कर्तबगारांना एकाच वेळी हिरावून नेणारी दुर्घटना !

By राजेंद्र दर्डा | Published: April 26, 2018 11:12 AM2018-04-26T11:12:19+5:302018-04-26T11:12:19+5:30

आजपासून बरोबर २५ वर्षांपूर्वी २६ एप्रिल १९९३ रोजी येथे घडलेल्या या भीषण दुर्घटनेचे, त्यात ५५ जणांचा कोळसा झाल्यावर ऐकलेल्या आप्तेष्टांच्या किंकाळ्यांचे आणि ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेल्या दृश्याचे पुसट स्मरण जरी झाले तरी अजूनसुद्धा अंगाचा थरकाप उडतो. 

Incidentally took away the craftsmans ! | कर्तबगारांना एकाच वेळी हिरावून नेणारी दुर्घटना !

कर्तबगारांना एकाच वेळी हिरावून नेणारी दुर्घटना !

आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले शहर ही आजच्या औरंगाबादची एक महत्त्वाची ओळख! याच औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर २५ वर्षांपूर्वी एका वेळी तीन विमाने थांबू शकत नव्हती. नाईट लँडिंगचीसुद्धा सोय नव्हती. धावपट्टीला लागूनच बाहेरून बीड महामार्ग जात होता. विमान येण्या-जाण्याच्या वेळेस त्यावरील वाहतूक बंद केली जायची. हे लहानसे विमानतळ त्यावेळी दिल्ली-मुंबई बोइंग ७३७ आयसी-४९१ विमानाला येथे झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे अचानक जगाच्या हवाई नकाशावर आले. 

आजपासून बरोबर २५ वर्षांपूर्वी २६ एप्रिल १९९३ रोजी येथे घडलेल्या या भीषण दुर्घटनेचे, त्यात ५५ जणांचा कोळसा झाल्यावर ऐकलेल्या आप्तेष्टांच्या किंकाळ्यांचे आणि ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेल्या दृश्याचे पुसट स्मरण जरी झाले तरी अजूनसुद्धा अंगाचा थरकाप उडतो. मला आजही त्या सोमवारची दुपार आठवते. त्यावेळी संपादकीय-मॅनेजमेंटच्या बैठकीत उद्याच्या अंकाच्या नियोजनावर चर्चा सुरू होती. अचानक ‘लोकमत’च्या समोरील जालना रोडवरून फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या सायरन वाजवत विमानतळाच्या दिशेने भरधाव गेल्या. टेलिफोन आॅपरेटरला लगेच फायर ब्रिगेडला फोन करून माहिती घेण्यास सांगितले. त्यानंतर एकाच मिनिटात विमानाला अपघात झाल्याची माहिती आॅपरेटरने मला दिली. त्यावेळी माझ्याकडे लाल रंगाची मारुती-८०० कार होती. लगेच कार काढली आणि तातडीने आम्ही दोघे-तिघे जालना रोडने निघालो. अपघात नेमका कुठे झाला याची कल्पना नव्हती. चिकलठाणा गावाजवळ पोहोचलो असता गावकरी घोळक्याने जालना रोडने धावत सुटल्याचे दिसत होते. आज जेथे केम्ब्रिज शाळा आहे, तिच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून थोड्याच अंतरावर विमानाचे तुकडे होऊन पेट घेतल्याचे दिसले. विमान पेटलेले होते. तेथे त्यावेळी एक पोलीस वाहन, फायर ब्रिगेडच्या २ गाड्या आणि २०-२५ लोक होते. नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत २५ ते ३० हजारांचा जमाव याठिकाणी जमला होता. असेही घडू शकते, यावर विश्वासच बसत नव्हता. आजही ते दृश्य नजरेसमोर आले, की अंगावर शहारे येतात. तीन शकले होऊन पेटलेल्या या विमानातील ११२ प्रवासी व ६ कर्मचारी यापैकी कुणीही बचावला नसावा, अशी शंका यावी, असे ते दृश्य होते. इंडियन एअरलाइन्सच्या दिल्ली-जयपूर-उदयपूर-औरंगाबाद-मुंबई विमानाच्या या दुर्घटनेत ५३ प्रवासी आणि २ कर्मचारी, अशा ५५ जणांचा बळी गेला होता. विमानाचे तीन तुकडे झाले होते. या तुकड्यांतून पटापट उड्या मारून बाहेर पडलेले प्रवासी सुदैवी ठरले. मात्र, विमानाच्या मागील भागातील सर्व, तर समोरच्या भागातील काही प्रवासी मृत्युमुखी पडले होते. यातील काही जण जळून, तर काही गुदमरून मरण पावले. उड्या मारून बाहेर पडलेले प्रवासी दिसेल त्या लोकांच्या मदतीने शहराकडे निघून जात होते. त्यामुळे नेमके किती प्रवासी सुखरूप आहेत, याचा रात्री उशिरापर्यंत अंदाज बांधणेही कठीण जात होते. 

