भाषा राजहंसांची, भांडणे गिधाडांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:41 AM2017-08-21T00:41:03+5:302017-08-21T00:44:19+5:30

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोट बांधणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची गिधाडे झाली आहेत. ही गिधाडांची उपमा शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी राजकारण्यांना उद्देशून दिली होती. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कृषी खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्या गिधाडांमध्ये सामील झाले आहेत.

 Language Rajhanshan, fight vultures! | भाषा राजहंसांची, भांडणे गिधाडांची!

भाषा राजहंसांची, भांडणे गिधाडांची!

Next

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोट बांधणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची गिधाडे झाली आहेत. ही गिधाडांची उपमा शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी राजकारण्यांना उद्देशून दिली होती. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कृषी खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्या गिधाडांमध्ये सामील झाले आहेत. गिधाडांच्या गुणवैशिष्ट्यांप्रमाणे त्यांच्यात झगडा सुरू आहे. तो इतका टोकदार झाला आहे की दोन-चार वर्षांपूर्वी खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या हितासाठी रक्त सांडणारे आणि घामाचे दाम मागणारे एकमेकांना उघडे-नागडे करू लागले आहेत. ऊसकरी शेतकऱ्यांचे आंदोलन छेडताना साखर कारखानदारांशी दोघे मिळून बोलणी करीत होते. याचेही स्मरण सदाभाऊ खोतांना आता होत नाही. राजू शेट्टी साखर कारखानदारांशी बोलताना एक भूमिका आणि शेतकºयांना दुसरीच भूमिका सांगत होते, असा गौप्यस्फोट केल्याच्या आविर्भावात सदाभाऊ बोलू लागले आहेत.
वास्तविक, या दोघांना भाजपने खेळवायचे ठरविले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात आहे. भाजपला या गडात स्थान हवे होते. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात या संघटनेने विरोधकाची भूमिका बजावली होती. त्यांच्या खांद्यावर बसून मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने भरभरून मते घेतली. घटक पक्ष म्हणून एक राज्यमंत्रिपदाचा तुकडा टाकला, ऊसकरी शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारने ना भूमिका घेतली ना ठोस निर्णय केले. त्यामुळे सत्तेत जाऊन आपण फसविलो गेल्याची भावना राजू शेट्टी यांची होती. सदाभाऊ यावर सहमत नव्हते. त्यातून यांच्यात गिधाडांसारखी भांडणे सुरू झाली. ती भाजपला हवीच होती. सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर मंत्रिपदावरूनही हटवावे ही राजू शेट्टी यांची मागणी भाजपने धुडकावली आहे. घटक पक्ष म्हणून राहणार असाल तर आणखीन एक राज्यमंत्रिपदाचा तुकडा देत आहोत, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. दरम्यान,माझ्या राजीनाम्याची मागणी करणारे राजू शेट्टी कोण, असा सवाल सदाभाऊ खोत करू लागले आहेत. मी भाजपचा मंत्री आहे, असे सांगत असले तरी कालपरवापर्यंत शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवरुन उतरविलेला नाही, असे उर बडवित सांगत होते. मंत्रिपदाची झूल अंगावर चढल्यानंतर राजू शेट्टी कोण असा प्रश्न पडत असेल तर तो बिल्ला तरी कशाला लावायचा? शेतकºयांचा पोर आहे म्हणून सांगण्यासाठीच का? शरद जोशी यांनी सुरुवातीच्या काळात ‘सर्वच पक्ष चोर’ आहेत, अशी भूमिका घेऊन त्यांना गिधाडांची उपमा दिली होती. पुढे ही  भूमिका बदलत भाजपशी त्यांनी सलगी केली. तेव्हा याच राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी सवाल केला होता की, ‘गिधाडे राजहंस कधी झाली?’ एवढेच करून ते थांबले नाहीत, तर स्वत:चा स्वाभिमान जागा करीत आहोत, असा आविर्भाव निर्माण करीत स्वाभिमानी संघटना स्थापन केली. सर्वच राजकीय पक्षांपासून दूर राहात ती वाढविण्याचा प्रयत्न केला. ऊसकरी शेतकºयांचे प्रश्न लावून धरले. सरकारला सळो की पळो करून सोडले. मात्र आपले हात भाजताच, सरकारने शेतकरी आणि साखर कारखानदार यांनी आपापले बघून घ्यावे, अशी पळवाट शोधली. ही सर्व या दोघांची यशस्वी वाटचाल होती. पण त्यांना राजहंसांची गिधाडे बनण्याची घाई झाली होती. ज्या शरद जोशींना सवाल करीत गिधाडांना राजहंस करता का, असे म्हटले होते, त्यांनीच गिधाडांची रुपे धारण केली. सदाभाऊ खोतांना भाजप जवळचा वाटू लागला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना त्यांना पाच लाख मते पडली होती, ती सदाभाऊ खोत या शेतकरी पोराला मिळाली होती. संघटना, शिवसेना, भाजप, काँग्रेससह राष्टÑवादीला विरोध करणाºया सर्वांची त्यांना मदत झाली होती, हे ते विसरले आहेत. त्याच बळावर सदाभाऊ ओळखले जाऊ लागले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजहंसाच्या भूमिकेतून गिधाडांच्या कळपात राजू शेट्टी घेऊन जात होते तेव्हा हा कोण राजू शेट्टी, असे विचारावे, असेही त्यांना वाटले नाही. साखर कारखानदारांशी संघर्षाची भाषा करीत शेतकºयांना राजू शेट्टी कसे फसवित होते, याचा मी साक्षीदार आहे, असे आता सांगत आहेत. याच संघटनेच्या व्यासपीठावरून स्वत:ची ओळख मुलूखमैदान तोफ म्हणून करून देत होते. ती त्यांची भाषा फसवी होती का, असा साधा प्रश्नही त्यांना पडत नाही. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात संघर्षाची धार असलेली ही एकमेव संघटना आहे. ती संपल्याशिवाय प्रमुख विरोधकाची भूमिका आपणास मिळणार नाही, हे जाणून भाजपने दोघा शेतकरी नेत्यांची भांडणे पाहणे पसंत केले. आता त्याचा कडेलोट झाला आहे, त्यातील सदाभाऊ आमचे, राजू शेट्टी यांनी आपले ठरवावे, असाही इशारा भाजपने दिला आहे. राजहंसाची भूमिका सोडून राजकारण्यांच्या कळपात जाण्याची घाई झाली की, शेतकरी चळवळ कशी बाजूला पडते, याचे हे आणखी एक मोठे उदाहरण ठरले आहे. शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीला दिशा दिली होती; पण त्याचवेळी राजकीय उतावीळपणाही दाखविला होता. तीच परंपरा त्यांचे चेले चालवत आहेत. यात शेतकºयांचे हित नक्कीच नाही.

Web Title:  Language Rajhanshan, fight vultures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.