श्री श्री श्री श्री श्री रविशंकर प्रसाद परसाईंची हास्यकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 08:07 AM2018-03-24T08:07:12+5:302018-03-24T08:07:12+5:30

काळ मोठा कठीण आहे आणि अशा खडतर काळात देशाला हास्यगुटिका देऊन आनंदी ठेवण्यासाठी रविशंकर प्रसादांसारख्या विनोदवीरांची नितांत गरज आहे. देश सध्या विचित्र कालखंडातून चालला आहे.

Ravishankar prasads statement is a big joke | श्री श्री श्री श्री श्री रविशंकर प्रसाद परसाईंची हास्यकथा!

श्री श्री श्री श्री श्री रविशंकर प्रसाद परसाईंची हास्यकथा!

- मुकेश माचकर

काळ मोठा कठीण आहे आणि अशा खडतर काळात देशाला हास्यगुटिका देऊन आनंदी ठेवण्यासाठी रविशंकर प्रसादांसारख्या विनोदवीरांची नितांत गरज आहे. देश सध्या विचित्र कालखंडातून चालला आहे. चार वर्षांपूर्वी मोठमोठी स्वप्नं दाखवून सत्तेत आलेल्या सरकारने इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. जगातले सर्वात भाषणबाज (हे दारूबाजच्या चालीवरही म्हणता येईल) पंतप्रधान आपल्या देशाला लाभले आहेत, हे सांगायला युनेस्कोच्या सर्टिफिकेटाची गरज नाही. ग्रामपंचायतींपर्यंतच्या सर्व निवडणुकांचा प्रचार आणि जगातला एकही देश सोडायचा नाही, अशा हिरीरीने केलेले विदेश दौरे यांच्यातून मिळालेल्या वेळात त्यांनी जे दोन-तीन क्रांतिकारक निर्णय केले, ते देशाच्या अंगलट आले आहेत. बेरोजगारी, जातीय, धार्मिक दुफळी, गतगौरवी छद्म विज्ञानाची भलामण, सरकारधार्जिण्या मोजक्या उद्योगपतींची भरभराट आणि सगळा देश शब्दश: पादाक्रांत करण्याच्या, म्हणजे टाचेखाली आणण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडून फक्त येनकेनप्रकारेण निवडणुका जिंकण्याचं मशीन बनलेला सत्ताधारी पक्ष ही काही फारशी समाधानकारक परिस्थिती नाही. त्यामुळेच आनंदी देशांच्या यादीत आपला देश पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशापेक्षाही मागे पडला आहे. 

अशा आनंद-ओसाड देशात हास्याचे मळे फुलवण्याचा प्रयत्न भाऊ कदम, सागर करंडे, कुशल बद्रिके, कपिल शर्मा यांच्यासारखी मंडळी जीव तोडून करत आहेत. पण, त्यांनाही जे जमलेलं नाही, ते श्री श्री श्री श्री श्री (पंचश्री म्हणूयात यापुढे यांना आपण) रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे. त्यांच्या विधानांनी देशभर हास्याची अशी काही लाट उसळवली आहे की अजून सगळा देश हसतो आहे. गंमत म्हणजे त्यांच्या विधानांनी इतर देशांमधल्या विमनस्क चेहऱ्यांवरही हास्य फुलवलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव बदलून रविशंकर प्रसाद परसाई असं ठेवायला हवं, अशी मागणी देशात जोर धरू लागली आहे. 

हिंदीमधले जानेमाने व्यंगकार, हास्यकथा लेखक हरिशंकर परसाईंना त्यांच्या निधनानंतर २३ वर्षांनी खरा वारसदार मिळाला आहे. इथे पंचश्री रविशंकर (प्रसाद) परसाईंची अप्रतिम व्यंगरचना मुळाबरहुकूम देण्याचा मोह आवरत नाही. फेसबुक या सोशल मीडियावरच्या लोकप्रिय महाकंपनीने त्यांच्या खातेदारांची माहिती डेटा मायनिंग करणाऱ्या, म्हणजे अशा माहितीचा विविध प्रकारच्या मार्केटिंगसाठी, राजकीय सामाजिक कल बदलवण्यासाठी करणाऱ्या खासगी कंपनीला उपलब्ध करून दिला, अशी माहिती उघडकीला आली आहे. अशा एका कंपनीने काँग्रेसला गुजरातच्या निवडणुकीत मदत केल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला. प्रसाद यांचा पक्ष ही निवडणूक कसाबसा जिंकला आणि परसेप्शनची लढाई मात्र हरला. 

