Unrecognizable insect... BJP | न कळून येणारी बोंडअळी...भाजपअळी

- स. सो. खंडाळकर 

न कळून येणारी बोंडअळी म्हणजेच भाजपअळी अशी संभावना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकतीच केली. गुलाबी रंगाची ही अळी कापसाच्या कै-याच्या आतमध्ये राहून कापसाचे नुकसान करते. त्याच पद्धतीने भाजपही देशाचे आणि शेतक-यांचे नुकसान करीत आहे, असा आरोप सत्तार यांचा! बरं-वाईट... त्या क्षणाला तोंडात येईल त्या शब्दांचा वापर करून मोकळे होणे हा सत्तारांचा गुण. स्वत:च्या मतदारसंघात सर्व थरातील लोकांशी नाळ घट्ट जुळलेली. सध्या ते विरोधी पक्ष म्हणून जिल्ह्यात चांगली भूमिका वठवताना दिसत आहेत. भाजपच्या दोन नेत्यांशी त्यांची सतत झुंज चालेली असते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि विधानसभेचे अध्यक्ष व फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्यातला वाद सर्वश्रुतच! 

बोंडअळीच्या निमित्ताने अब्दुल सत्तार यांनी या दोन्ही नेत्यांना मात दिली. दानवे-बागडे यांचा मतदारसंघ असलेल्या करमाड पोलीस ठाण्यात चार कापूस उत्पादक कंपन्या आणि दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात ते यशस्वी झाले. यासाठी त्यांना आठ तास या पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करावे लागले. दबाव होता म्हणूनच गुन्हा लवकर दाखल होत नव्हता; परंतु सत्तार यांनी शेवटी हा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. अशाप्रकारे गुन्हा दाखल होण्याचा प्रकार दुर्मीळच म्हटला पाहिजे. राजकीयदृष्ट्या याला निश्चतच महत्त्व प्राप्त झाले आहे आणि सत्तार यांची शेतक-यांच्या बाजूची ही लढाई काँग्रेस पक्षाला बळ देणारी ठरत आहे. नागपूरच्या आगामी हिवाळी अधिवेशनात बोंडअळीचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. देशाचे आणि राज्याचेही कृषिमंत्री कोण आहेत, हे कुणालाही सहजासहजी सांगणे कठीणच. अशावेळी सत्तार यांनी नारा दिला की, ‘राज्याचा कृषिमंत्री दाखवा आणि काँग्रेसतर्फे २५ हजार मिळवा’ या ना-याचा अद्याप तरी काही परिणाम झाला नाही. 

कृषिमंत्री दाखवायला कुणी पुढे आलेले नाही. मग सत्तार यांच्या आरोपात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल? पांडुरंग फुंडकर नावाचे हे कृषिमंत्री केवळ खामगावचे असून, ते मंत्रालयात बसत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारतात. मग करतात तरी काय, असा प्रश्न आहेच. राज्यात आज शेतक-यांच्या प्रश्नांनी आ-वासलेले आहे. त्यांना शाब्दिक तरी का होईना हे कृषिमंत्री सतत गायब राहण्यात धन्यता मानतात.

याला काय म्हणायचे ? 
कपाशीच्या वाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी खात्री कंपनीने दिली, तरी कपाशीचे मोठे नुकसान झाले, ही तक्रार औरंगाबाद तालुक्यातील करमाड पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर करमाड पोलीस ठाण्यात चार कापूस उत्पादक कंपन्या आणि दोन विक्रेत्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

निजीवूड कंपनीचे ‘भक्ती’ नावाचे बियाणे, कावेरी सीड कंपनीचे ‘एटीएम’ नावाचे बियाणे, आदित्य सीड कंपनीचे ‘कॉटबॅक’ आणि बायर कंपनीचे ‘फर्स्टक्लास’ बियाण्यामुळे नुकसान झाले असल्याची तक्रार कुंभेफळ शिवारातील शेतक-यांनी करमाड पोलीस ठाण्यात दिली. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, विभागीय कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी दिलीप वडकुते यांचेही याकामी अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा गुणनियंत्रक वननिरीक्षक आशिष काळुसे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनकर जाधव यांनी रात्री शेतात जाऊन कापसाच्या नुकसानीची पाहणी केली व शेंदरी बोंडअळी असल्याचे आपल्या अहवालात म्हटले. आता कापूस बियाणे कंपन्यांचे धाबे दणाणून गेले आहेत. अर्थात हे सारे घडले काँग्रेसच्या आंदोलनामुळे व रेट्यामुळे, हे मान्यच करावे लागेल.