Class X-Science and Technology Part-2, Paperwork Plan | इयत्ता दहावी- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २, कृतिपत्रिका आराखडा
इयत्ता दहावी- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २, कृतिपत्रिका आराखडा

ठळक मुद्देइयत्ता दहावी- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ कृतिपत्रिका आराखडा

इयत्ता दहावी- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा. या परीक्षेत उत्तम गुण मिळावेत, यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२ या विषयाची ४० गुणांची कृतिपत्रिका असेल. ती सोडवण्यासाठी २ तासांचा कालावधी असेल. या शिवाय प्रात्यक्षिक परीक्षा व उपक्रम वही यांना ८ + २ असे दहा गुण असतील.

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - २ मध्ये एकूण दहा प्रकरणे आहेत. त्यामध्ये हरितऊर्जेच्या दिशेने, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान अशी काही प्रकरणे नव्याने अंतर्भूत झाली आहेत. कृतिपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरुप लक्षात घेऊन त्याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल.

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२, कृतिपत्रिका आराखडा

कृतिपत्रिकेतील प्रश्नांचे गुणनिहाय विभाजन

प्र. १ अ) १ गुणांचे ५ प्रश्न - एकूण गुण (५)

ब) १ गुणांचे ५ प्रश्न - एकूण गुण (५)
(प्र. १ ‘ब’ हा बहुपर्यायी प्रकारचा प्रश्न प्रात्यक्षिक कार्य व उपक्रमातील आकलन व उपयोजनांवर आधारित असेल)
प्र. २) २ गुणांच्या ७ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे
एकूण गुण (१०)

प्र. ३) ३ गुणांच्या ७ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे
एकूण गुण (१०)

प्र. ४) ५ गुणांच्या २ प्रश्नांपैकी १ प्रश्न सोडविणे
एकूण गुण (०५)

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता १०वीचा ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या विषयाचा नवीन अभ्यासक्रम अमलात आला आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरुपही कृतिपत्रिकेवर आधारित आहे. बदललेला अभ्यासक्रम व बदललेले प्रश्नपत्रिकेचे स्वरुप याला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाचे सखोल आणि अर्थपूर्ण वाचन करावे लागणार आहे. वाचन करताना महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद करुन ठेवणे आवश्यक. पाठांतरावर भर देण्यापेक्षा विषय किंवा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप विचारात घेऊन अभ्यास केला तर निश्चितच चांगले गुण प्राप्त होऊ शकतात.

प्रश्न क्रमांक १ अ मध्ये वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न असतील. त्यासाठी धड्याचे सखोल वाचन करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक २ ब हा प्रात्यक्षिक कार्य व उपक्रम यावर आधारित बहुपर्यायी प्रकारचा प्रश्नप्रकार असेल. बहुपर्यायी प्रश्न सोडवताना विधान पूर्ण लिहिणे आवश्यक आहे. बालभारतीने प्रयोगावर आधारित पुस्तिका काढली आहे. त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांचा सराव करावा.

प्रश्न क्रमांक २ हा २ गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न. २ गुणांसाठी किमान चार योग्य मुद्दे लिहिणे अपेक्षित असते. त्यामुळे पाठांतर करताना किंवा वाचन करताना आपल्याला किती मुद्दे स्मरणात राहतात ते पहा.

प्रश्न क्रमांक ३ हा ३ गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न. यामध्ये विविध आकृत्या, तक्ते यावर आधारित प्रश्न प्रकार असतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान २ या पुस्तकात एकूण ३८ आकृत्या आहेत. यांचा अभ्यास करताना आकृत्यांचे वर्गीकरण करावे. काही आकृत्या माहितीपर आहेत. काही आकृत्या रेखाटनासाठी येऊ शकतात. आकृती सुबक आणि नामनिर्देशित असावी. पेन्सिलचा वापर करावा.

काही आकृत्या किंवा चिन्ह यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यांच्या स्पष्टीकरणाचा सराव करण गरजेचे आहे. चुकीची आकृती दुरुस्त करा, आकृती ओळखा, आकृतीचे नामनिर्देशन करा इत्यादी प्रकारे आकृत्यांचा सराव करावा. ‘तक्त्यांवर आधारित प्रश्न’ हा कृतिपत्रिकेतील महत्त्वाचा प्रश्न आहे. तक्ता काढा / तयार करा, तक्ता पूर्ण करा, तक्त्यातील गाळलेल्या जागा भरा, तक्ता चुकीचा दिलेला आहे तो दुरुस्त करा इत्यादी अशा प्रश्नांचा सराव धड्याचे वाचन करतानाच करावा.

प्रश्न क्रमांक ४ हा पाच गुणांचा प्रश्न असेल. यामध्ये किमान ५ मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. आवश्यक असल्यास आकृत्यांचाही समावेश करणे गरजेचे आहे. २ पैकी एक प्रश्न सोडवा असा पर्याय असेल तर जो प्रश्न आपल्याला नीट येत आहे त्या प्रश्नाचा पर्याय निवडावा. परंतु अभ्यास करताना संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा. त्यातील कोणताही भाग वगळू नये.

स्वमतावर आधारित प्रश्नांचा समावेश कृतिपत्रिकेत असणार आहे. स्वमत नोंदवताना ते मुद्देसूद व आशयाला अनुसरुन असावे.
१०वीतील आशयाशी संबंधित असलेल्या इयत्ता नववीच्या आशयावर २० टक्के भारांश असेल. त्यासाठी ९वीच्या पुस्तकातील संकल्पना/संबोध स्पष्ट असावेत.

उपाययोजना सुचवता येणे, दिलेला परिच्छेद पूर्ण करता येणे अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करावी लागेल. स्वाध्यायांव्यतिरिक्त व्यवहारातील संकल्पनांवर आधारित प्रश्नसुद्धा असतील. त्यासाठी भरपूर प्रश्नपत्रिका सोडवून सराव करावा. अभ्यासाचे व वेळेचे नियोजन करावे व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादन करावे. परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

  •  शिल्परेखा विनायक जोशी

सहाय्यक शिक्षिका
फाटक हायस्कूल, रत्नागिरी


Web Title: Class X-Science and Technology Part-2, Paperwork Plan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.