Gudi Padwa 2018 : मायमराठीशी नातं... अमेरिकेच्या लिलीची मराठी बोली

By गौरी ब्रह्मे | Published: March 17, 2018 11:17 PM2018-03-17T23:17:11+5:302018-03-17T23:31:25+5:30

आपल्या जवळच्या माणसांना, मातीला, निसर्गाला आपण कायम गृहीत धरत असतो. माय मराठी त्यातलीच एक.

Gudi Padwa 2018: relationship with mother toung marathi | Gudi Padwa 2018 : मायमराठीशी नातं... अमेरिकेच्या लिलीची मराठी बोली

Gudi Padwa 2018 : मायमराठीशी नातं... अमेरिकेच्या लिलीची मराठी बोली

दोन महिन्यांपूर्वी एक फोन आला, "मी लिली केल्टिंग कुलकर्णी. मला मराठी शिकायचे आहे. तुम्ही  शिकवाल का?" मला आश्चर्य वाटलं, कारण ही मुलगी वरील दोन वाक्य इंग्रजीत न बोलता, तोडक्यामोडक्या मराठीत बोलत होती. तिची इच्छाशक्ती तिथेच समजली. नेमकं  त्याचवेळी मी सुद्धा माझे नेहमीचे शिकवणे सोडून काहीतरी वेगळं हाताळण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे दुधात साखर पडली. आयत्या चालून आलेल्या संधीला मी नाही म्हणाले नाही आणि लिलीची मराठीची शिकवणी सुरु झाली. मग मात्र मला हळूहळू अंदाज आला की आपण कोणते शिवधनुष्य उचलायला चाललो आहोत.

आपल्या जवळच्या माणसांना, मातीला, निसर्गाला आपण कायम गृहीत धरत असतो. माय मराठी त्यातलीच एक. बोबड्या बोलांपासून ती आपल्या इतक्या जवळ असते की तिची शब्दरचना, व्याकरण, त्यातील नियम, अपवाद आपण वेगळे असे शिकत नाही. शाळेत शिकतो तेवढंच. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे म्हणून असेल कदाचित, पण लिलीला शिकवताना अव्यय, प्रत्यय, क्रियाविशेषण, अलंकार, अप्रत्ययी द्वितीया, दर्शक सर्वनामे, या सगळ्या मंडळींशी आता माझी नव्याने ओळख होणार होती. त्यांचा पूर्ण नवीन तऱ्हेने मला अभ्यास करावा लागणार होता, कारण एखादा विषय दुसऱ्या कोणाला समजावताना, मुळात आपला पाया पक्का असावा लागतो. या अभ्यासाकरता मी तयार होते. माझे मराठी वाचन बऱ्यापैकी होते, आहे, त्यामुळे मराठीशी नाळ अशी कधी तुटली नव्हतीच. मुंबई विद्यापीठातील जर्मन विभाग व राज्य विकास मराठी संस्था यांच्या "अमराठींसाठी मराठी" या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी असल्याचाही मला फायदा झाला.

लहानपणापासून आपण आपली मातृभाषा "हे असं का, तसं का नाही?" असे प्रश्न न विचारता अगदी सहजरित्या शिकत असतो. त्यामुळे चष्मा "तो" आहे, चांदणी "ती" आहे, झाड "ते" आहे आणि झोपड्या "त्या" आहेत हे गृहीत धरून आपण आपसूक ती शिकत राहतो, पाठ करत राहतो, आत्मसात करत राहतो. इंग्रजीमध्ये हा प्रश्न येतच नाही, कारण तिथे सगळंच "ते" (the pen, the table, the book) आहे. मला कायम वाटतं, इंग्रजी भाषा जगभर पसरण्यामागे इंग्रजांचा वसाहतवाद तर आहेच, पण तिच्यात लिंग पाठ करावे लागत नाही हे मुख्य कारण आहे. हा अर्थात मजेचा भाग झाला! आता जेव्हा लिली विचारते, "गौरी, पुस्तक "ते" आहे, पेन "ते" आहे तर वही का "ती" आहे, तेव्हा तिला, अगंबाई, "ते" तसंच आहे असं सांगाव लागतं, किंवा लिहिताना "बोलत आहे" पण बोलताना "बोलतेय" असं का, असं तिने विचारलं की माझी बोलती बंद होते!!

