माणुसकीचा खून ! कलम कुठले लावणार?

By गजानन दिवाण | Published: January 7, 2018 11:39 AM2018-01-07T11:39:22+5:302018-01-07T11:48:04+5:30

एखाद्या जखमीला पोलिसाने आॅक्सिजन पम्पिंग करावे, हे सांगणारा कायदा नाही. अगदी तसेच रस्त्यावर पडलेल्या जखमीला तात्काळ मदत करावी, हेही सांगणारा कुठला कायदा नाही.

Humanity murders! Which pen? | माणुसकीचा खून ! कलम कुठले लावणार?

माणुसकीचा खून ! कलम कुठले लावणार?

ठळक मुद्देदोन खुनांसाठी जबाबदार कोणाला धरणार? त्यावर कुठले कलम लावणार?

२० डिसेंबर २०१७ च्या रात्री ११.१० वाजेची वेळ. औरंगाबादजवळील पडेगाव येथील पेट्रोल पंपासमोर एक भीषण अपघात होतो. यात कारमधील दोघे जण गंभीर जखमी होतात. याच रस्त्याच्या बाजूला एकाचे दुकान आहे. हा परिसर तसा नेहमीच अपघात होणारा. प्रत्येकवेळी रस्त्याच्या बाजूचा हा दुकानदार तरुण अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतो. त्यामुळे छावणी पोलिसांना तो चांगलाच ठाऊक. त्याही रात्री त्याने अपघातानंतर छावणी पोलिसांना फोन केला.

तातडीने पोलिसांची गाडी आली. जखमींना घेऊन तो घाटी रुग्णालयात गेला. जखमींना सोडून पोलिसांची गाडी परत गेली. घाटीत एकावर उपचार सुरू झाले. त्याला टाके घालण्यात आले. दुसºयाला आॅक्सिजनची गरज होती. पम्पिंगसाठी डॉक्टरने दोघांची मदत मागितली. हा तरुण स्वत: एकटाच होता. त्यामुळे त्याने घाटी पोलीस चौकीतील एकाला ती मागितली. त्याने येण्यास नकार दिला. यावर वादावादी झाली.

तरुणाने कंट्रोल रूमला फोन करून पोलीस मदत करीत नसल्याची माहिती दिली. समोरून महिला पोलीस निरीक्षक फोनवर असतानाही चौकीतील पोलिसाने दखल घेतली नाही. या साºया गोंधळात त्या जखमी तरुणाचा मृत्यू झाला. हा सारा प्रकार एकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. ज्याचा जीव वाचावा म्हणून हा सारा खटाटोप होता, तोच गेल्याने संतापलेल्या तरुणाने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून त्या पोलिसाविरुद्ध तक्रार दिली.

दुस-या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात फोन केला तेव्हा आपल्याचविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे त्याला समजले. त्याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ती आदल्या रात्री साधारण २ वाजता. त्या पोलिसाची तक्रार होती दुसºया दिवशी सकाळची. या तरुणाने नंतर जामीन मिळविला; अन्यथा सरकारी कामात अडथळा केला म्हणून त्यालाच अटक झाली असती. ज्या पोलिसाने आॅक्सिजन पम्पिंगसाठी मदत नाकारली त्याच्यावर मात्र कुठलीच कारवाई झाली नाही.

असे का?
एक तरुण दुस-या जखमी तरुणाला, ज्याचे अगदी नावही ठाऊक नव्हते त्याला घेऊन घाटीत येतो. अनोळखी व्यक्तीबाबत दाखविलेल्या माणुसकीची ही किंमत. एखाद्या जखमीला पोलिसाने आॅक्सिजन पम्पिंग करावे, हे सांगणारा कायदा नाही. अगदी तसेच रस्त्यावर पडलेल्या जखमीला तात्काळ मदत करावी, हेही सांगणारा कुठला कायदा नाही.

तरी या पडेगावच्या तरुणाने कडाक्याच्या थंडीत कुटुंबात रमण्यापेक्षा या जखमीची मदत केली. तो वाचला नाहीच. उलट त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला. वेळीच मदत मिळाली असती, तर तो जगला नसता कशावरून? मग तो अपघाती मृत्यू कसा समजायचा?

या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात जखमींना मदत करणारा तरुण पोलिसाशी एकेरी बोलत असल्याचे स्पष्ट दिसते आहे. ही त्याची वागणूक चुकीचीच. गुन्हा दाखल करून त्याची त्याला शिक्षाही मिळाली. त्या पोलिसाचे काय? एका जखमी तरुणाच्या मृत्यूला तो कारणीभूत नाही का? या तरुणाची पोलिसाशी वागणूक चुकीची होती, हे मान्यच. मग पोलिसाची तरी ही वागणूक माणुसकीच्या कायद्यात बसणारी कुठे होती? तरुणाने सरकारी कामात अडथळा आणलाच असेल तर, त्याच रात्री पोलिसाने त्याच्याविरुद्ध गुन्हा का दाखल केला नाही? वर्दीत असलेल्या पोलिसाने हा अपमान रात्रभर का बरे सहन केला असावा? सकाळी तरुणाने आपल्याविरुद्ध तक्रार दिल्याचे समजल्यानंतर त्याने गुन्हा का दाखल केला? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत. कारण, ती आम्हाला शोधायचीच नाहीत.
या एकूणच घटनेत दोन खून झाले. पहिला अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा आणि दुसरा माणुसकीचा. या दोन खुनांसाठी जबाबदार कोणाला धरणार? त्यावर कुठले कलम लावणार?


मराठवाडी तडका
मदत करणा-या ज्या तरुणावर गुन्हा दाखल झाला, तो गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथियांसाठी काम करतो आहे. त्यांच्या संघटनेचा तो घटक बनला आहे. हा पंथ तसा दुर्लक्षित. मदत तर दूरच, स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडे कुठला पंथ असतो हेच स्वीकारायला आमचा समाज तयार नाही. अशा स्थितीत हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासाठी लढत आहे. पोलीस ठाण्यात वाºया करताना याच तृतीयपंथियांनी या तरुणासाठी मदतीचा हात पुढे केला. दुसरे कोणीच समोर आले नाही. तृतीयपंथियांच्या गुरू सीमा गुरू म्हणाल्या, ‘माणुसकीलाही कुठला पंथ असतो का?’ या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकलो नाही.

Web Title: Humanity murders! Which pen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.