या सगळ्या दु:खदायक पार्श्वभूमीवर एखाद्याला इतकी विनोदी रचना सुचणं, हे खरंच प्रतिभावंताचं लक्षण मानायला हवं. दैवी देणगी आणि सरस्वतीचा वरदहस्त असल्याखेरीज असं काही बोलता किंवा लिहिता येत नाही. तर रविशंकरांची ती अजरामर रचना येणेप्रमाणे :
‘मी अगदी स्वच्छपणे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही (म्हणजे केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार) वृत्तपत्रस्वातंत्र्य, उच्चारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांना संपूर्ण पाठिंबा देतं (खो खो खो खोSSSS, इथे श्रोत्यांना पद्मावत, दीपिका पदुकोनचं नाक आणि संजय लीला भन्साळीचं शिर आठवून खो खो हसायला येत असावं. पण, हे लक्षात घ्या की करणी सेनेलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि रिपब्लिक चॅनेल, झी न्यूज, अर्णब गोस्वामी हे सगळे सरकारी निकषांनुसार, म्हणजे सरकारच्या योजनांची सकारात्मक प्रसिद्धी करणारे, पत्रकार आहेत. त्यांच्या स्वातंत्र्याची पाठराखण या सरकारने केली नाही, असं कोण म्हणेल?). सोशल मीडियावर मुक्तपणे कल्पनांची देवाणघेवाण व्हावी, यालाही आमचा पाठिंबा आहे (खो खो खो खोSSSS, मुक्तपणे विचारांची देवाणघेवाण व्हावीच लागते, त्याशिवाय आपले कोण आणि फेक्युलर, खांग्रेसी कोण, हे कळत नाही. एकदा ते क्लियर झाले की पगारी-बिनपगारी आणि फुलअधिकारी किंवा नुसतेच बेगानी शादी में नाचणारे बिनफोटोचे अब्दुल्ला दीवाना यांची ‘ट्रोळी’ त्यांच्यावर सोडता येते... फ्रीडम कम्स विथ अ प्राइस म्हणतात ते काय उगाच!). मात्र, फेसबुकसह कोणत्याही सोशल मीडियाने उघडपणे वा छुपेपणाने, अवांच्छित मार्ग वापरून भारताची निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही आणि सहनही केलं जाणार नाही.’
रविशंकरांच्या या विधानानंतर देशात ३४७ लोक हसता हसता खुर्चीतून पडून जखमी झाल्याचं वृत्त आहे. १३ माणसांना हसण्यातून श्वास घेण्याचीच फुरसत न मिळाल्याने त्यांचा ऊर्ध्व लागला आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आणखी दोन महिने त्यांना कोणतेही विनोदी कार्यक्रम, सिनेमे दाखवू नयेत, सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांची भाषणं दाखवू नयेत, रविशंकर प्रसाद हे नावही त्यांच्यासमोर उच्चारू नये, अशी सक्त ताकीद डॉक्टरांनी दिली आहे.  

आतली गोष्ट अशी की या विधानानंतर रविशंकरांना त्यांच्या पक्षश्रेष्ठांनी (म्हणजे कोण, इन मीन दोन) भलतंच फैलावर घेतलं म्हणे. देशाचे कायदामंत्री असलेले रविशंकर असं विधान करून गेले आहेत की ते कोणीही दहा टक्के गांभीर्याने घेतलं तरी सध्याचं सरकार स्वेच्छेने बरखास्त करावं लागेल. सोशल मीडियावर छुपे/उघड अवांच्छित मार्ग वापरण्याबद्दल रविशंकरांनी ताकीद द्यायची असेल, तर उद्या प्रवीण तोगडिया हे ‘शांतीचा धर्म : इस्लाम’ या विषयावर व्याख्यान देताना दिसू शकतील आणि संबित पात्रा ‘तर्कशुद्ध युक्तिवादाचं महत्त्व’ सांगू लागतील आणि सुषमा स्वराज ‘मर्यादशील बोलण्याचं महत्त्व’ सांगायला लागतील... शिवाय पंतप्रधान ‘काटकसरीचं महत्त्व’ सांगून दोन वेळच्या जेवणाला मोताद असलेल्या भिकाऱ्यांना एक वेळचं जेवण ‘गिव्ह अप’ करायला प्रेरित करतील ते वेगळंच. सोशल मीडियाचा निवडणुका प्रभावित करणारा गैरवापर थांबवायचा, तर आधी भाजपची ट्रोलसेना विसर्जित करावी लागेल? ‘मेक इन इंडिया’च्या आधीच दिले गेलेले एवढे रोजगार काढून घेणं सरकारला परवडेल काय? महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंपासून सोनिया गांधी-मनमोहन सिंह-राहुल गांधींपर्यंत कोणत्याही नेत्याची मागणीनुसार हुकमी बदनामी करणाऱ्या छद्मप्रतिमा तयार करणाऱ्या फोटोशॉपप्रवीण युवकांना स्वयंरोजगार मिळवून देणारी एक प्रकारची अभयमुद्रा योजनाच बंद करावी लागेल. या सगळ्या तैनाती फौजा त्यांच्या युद्धकौशल्यांसह शत्रूला जाऊन मिळाल्या तर किती हाहाकार उडेल. रविशंकर प्रसादांनी विनोदाविनोदात केवढ्या मोठ्या मोहोळावर दगड मारला होता, विचार करा.
पण, त्यांनी लगोलग केलेल्या अप्रतिम, अभिजात विनोदाने हे मोहोळ उठण्याचा धोका टळला. त्यांनी थेट फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यालाच ललकारलं. भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचे शब्द लक्षात ठेव बेटा. आमच्या देशातली माहिती फेसबुकच्या माध्यमातून कोणी चोरली, तर आमच्याकडे कठोर कायद्यांचं बळ आहे. आम्ही गरज पडली तर तुलाही भारतात हजर राहायला भाग पाडू. तुझ्यावर समन्स बजावू. 

