Karnataka Elections 2018 : बेळगावात भाजपा किंवा काँग्रेस जिंकणार, हमखास हरणार तो मराठी माणूसच !

By तुळशीदास भोईटे | Published: April 26, 2018 06:11 PM2018-04-26T18:11:48+5:302018-04-26T18:11:48+5:30

सीमाभागातील मराठी माणसांच्या एकजुटीच्या घोषणा दिल्या देत असतानाच सध्या तरी चार महत्वाच्या मतदारसंघांमध्ये समितीच्या नावावर दोन-दोन उमेदवार आहेत. त्यामुळे जर शुक्रवारपर्यंत उमेदवारी मागे घेऊन एक समिती, एक उमेदवार असे घडवलं नाही तर मराठी माणसांचे भवितव्यच बिघडू शकेल. महाराष्ट्रातील शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते दखल घेतील?

Karnataka Assembly Elections 2018 Fear of defeat of Marathi Candidates in Belgaon due to rift in Maharashtra Ekikaran Samitee | Karnataka Elections 2018 : बेळगावात भाजपा किंवा काँग्रेस जिंकणार, हमखास हरणार तो मराठी माणूसच !

Karnataka Elections 2018 : बेळगावात भाजपा किंवा काँग्रेस जिंकणार, हमखास हरणार तो मराठी माणूसच !

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...वर्षानुवर्षे मनामनातील एकच नाद...मात्र तसूभरही कमी न झालेला जोश...मिळणारा प्रतिसादही. कर्नाटकात डांबला गेलेल्या महाराष्ट्राच्या मराठी सीमाभागातील तमाम मराठी माणसांच्या मनातील एकच भावना...आपल्या मराठी माणसांच्या महाराष्ट्रात जायचं. कानडी जाचातून सुटका करुन घ्यायची. त्यासाठी वाट्टेल त्या दडपशाहीला तोंड देत सीमाभागातील मराठी माणसे मराठीसाठी कायम लढा देत असतात. निवडणुका आल्या की ही मराठी माणसे आपल्या मराठी उमेदवारांना...समितीच्यावतीने लढणाऱ्या मराठी उमेदवारांना निवडून देण्यासाठी वाट्टेल ते करु पाहतात. करतातही. मात्र गेल्या काही वर्षांपासून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात मराठी माणसांच्या हक्काच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.


सीमाभागातील मराठी माणसे हा भूप्रदेश मराठी, कानडी दडपशाही नको अशी आर्त हाक देतात तेव्हा स्वाभाविकच मराठी राजकारण्यांनी मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवावी, असं वाटते. यावेळी तसे ठरलेही. मेळावाही झाला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या व्यासपीठावरून ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील आणि शरद पवार यांनी एकीसाठी आवाहन केले. मात्र प्रत्यक्षात आज उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत तरी एकीचे काही खरे नाही असेच चित्र होते.


सीमाभागातील चार विधानसभा मतदारसंघ मराठींसाठी महत्वाचे. बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर. मात्र शक्य असूनही चारपैकी दोनच मतदारसंघात संभाजी पाटील आणि अरविंद पाटील हीच समितीची दोन मराठी माणसे आमदार म्हणून निवडून आली. आजचा विचार केला तर त्यांचेही अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसत आहे. त्याचे कारण आहे मराठी माणसांना कायमच बाधणारा दुहीचा शाप. 


नाव एकीकरण समिती. मात्र तेथेही दुही. एक मध्यवर्ती एकीकरण समिती. दुसरी शहर एकीकरण समिती. मध्यवर्ती एकीकरण समितीने मेळावा घेतला. एकोप्याने लढण्याचे घोषीत केले. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न प्रामाणिकपणे झाले का, याबद्दलच शंका आहे.  

समिती एक, उमेदवार दोन

मतदारसंघ   मध्यवर्ती समिती  शहर समिती 
बेळगाव दक्षिण प्रकाश मरगाळे किरण सायनाक
बेळगाव उत्तरसंभाजी पाटील       बाळासाहेब काकतकर
बेळगाव ग्रामीणमनोहर किणेकर   मोहन बेळगुंदकर
खानापूरअरविंद पाटील       विलास बेळगावकर  

बेळगाव दक्षिणचे भाजपाचे आमदार अभय पाटील यांना पाडणे सहज शक्य असल्याचे मानले जात होते. मात्र तेथे समितीचे दोन उमेदवार असल्याने त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. स्थानिक जाणकारांच्या मते, जर मध्यवर्ती समितीने संमजसपणा दाखवत प्रकाश मरगाळे यांचा अर्ज मागे घेतला तर किरण सायनाक यांची बाजू बळकट होईल. तसंच इतर तीन मतदारसंघातील स्थानिक समितीच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी तयार करता येईल. महाराष्ट्रातील नेत्यांनी मनावर घेतले तर दुहीच्या शापातून समिती मुक्त होऊ शकेल.


अवघे काही तास बाकी आहते. महाराष्ट्रातील एन.डी.पाटील, शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते मराठी एकीसाठी तेथे लक्ष देणार का ? आजच्या रात्रीत बरंच काही घडू शकेल. मराठी नेत्यांनी समजूत घातली. किरण ठाकूर यांनी मनावर घेतले, तर खूप काही होऊ शकेल. 


उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारपर्यंत आहे. माघार घेतली गेली नाही. जर रिंगणात मध्यवर्ती आणि शहर अशा दोन्ही समितींचे उमेदवार कायम राहिले तर दुही भोवणारच भोवणार. जर मराठी मतांची अशी दोन उमेदवारांमध्ये विभागणी झाली तर यश काँग्रेस किंवा भाजपालाच मिळू शकेल. मात्र पराभव हमखास मराठी माणसांचाच होईल.

Web Title: Karnataka Assembly Elections 2018 Fear of defeat of Marathi Candidates in Belgaon due to rift in Maharashtra Ekikaran Samitee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.