विमानातून बचावासाठी उडी मारल्याने जखमी झालेले प्रवासी, त्यांना इस्पितळात नेण्यासाठी चाललेली धावपळ, ठिकठिकाणी जळालेल्या स्थितीत पडलेले मृतदेह, विमानात अडकून पडलेल्या प्रवाशांना, तसेच मृतदेह बाहेर काढण्याची लगबग, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ, या परिस्थितीत प्रवाशांना मदत करणारे नागरिकांचे हात हे संपूर्ण चित्रच मन विषण्ण करणारे होते. मृत्युमुखी पडलेली माणसे लाखमोलाची. औरंगाबादच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली. व्हिडिओकॉनचे नंदलाल धूत, ए.डी. जोशी, पी.यू. जैन-ठोले, हॉटेल गुरूचे जव्हारानी, राजेंद्र मोटार्सचे दीपक मुनोत, व्ही.ए. जाधव यांच्यासह ५५ जणांचा दुर्दैवी मृत्यू मनाला खूपच चटका लावून गेला. रामप्रसाद बोर्डीकर, अनिल भालेराव, अरुण मुगदिया, अनिल माछर, तत्कालीन पोलीस अधिकारी अय्यंगार यांच्यासह ६३ जण सुदैवाने बचावले. विमान अपघाताकरिता नंतर चौकशीत दोषी आढळलेले विमानाचे पायलट व महिला को-पायलट हे दोघेही बचावले होते. जखमींना विविध इस्पितळात भरती करण्यात आले. गंभीर जखमींना खास विमानाने मुंबईला हलविण्यात आले. त्यानंतर ऐकायला आलेली दुर्घटनेची विविध कारणे तर सर्वांची झोपमोड होईल, अशीच होती.

मुंबईहून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तातडीने येथे पोहोचले होते. मोठी धावपळ करीत सूर्यास्तापर्यंत तत्कालीन नागरी उड्डयनमंत्री गुलाम नबी आझाद विमानाने औरंगाबादेत दाखल झाले. रात्री २ वाजेपर्यंत त्यांची धावपळ सुरू होती. दुसऱ्या दिवशी २७ एप्रिलला सकाळी दिल्ली गाठून त्यांनी लोकसभेत अपघाताची माहिती दिली. त्यांनी न्यायालयीन चौकशीची घोषणा केली. त्यात दोन्ही वैमानिकांची चूक, विमान उड्डाणाच्या काळात धावपट्टीशेजारच्या महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यात एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीला आलेले अपयश यास कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले होते. इंडियन एअरलाइन्समधून बाहेरचा रस्ता दाखविण्याशिवाय दोषी वैमानिकांना पुढे काय कठोर शिक्षा झाली, हे आज पंचवीस वर्षानंतरही गुपितच आहे.
औरंगाबाद शहराचा त्यावेळी फार व्याप नव्हता. या शहरातील अनेक कर्तबगार उद्योगपती, समाजसेवींचा यात अंत झाला. या कर्तबगारांना एकाच वेळी काळाने हिरावून नेले. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.

काय घडले त्या दिवशी ?
दुपारी १ वाजून २० मिनिटांनी विमानाने चिकलठाणा विमानतळावरून मुंबईसाठी उड्डाण केले. उड्डाणासाठी आवश्यक उंची विमानाला गाठता आली नाही. त्यामुळे धावपट्टीला लागूनच बीड महामार्गावर उभ्या उंच ट्रकला विमानाचे मागील चाक चाटून गेले. उडणारे विमान पाहण्यासाठी चालकाने तेथे हा ट्रक उभा केला होता. त्यात कापसाच्या गाठी होत्या. त्यावेळी या महामार्गावर विमान पाहण्यासाठी लोक उभे असायचे. ट्रकला चाटून गेल्यावर विमानाचे मागील एक चाक निखळून पडले. पुढे चिकलठाणा परिसरातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर विमान आदळले व भरकटत जाऊन एका शेतात हे विमान पडले. त्यानंतर त्याचे तुकडे होऊन आग लागली. विमानातून आगीचे व धुराचे लोळ बाहेर पडत होते.

छायाचित्र केवळ ‘लोकमत’कडेच...
अशा दुर्घटनांच्या वार्तांकनात प्रत्येक क्षण पत्रकारांसाठी महत्त्वाचा व वाया घालवायचा नसतो. विमानातून उडणाऱ्या धुराचे लोळ मी स्वत: कॅमेऱ्यात टिपले. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था, जगातील वृत्तपत्रे व टी.व्ही. वाहिन्यांना देऊ शकतील, अशी ही बोलकी छायाचित्रे फक्त ‘लोकमत’कडेच होती. माझे छायाचित्र काढून होईपर्यंत तरी कुणी छायाचित्रकार दुर्घटनास्थळी पोहोचला नव्हता. आग लागून पेटत असलेल्या विमानाचे छायाचित्र दुसऱ्या दिवशी फक्त ‘लोकमत’नेच छापले होते. आजच्यासारखी २४ तास ब्रेकिंग किंवा लाईव्ह न्यूज देणारे टी.व्ही. पत्रकारही नव्हते. दुपारी सव्वा वाजताच्या या दुर्घटनेची टीव्हीवरील पहिली बातमी त्यावेळी तीन वाजता झळकली होती. इतर तपशील व मृतांचा आकडा टीव्हीवर दुसऱ्याच दिवशी पाहावयास मिळाला होता.  

Web Title: Incidentally took away the craftsmans !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.