पाणी ‘मुरते’ कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:33 AM2018-06-19T11:33:38+5:302018-06-19T11:35:05+5:30

परिस्थिती किती चमत्कारिक आहे, म्हणजे इकडे औरंगाबाद शहरातील जनता हंडे, बादल्या, तपेल्या घेऊन गल्लोगल्ली फिरताना दिसते आणि आपले महापौर नंदकुमार घोडेले म्हणतात की, ७० एम.एल.डी. पाणी कुठे जाते याचा शोध लावा

Where the water 'Absorb'? | पाणी ‘मुरते’ कुठे?

पाणी ‘मुरते’ कुठे?

- सुधीर महाजन

‘परिस्थिती किती चमत्कारिक आहे, म्हणजे इकडे औरंगाबाद शहरातील जनता हंडे, बादल्या, तपेल्या घेऊन गल्लोगल्ली फिरताना दिसते आणि आपले महापौर नंदकुमार घोडेले म्हणतात की, ७० एम.एल.डी. पाणी कुठे जाते याचा शोध लावा, हे पाणी कोणी गायब केले की, कापरासारखे उडून गेले, अशा बुचकळ्यात महापौरच पडल्यानंतर पुढे की, आपल्या महानगरपालिकेत यंत्रणा नावाची जी गोष्ट असते ती कामाला लागली, डोक्याला डोकी भिडली. बेरजा, वजाबाक्या झाल्या. कोणी तर म्हणे ल.सा.वि.सुद्धा काढला; पण उत्तर मिळत नव्हते. यंत्रणेतील एकाने म्हणे कोणा तरी पाणीवाल्या बाबांचा शोधही सुरू केला होता.

पाणी मुरते कुठे, हा प्रश्न होता. ‘लोकमत’ने वास्तव समोर आणले. ‘लोकमत’च्या टीमने सलग दोन दिवस बारा-बारा तास एन-५ मधील जलकुंभावर येणाऱ्या टँकरची नोंद घेतली. पहिल्या दिवशी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या बारा तासांत तब्बल २४५ टँकर भरून गेले. यात जसे महानगरपालिकेचे टँकर होते त्याच्या बरोबरीने खाजगी टँकर होते. बऱ्याच टँकरवर क्रमांकही नव्हते तरी ते बिनदिक्कत शहरातील वाहतुकीला धोका निर्माण करून निर्वेधपणे धावतात, तर या टँकरची नोंद कोणीतरी युवक घेत आहे ही गोष्ट टँकर चालकांच्या लक्षात आली आणि त्याला त्यांनी घेरले, प्रश्न विचारले, मोबाईल नंबर मागितला; पण या प्रतिनिधीने हुशारीने त्यांना गुंगारा दिला. दुसऱ्या दिवशी याचा परिणाम दिसून आला. खाजगी, क्रमांक नसलेले टँकर तर जणू काही हवेत विरून गेले. तिसऱ्या दिवशी तर या वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट होता. म्हणजे याचा अर्थ काय काढायचा? 

नागरिकांच्या पाण्यावर दररोज भरदिवसा पडणारा दरोडा महापौरांच्या लक्षात कसा आला नाही? महानगरपालिकेच्या पाण्यावर दरोडा टाकणारी मंडळी नगरसेवक, अधिकाऱ्यांचे बगलबच्चे आहेत, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. त्यांच्याच आशीर्वादाने हा राजरोस व्यवहार चालू होता. तहानलेल्याला पाणी पाजण्याचा धर्म संत एकनाथांनी सांगितला होता; पण तहानेने हैराण झालेल्या जनतेच्या हक्काचे पाणी उजळमाथ्याने विकणाऱ्यांची आणि त्यांना साथ देणाऱ्यांची संस्कृती कोणती, असा प्रश्न पडतो. म्हणूनच इतकी सोपी गोष्ट महापौर आणि यंत्रणेच्या लक्षात कशी आली नाही, असाही प्रश्न पडतो. 

नाथसागरात पाणी आहे; पण औरंगाबाद तहानलेले, कारण संगनमताने पाण्याचा हा गोरखधंदा बिनदिक्कत चालू आहे. इकडे नागरिक हैराण इतके की, पाण्याच्या वेळा पाहून त्यांना आपला दिनक्रम ठरवावा लागतो. रोजी-रोटीसोबत आता पाण्याचीही चिंता, पण ते सोशीक आहेच, कधीच तक्रार करीत नाहीत. ‘आज पाणी येणार नाही’ असे समजताच उरलेल्या पाण्यात दिवस काढण्याचे नियोजन करतात, तर गंमत अशी की, चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी येऊनही विनातक्रार चार हजारांवर पाणीपट्टीचा भरणा करतात. एवढी पाणीपट्टी उभ्या देशात कोणीही भरत नसणार, पण ती भरतानासुद्धा ते तक्रार करीत नाहीत.

एवढ्या सगळ्या उपद्व्यापानंतर एक प्रश्न उरतोच की, महानगरपालिकेच्या जलकुंभातूनच राजरोस पाणी चोरले जाते, कारण ७० एम.एल.डी. म्हणजे काही हंडाभर किंवा ड्रमभर पाणी नाही. तर एवढी क्षुल्लक बाब महापौरांच्या लक्षात येऊ नये, एक वेळ महापौरांना व्यस्ततेमुळे लक्षात आले नसेल; पण जनतेच्या प्रश्नावर रान उठविण्याची नैतिक जबाबदारी असलेला विरोधी पक्ष तरी कोठे आहे? त्याचे तर अस्तित्वच दिसत नाही उलट सत्ताधारी आणि विरोधक सुरात सूर आळवताना दिसतात. ज्या लोकशाही यंत्रणेत विरोधी पक्षच जर सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात गळा घालत असेल तेथे जनतेचा वाली कोणीच नसतो, याचा विसर सामान्य जनतेला न पडो! 

Web Title: Where the water 'Absorb'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.