हे ऐकल्यावर मार्क झकरबर्ग रडू लागला म्हणतात... हसू अनावर झाल्याने त्याचे डोळे पाणावले होते, हे नंतर लक्षात आलं. तीच अवस्था देशातही अनेकांची झाली. ललित मोदी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या हे चुन्याचे घाऊन व्यापारी (बँकांना चुना लावण्याचे स्पेशालिस्ट) तर वेळात वेळ काढून खो खो हसले म्हणे. रविशंकरांच्या पक्षात फिल्मी जनता खूप आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या सगळ्याच नेत्यांना फिल्मीपणा करण्याची उबळ फार येते. सलीम-जावेद यांनी लिहून दिलेले संवाद असावेत, अशा थाटात ‘ईंट से ईंट बजा देंगे’ छाप भाषणबाजी करण्यापासून ते ‘याला फरपटत आणू, त्याला खेचून आणू’ अशा गर्जना करण्यापर्यंत नाना प्रकारचा फिल्मीपणा ही मंडळी करतात. आपल्या पक्षाच्या नावावर कंदाहारसारखा भीष्मपराक्रम आहे, याचा यांना नेमका विसर पडतो. मार्क झकरबर्ग हा व्यापारी आहे. त्याचा भारतात मोठा धंदा आहे. इथलं गिऱ्हाईक त्याला तोडून चालणार नाही. त्यामुळे तो रविशंकर प्रसादांनी बोलावणं धाडलंच तर हजरही होईल बापडा. पण, इतकेच तुमचे कायदे कठोर आहेत आणि ते राबवायला तुम्ही सक्षम आहात तर जरा ललित, नीरव, मेहुल, विजय यांना पाठवा की राव समन्स!
सगळ्यात धमाल म्हणजे रविशंकर परसाईंनी इकडे हे आरोप केले, काँग्रेसला कसं कोंडीत पकडलं, म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतली, तेव्हा भाजपचे आयटी सेलवाले कोणातरी हिमांशु शर्माचं नाव खोडून काढायच्या मागे लागले. इंटरनेट कुछ नहीं भूलता, हे त्यांच्या गावीही नसावं. हा शर्मा केंब्रिज अॅनालिटिका आणि भाजप यांच्यातला दुवा होता, हे लगेचच उघड झालं आणि भाजपबरोबरच सदास्वच्छ नीतीश कुमार यांनीही या कंपनीच्या सेवा घेतल्या होत्या, हे स्पष्ट झालं. भाजपने तर एका नव्हे चार निवडणुकांमध्ये भाजपसाठी काम केलं आहे. हे काम त्यांनी पेरू आणि चिली या देशांमधल्या डेटाच्या आधारावर केलं असावं. 

मान्यवर रविशंकर प्रसादांना आणखी विनोद सुचण्याच्या आत थांबवणं आवश्यक आहे. नाहीतर रविशंकराच्या हास्यकथा वाचून मेलेल्यांचा आकडा हा नोटाबंदीत रांगेत मरण पावलेल्यांच्या आकड्याचा विक्रम मोडून काढेल, अशी दाट शक्यता आहे. फेसबुक हे भारतात पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यातल्या डेटाचं मायनिंग करणारा माणूस (आधीच वेडा नसल्यास) नंतर वेडा होईल. इथे निम्मी अकाउंट फेक आहेत. बायकांची निम्मी अकाउंट पुरुषच चालवतात. इथे सगळेच जण स्वत:चे बनावट सुंदर फोटो डीपी म्हणून वापरतात आणि रस्त्यातल्या कोणत्याही गाडीला खेटून उभे राहून सेल्फी काढून तो कव्हरवर टाकतात. स्वत:ची ७० टक्के व्यक्तिगत माहिती खोटी देतात. अशा लोकांचा आधीच बनावट असलेला डेटा वापरून कोण कसलं कपाळाचं मायनिंग करणार, कसले निष्कर्ष काढणार आणि कशी सरकारं उलथवणार.
रविशंकर शेठ, त्यापेक्षा अस्सल डेटा मायनिंग तर आधारच्या सगळ्या गावाला उपलब्ध असलेल्या डेटामधून होऊ शकतं... हा डेटा असाही चोरापोरांच्याच ताब्यात आहे...

...या गोष्टीकडे लक्ष जाऊ नये, म्हणूनच रविशंकर परसाई या हास्यकथा सांगून राहिले आहेत की काय!
कारण काहीही असो, खूप काळाने रविशंकरांच्या मुखातून असा निर्भेळ आणि निर्मळ विनोद ऐकायला मिळाल्यामुळे स्वर्गात हरिशंकर परसाईंनाही त्यांच्याच कथासंग्रहाच्या शीर्षकाप्रमाणे ‘हँसते रहे, रोते रहे’ असा अनुभव आला असेल.
 

Web Title: Ravishankar prasads statement is a big joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.