वेदनेच्या प्रवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 07:36 PM2018-08-18T19:36:35+5:302018-08-18T19:38:04+5:30

दिवा लावू अंधारात : बालाघाटाच्या परिसरात शांतिवनची वंचित मुलांची शोध मोहीम सुरू असते तेव्हा अनेक घटनांत पालकांना गमवावे लागल्याने आधार हरपलेली चिमणीपाखरं मोठ्या संख्येने आढळतात. त्यांची जगण्याची परिस्थिती पाहिली आणि इतिहासात डोकावलं की, कुणाच्याही डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या होतात. अगोदरच प्रचंड दारिद्र्यात खितपत पडलेल्या कुटुंबात जन्म घेतलेली ही लेकरं आई-बापाच्या निधनानंतर अक्षरश: रस्त्यावर येतात. मिळेल तो घास पोटात टाकत कसं बसं जगणं त्यांचं सुरू असतं. जगण्याच्या या परिस्थितीत एखाद्यालाच काळजी घेणारे नातेवाईक भेटतात त्यात त्यांचं कसं बसं भागून जातं; पण ज्यांना ते भेटत नाहीत त्यांना बालवयातच कितीतरी कष्टाची कामे करीत लढत राहावं लागतं.

travel In pain | वेदनेच्या प्रवासात

वेदनेच्या प्रवासात

googlenewsNext

- दीपक नागरगोजे

आष्टी तालुक्यातील खिळद नावाचं गाव.  शोध मोहिमेच्या निमित्ताने या गावात जाणं झालेलं. आपल्या गावात अशी काही मुलं आहेत का विचारल्यावर एका शेतकऱ्यानं रघुनाथ गर्जे यांचं घर दाखवलं. रघुनाथ गर्जेची मुलगी रंजना नवरा वारल्यानंतर माहेरीच चिल्यापिल्यांना घेऊन राहते, तिला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही जरूर तिच्यासाठी काहीतरी करा असेही या शेतकऱ्याने कळकळीने सांगितले. आम्ही घरी गेलो तर रंजना भेटली. शेतात गेलेल्या रघुनाथरावांना घरी पाहुणे आले आहेत म्हणून बोलावणं पाठवलं. निरोप मिळाल्याबरोबर रघुनाथराव घरी आले. आम्ही आमची ओळख आणि येण्याचं प्रयोजन सांगितलं, तर दोघांनाही डोंगराएवढा आनंद झाला. रघुनाथ गर्जे यांना दोन मुली आणि एक मुलगा. मुलींची लग्न झाली. 

मुलगा नाशिक येथे भाजी-पाला विक्री करून पोट भरत असतो. रंजनाचे जवळच असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी या गावात सदाशिव हांगे यांचा मुलगा रावसाहेब याच्याशी लग्न करून दिलेलं. रंजनाचे वडील रघुनाथ गर्जे यांची परिस्थिती गरिबीची. ऊसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला; पण पैशापाण्याने बरे असलेले स्थळ चालून आले आहे. आपली मुलगी मागतायेत तर द्यावी या विचाराने खर्च करण्याची क्षमता नसताना रंजनाचे लग्न त्यांनी धूमधडाक्यात करून दिले. सदाशिव हांगे यांच्याकडे दोन मुलांत आठ एकर एवढी बेताचीच; पण उसाचे उत्पादन देणारी जमीन. मात्र, घरी एक बीअर बार. 

रंजनाचा नवरा रावसाहेब हे बार चालवायचा. त्यामुळे घरी पैशाची कमी नाही. हाच पैसा पाहून रघुनाथराव भाळले आणि कुठलाही विचार न करता कमी वयातच मुलीचे लग्न करून दिले. रंजना आणि रावसाहेबचे लग्न होऊन दहा वर्षे झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांना मोठी मुलगी अनामिका, दुसरी मुलगी चांगुणा आणि छोटा मुलगा आनंद ही तीन अपत्येही झाली. सुखात संसार सुरू होता. बारच्या व्यवसायातून पैसेही मिळायचे; पण बारमध्ये होणाऱ्या रोजच्याच कुरबुरीमुळे शांतता, सुख लागायचे नाही. यामुळे आपल्याला हा धंदा नको असे रंजना सांगायची; पण पैसे चांगले मिळतात तर बंद करायचा कशाला यावर रावसाहेब ठाम.

