहबाह्य संबंध, सासू-सुनेची भांडणे याचाच बोलबाला आहे. अशा वातावरणात कंडोमच्या जाहिरातींवर दिवसा बंदी घालून या सरकारने काय मिळविले? पोर्न साईटस्संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान अलीकडेच केंद्राने यावर प्रतिबंध घालणे शक्य नसल्याचे म्हटले. दाखवायचे काहीच शिल्लक नाही, अशा साईटस् खुलेआम ठेवायच्या आणि कंडोमच्या जाहिरातींना प्रतिबंध घालायचा, यात काय हाशील? एड्सग्रस्तांच्या यादीत जगभरात आपला भारत तिस-या स्थानावर आहे. एका अहवालानुसार भारतात २०१५ साली १.५६ कोटी गर्भपात झाले आहेत. गर्भपाताच्या आकडेवारीत आम्ही शेजारी देश नेपाळ आणि बांगलादेशच्याही पुढे आहोत. केवळ कुटुंब नियोजनासाठीच नव्हे, तर सुरक्षित यौन संबंधांसाठीही कंडोमचा वापर तेवढाच महत्त्वाचा आहे. एकीकडे शालेय अभ्यासक्रमापासून सेक्स एज्युकेशन शिकविले जावे, यावर आम्ही चर्चा करीत असतो आणि त्याचवेळी वाईट संस्कार होतात म्हणून दिवसा कंडोमच्या जाहिरातीवर बंदी घालतो. या आपल्या परस्परविरोधी विचाराला तोड नाही. माहिती तंत्रज्ञानाचा हातात हात धरून जगणाºया या जगात आजही आम्ही लहान मुलांना देवाच्या घरातून माणसाचा जन्म होतो, असे सांगतो. कुटुंब थोडेफार सुधारलेले असेल तर माणसे रुग्णालयात जन्मतात, असे सांगतो. जगभरातील अनेक देशांत लहान मुलांना रुग्णालयात नेऊन माणसाचा जन्म कसा होतो, हे दाखविले जाते. ही हिंमत आम्ही दाखवू शकणार नाही. जगाशी आम्हाला काहीच देणे-घेणे नाही. आमच्या मुलांना आम्हाला बिघडू द्यायचे नाही, बस्स. पालकांना हे जे वाटते तेच सरकारलाही वाटते आहे. खजुराहोतील मिथुन शिल्प पाहिले की प्रश्न पडतो, ‘हजारो वर्षांपूर्वींचे आपले पूर्वज प्रगल्भ होते, की चंद्रावर पोहोचलेले आपण सारे विज्ञाननिष्ठ ?’ आज सरकारची आणि पालकांचीही स्थिती १९८६ साली आलेल्या ‘अनुभव’ चित्रपटातील शेखर सुमनसारखी झाली आहे. आम्हाला निरोध तर हवा आहे; पण मेडिकलच्या दुकानात जाऊन ते मागण्याची हिंमत आमच्यात नाही. अशा गोंधळलेल्या वातावरणात पुढच्या पिढीचे काय होणार, देव जाणो?


Web Title: That's right ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.