निवडणूक तयारीला प्रशासनाकडून गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 09:28 PM2019-03-18T21:28:04+5:302019-03-18T21:29:35+5:30

धुळे मतदारसंघात चौथ्या टप्प्यात होणार निवडणूक 

Progress by election administration | निवडणूक तयारीला प्रशासनाकडून गती

निवडणूक तयारीला प्रशासनाकडून गती

googlenewsNext


धुळे  - लोकसभा निवडणुकीच्या देशभरातील कार्यक्रमाच्या घोषणेनंतर जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारीच्या कामाला गती दिली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होणार असून त्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली आहे. यावेळी मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विशेष मोहिमेंतर्गत मतदारांच्या नोंदणीस प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे मतदारांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. या निवडणुकीपासून व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या यंत्राविषयी नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी पूर्वी व सध्याही इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत प्रात्यक्षिकांद्वारे जनजागृती केली जात आहे. व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे आपण ज्या उमेदवारास मतदान केले त्यालाच ते मिळाले किंवा नाही, याची माहिती मतदानानंतर लगेच मिळू शकणार आहे. निवडणुकीसाठी आवश्यक इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे प्रशासनाला नुकतीच प्राप्त झाली आहेत. ती निवडणूक प्रक्रियेसाठी सक्षम आहेत का, यासाठी तज्ञांमार्फत त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून त्यांनाही या यंत्रांबाबत माहिती देण्यात आली. ही सर्व यंत्रे सध्या केंद्रीय विद्यालयाजवळील भव्य गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. तेथे आवश्यक तो बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी विविध प्रकारच्या २४ कामांसाठी समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यासाठी २४ नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय संपूर्ण मतदारसंघावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिका-यांना लक्ष ठेवता यावे यासाठी १६० क्षेत्रीय (सेक्टर) अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिका-यांना त्यांच्या कामाची माहिती, जबाबदारी याची माहिती व्हावी, यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात विविध विभागांच्या अधिका-यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्षांचे ध्वज, झेंडे, बॅनर काढण्यात आले आहेत. अद्याप काही ठिकाणी हे साहित्य दिसून येत आहे. मात्र तक्रारी प्राप्त होताच पथकांद्वारे ते काढून जमा करण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात भरती, बदल्या, कामांचा शुभारंभ, भूमिपूजन तसेच निधीची तरतूद करता येणार नसल्याची माहिती संबंधितांना यापूर्वीच देण्यात आली आहे. त्याबाबत तक्रार झाल्यास व तसे निष्पन्न झाल्यास कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे अद्याप आचारसंहिता भंगाची एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचा-यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले असून प्रशासनामार्फत रोज कामांचा आढावा घेतला जात आहे. निवडणूक काळात आवश्यक तो बंदोबस्ताचे नियोजन जिल्हा पोलीस दलाच्या समन्वयाने करण्यात येत आहे. निवडणूक काळात बॅँकांमधून निधी काढण्यावर तसेच दारूची वाहतूक याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांतर्फे नाकाबंदीही करण्यास सुरूवात झाली आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच निवडणुकीत मतदारांना निर्भय व निष्पपक्षपणे मतदान करता यावे, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. २ एप्रिल रोजी अधिसूचनेद्वारे उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 

Web Title: Progress by election administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे