Dhoom Dhoom of Elections, Diwali | निवडणूकीची धूम, दिवाळीची धामधूम
निवडणूकीची धूम, दिवाळीची धामधूम

- निखिल कुलकर्णी
महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम व आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे महापालिकेत सध्या प्रशासनाचीच सत्ता असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे प्रशासनाकडून निवडणूकीची तयारी युध्दपातळीवर सुरू आहे़ निवडणूकीच्या रणधुमाळीतच दिवाळीची धुमही सुरू झाली आहे़ महापालिकेत सध्या चौथ्या पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ राज्य निवडणूक आयोगाने अपेक्षित तारखेपूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आयोजित केलेली महासभा व स्थायी समितीची सभा रद्द झाल्या आहेत़  एकूणच पदाधिकारी पदावर कायम असले तरी त्यांचे अधिकार संपुष्टात आले आहे़ त्यामुळे प्रशासनाकडून निवडणूकीचा एक कलमी कार्यक्रम राबविला जात आहे़ संपूर्ण मनपा यंत्रणा निवडणूकीच्या कार्यक्रमात व्यस्त झाली असून दररोज नवनविन आदेश काढले जात आहेत़ निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत आॅनलाईन नामनिर्देशन पत्र सादर होणार असून यंदा नामनिर्देशन पत्रात झालेल्या सुधारणांमुळे उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे़ नामनिर्देशन पत्र भरतांना लागणारे विविध प्रमाणपत्र, तिकीट मिळविण्याची धडपड, प्रचाराचे नियोजन या बाबींमध्ये उमेदवार व्यस्त आहेत़ उमेदवारांना दिवाळीसह निवडणूकीचे नियोजन करावे लागत असल्याने त्यांची तारेवरची कसरत होतांना दिसते़ हे सर्व करतांना आर्थिक गणिताचे नियोजनही काटेकोरपणे सांभाळण्याची जबाबदारी उमेदवारांना पार पाडावी लागत आहे़ एकंदरीत या सर्व व्यस्ततेमुळे आजी-माजी व भावी उमेदवारांचे महापालिकेत येणे-जाणे कमी झाल्याचा फायदा प्रशासनाला होत आहे़ प्रशासकीय कामकाजाला पूर्ण वेळ मिळत असल्याने गती आली आहे़ तसेच वेळेत निवडणूकीचे कामकाज पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी रात्रीचा दिवस करून कामकाजात योगदान देत आहेत़ स्वत: आयुक्तांनीही आपली दिवाळी महापालिकेतच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे़ त्यामुळे  बाहेर दिवाळीची धामधुम सुरू झाली असली तरी मनपाचे अधिकारी, कर्मचारी मात्र निवडणूकीच्या नियोजनावर भर देत असल्याचे दिसून येते़ महापालिकेची संपूर्ण यंत्रणा निवडणूकीच्या कामात व्यस्त असतांना दुसरीकडे राजकीय परिस्थितीही निवडणूकीचा रंग घेत आहे़ दिवाळीची धामधुम व त्यात निवडणूकीची रणधुमाळी यांमुळे शहराचे वातावरण उत्साहपूर्ण झाले आहे़ प्रत्येकाकडून दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करतांना, फराळाचा आस्वाद घेतांनाच निवडणूकीचीही खमंग चर्चा रंगत आहे़ प्रमुख पक्षांमधील अंतर्गत वाद, नवीन युती-आघाडीची चर्चा, कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळते याच्या शक्यता, विकासाची सद्यस्थिती, भविष्यातील राजकीय परिणाम यांचा ऊहापोह या चर्चांच्या माध्यमातून होतांना दिसतो़ आचारसंहिता लागू झाल्यामुळे उमेदवारांच्या राजकीय दिवाळीवर बंधने आली असली तरी नियमातील बाबींचा आधार घेऊन त्यांच्याकडून मतदारांची मने जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न होतांना दिसतो़ शहरातील हे उत्साहपूर्ण वातावरण सोशल मिडीयावरही जोरदार रंग भरत आहे़ दिवाळीच्या शुभेच्छा देतांनाच एकमेकांवर टिका करणारी पत्रके, एकमेकांच्या पोस्टवर दिल्या जाणाºया प्रतिक्रिया, नवनवीन व आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर सोशल मिडीयावर बघण्यास मिळत आहे़ धुळेकरांना निवडणूकीच्या रणधुमाळीत दिवाळीची धामधुम करण्याची संधी यंदा चालून आल्यामुळे निर्माण झालेले उत्साहपूर्ण वातावरण भविष्यातही कायम राहावे, शहर विकासाला गती यावी, गुन्हेगारी कमी होऊन सुखशांती प्रस्थापित व्हावी या अपेक्षा पूर्ण होण्याची अपेक्षा धुळेकरांना असणार आहे़ 


Web Title: Dhoom Dhoom of Elections, Diwali
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.