Elephants lost, wagh ever? | हत्ती सुटले, वाघ कधी?

जंगलाचा राजा असलेला वाघ प्राणिसंग्रहालयात जाऊन पाहायचा कशासाठी? चालण्याचा त्याचा तो रुबाब, डोळ्यातील त्याचा तो आक्रमक भाव, धिप्पाड शरीर हे सारे पाहून त्याचे राजेशाही जगणे लक्षात यावे, हा यामागील उद्देश. मग तो साप असो वा काळवीट-हत्ती. या प्राण्यांना जंगलात जाऊन पाहणे आम्हा औरंगाबादकरांना शक्य नाही. हे प्राणी दिसतील, असे जंगलही आमच्या मराठवाड्यात नाही. म्हणून दुधाची तहान आम्ही सिद्धार्थ उद्यानातील या प्राणिसंग्रहालयासारख्या ताकावर भागवितो. गेल्या काही वर्षांत न चुकता आम्ही येथे भेट देतो.

येथील वाघ पाहून जंगलाचा राजा हा कसा असू शकतो, असा प्रश्न आम्हाला सतावतो. इतक्या वर्षांनंतर ते विचारण्याची हिंमत आज एकवटली, तो भाग वेगळा. एखाद्या म्हाता-या माणसाच्या कातडीला सुरकुत्या पडाव्यात, तशी या वाघांची स्थिती. त्यांचा रुबाब पुस्तकातच वाचला. येथे या प्राणिसंग्रहालयात कोणीतरी हातात हात धरून त्यांना ‘पाय-पाय’ शिकवीत असावे, असा भास होतो. बिबट्याचीही स्थिती फारशी वेगळी नाही.

येथील सापही यापेक्षा वेगळे नाहीत. सापांचे अनेक बॉक्स रिकामेच आहेत. ज्या बॉक्समध्ये आहेत तेही नशापान केलेल्या माणसागत कुठेतरी कोप-यात पडलेले दिसतात. सकाळी जा किंवा संध्याकाळी, ते या नशेतून बाहेर आलेले दिसत नाहीत. साप जिवंत की मेलेले, हेही कळत नाही. माणसांना खरूज लागून कातडी पांढरी पडावी, तशी स्थिती येथील सांबरांची झाली आहे. या सांबरांच्या जीवावर कावळे मात्र गुबगुबीत झाले आहेत. दोन हत्तींना साखळदंडात बांधून ठेवले आहे. एखाद्या बेड्या ठोकलेल्या आरोपींना पाहावे, तसे या हत्तींना पाहून वाटते.

या प्राण्यांना अन्न कमी मिळते का, तर अजिबात नाही. उद्यानाचे खाते पाहिले असता त्याचा अंदाज येतो. १२१ रुपये किलोचे बिफ, १९५ रुपये किलोचे मासे आणि शाकाहारी प्राण्यांसाठी ३२ रुपये किलोचे टोमॅटो. १ एप्रिल २०१५ ते १ एप्रिल २०१६ या काळात प्रतिदिवस बीफवर १८ हजार १५० रुपये, तर मासेखरेदीवर दिवसाला १,६५७ रुपये खर्च झाले. तेव्हा पशुखाद्य २२.५० रुपये किलो, पक्ष्यांचे खाद्य २०.५० रुपये किलो, हरभरा ४५ रुपये किलो, गहू २३ रुपये किलो, तांदूळ ३१ आणि शेंगदाणे ८० रुपये किलोने खरेदी व्हायचे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास हा खर्च आज कितीतरी पटींनी वाढला असेल. एवढा सारा खर्च करूनही एचबी कमी असलेल्या माणसांसारखे हे प्राणी का बरे दिसत असावेत, याचे उत्तर मिळत नाही. या संग्रहालयातील दोन हत्तींची लवकरच विशाखापट्टणमला रवानगी होणार आहे. साखळदंडातून त्यांची कायमची सुटका होईल. मोकळा श्वास त्यांना घेता येईल. एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळावे, एवढा आनंद यानिमित्ताने आम्हाला झाला आहे.