इथे माझ्या आत्तापर्यंतचा परकीय भाषा शिकवण्याच्या अनुभवाचा कस लागतो. सुदैवाने जर्मन भाषा शिकताना मला सगळे शिक्षक अतिशय उत्तम मिळाले आणि तिच्या अध्यापनाचे तंत्र शिकवायला डॉ. मंजिरी परांजपे यांच्यासारख्या गुरू लाभल्या. परकीय भाषा शिकवताना शक्यतो इतर कोणत्याही भाषेचा आधार न घेता ती भाषा शक्यतो त्याच भाषेतून शिकवावी हे महत्त्वाचं बाळकडू मला त्यांच्याकडून मिळालं. 

Communication हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. त्यामुळे लिलीला शिकवताना लिखाण (एका अभारतीय मोठ्या माणसाला मराठी मुळाक्षरं शिकवणे हे महाकठीण काम आहे!!), वाचन यापेक्षा जास्त भर मी बोलण्यावर देते. त्यामुळे तिच्या आणि माझ्या मराठीमध्ये खूप छान गप्पा सुरू असतात. लिली अतिशय उत्साही आणि प्रयत्नशील विद्यार्थिनी आहे. तिने लिहिण्यात देखील बरीच प्रगती केली आहे. माझ्या सुदैवाने तिला उत्तम जर्मनही येते, त्यामुळे आमच्या गप्पा या भाषेतून त्या भाषेत सतत शिफ्ट होत असतात. मराठी व्याकरणातील एखादा नियम (उदा - सर्वनामे, Possessive Pronouns), किंवा काही आदरार्थी बिरुदं तिला चटकन जर्मनमध्ये समजावता येतात. कारण इंग्रजीपेक्षा मराठी आणि जर्मन एकमेकांना जास्त जवळ आहेत. हा त्रैभाषिक वर्ग धमाल असतो!

लिलीला प्रत्येक नवीन गोष्ट समजून घ्यायची असते, काही नवीन शिकवलं की ते लगेच वापरून पाहायचं असतं. व्हिडीओमध्ये याची प्रचिती येतेच आहे. परवाच आम्ही काही "कमल, ढग बघ" सारखी सोपी वाक्ये करत होतो, तर तिने लगेच "केदार, (तिच्या नवऱ्याचे नाव) काम कर" असे अगदी सोपे पण उपयुक्त वाक्य अगदी चटकन करून दाखवले. तिला जेव्हा रंगांची नावे शिकवली, तेव्हा तिने तीन सुंदर वाक्ये बनवून दाखवली. तिच्या मतानुसार अमेरिका निळा आहे (तिला अजून विशेषण नामानुसार बदलते हे माहीत नाहीये), जर्मनी करडा आहे आणि भारत रंगीबेरंगी आहे. निळा तिचा आवडता रंग आहे, अमेरिका तिची मातृभूमी आहे म्हणून अमेरीका निळी. जर्मन लोक तिला स्वभावाने थोडेसे रुक्ष वाटतात, म्हणून जर्मनी करडी, तर भारताशी तिची नव्याने ओळख झाली आहे, तिला इथली माणसं, इथली संस्कृती, भाषा, ट्राफीक, सण, खाणेपिणे,  सर्व काही आकर्षक आणि वेगळे वाटते आहे, त्यामुळे भारत रंगीबेरंगी!  छोट्याशा वाक्यांमधे तिने केवढं मोठं तत्वज्ञान मांडले. हीच तर भाषेची कमाल आहे.

लिलीबरोबरच तिची आणखी एक अमेरिकन मैत्रीण मिखेलाही काही दिवसात आमच्या शिकवणीत सामील झाली आहे. मिखेलासुद्धा एक अतिशय गुणी विद्यार्थिनी आहे. हिला हिंदी बऱ्यापैकी येतं. याबद्दल पुढील भागात लिहिणार आहे. 

एकीकडे अमृतातही पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा मरते आहे, मराठीला कोणी वाली नाही अशी दुःखद 'स्टेटमेंट्स' ऐकत असताना, आपण स्वतः तिचे जतन, संवर्धन, तिचा प्रसार करण्यात खारीचा वाटा उचलत आहोत ही जाणीव सुखावून जाते. या सगळ्यात आनंद देणारी गोष्ट म्हणजे माझी माझ्याच मातृभाषेशी नव्याने झालेली ओळख!

सध्यातरी मराठी भाषा तिच्या तीन विद्यार्थिनींवर खूष आहे, लिली, मिखेला आणि गौरी.

gaurirbrahmegmail.com
 

Web Title: Gudi Padwa 2018: relationship with mother toung marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.