आजपर्यंतच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर दारूने पिणाऱ्याचे आणि विकणाऱ्याचे सुद्धा कल्याण केलेले कधी आढळून येत नाही; पण तरीही लोक ती पिण्याचा आणि भरपूर पैसा मिळतोय म्हणून विकण्याचा मोह सोडत नाहीत. समाजात निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांच्या आणि बहुतेक वाईट घटनांच्या मुळाशी दारू आहे. दारू विकणारे स्वत: पीत जरी नसले तरीही या दारूच्या दुकानात होणाऱ्या भांडणाचे प्रमाण प्रचंड आहे. रावसाहेब हा बार चालवीत असतानाही अनेक वेळा या हॉटेलात भांडणे होत; पण रोज ती भांडणं मिटवली जात. एकदिवस मात्र विचित्र घडलं. गावातीलच काही तरुण रावसाहेबच्या बारमध्ये आले. काही वेळानंतर कसल्यातरी कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. भांडण विकोपाला गेले. सर्वच जण पिलेले असल्याने कुणी कुणाचे ऐकत नव्हते. त्यातील एका तरुणाने खंजीर काढून रावसाहेबच्या पोटात खुपसला. पुन्हा काही वार त्याच्यावर केले. काही कळण्याच्या आत झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रावसाहेब जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रावसाहेब जागेवरच गतप्राण झाला. पोलीस आले, खुनाचा गुन्हा दाखल झाला. दु:खद वातावरणात रावसाहेबवर अंतिम संस्कार करण्यात आले. हे सर्व चालू असताना दु:खाच्या आकांतात बुडालेल्या रंजनाला सारखे वाटत असणार की, ‘मी सांगत होते की आपल्याला नको हा व्यवसाय म्हणून..!’ ऐकलं असतं तर ही वेळ पाहायची वेळ आली नसती. पत्नी आणि सोन्यासारख्या तीन लेकरांना उघड्यावर पडण्याची वेळ आली नसती. पुढे पोलिसांनी आरोपी पकडले. 

न्यायालयात केस उभी राहिली.  मारेकऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षाही लागल्या. रावसाहेबाच्या मारेकऱ्यांना शिक्षा तर मिळाली; पण हे सर्व घडत असताना इकडे रंजना आणि तिच्या तीन लेकरांच्या आयुष्याची वाताहत झाली होती. रावसाहेबच्या जाण्यानंतर स्वाभाविकपणे सदाशिव हांगे यांचं प्रेम त्यांच्या छोट्या मुलावर गेलं म्हणा किंवा रंजनाला या घरात पुन्हा जुळवून घेता आले नाही असेही असेल; पण या कुटुंबात प्रचंड कलह निर्माण झाला. रावसाहेबच्या जाण्यानंतर रंजना तिथे फार काळ राहू शकली नाही. तिला तिच्या हक्काची जमीनही घरच्या लोकांनी दिली नाही. पर्याय नसल्यामुळे ती हतबल होऊन शेवटी माहेरी आली. इकडे गर्जे कुटुंबाचे अठरा विश्व दारिद्र्य. पोट भरण्यासाठी दाही दिशा दोम दोम करीत फिरावं लागतं. अशी परिस्थिती असताना लेकीला आणि तिच्या तीन चिमुकल्यांना आधार देणं मोठं कठीण काम असतानाही तिला आधार देण्याशिवाय दुसरा पर्याय कोणता होता रघुनाथराव कडे...?

त्यांनी तिला आधार दिला. रंजनाने सासरी जाऊनही आपली जमीन मागण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी तिला टेकू दिले नाही. मारहाण करून तिला परत पाठवले. शेवटी ती किती संघर्ष करणार? पुरुषी व्यवस्थेपुढे तिने हार मानली. नाशिकमध्ये भाजीपाला विकणारा भाऊ मदतीला धावला. आनंदची जबाबदारी त्याने घेतली. शिक्षण आणि पालन पोषणासाठी तो त्याला नाशिकला घेऊन गेला. मुली अनामिका आणि चांगुणा रंजना जवळ होत्या. मजुरी करून ती या लेकरांना सांभाळत होती. तिची ही कथा ऐकून आम्ही व्यथित झालो. मुली आम्ही घेऊन जातो म्हटलं. तर रंजना आणि रघुनाथराव दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला; ‘पण मोठी मुलगी अनामिका हिला मी सांभाळते तुम्ही चौथीत जाणारी चांगुणा घेऊन जा. माझीही काही जबाबदारी आहे...!’  तिची विचार करण्याची ही पद्धत मला प्रचंड भावली. परिस्थितीशी झुंजत असतानाही तिच्यात असणारं जबाबदारीचं भान भल्याभल्यांना तोंडात बोट घालायला लावणारं होतं. चांगुणाला आम्ही घेऊन आलो. शांतिवनचं वातावरण, नवीन मित्र, सुंदर शाळा आणि प्रचंड जीव लावणारे सर्व कार्यकर्ते यामुळे इथं रमायला तिला फार वेळ लागला नाही. अलीकडील मॉडर्न असणारी मुलांची नावं पाहून तिच्या चांगुणा या नावात तिला समाधान वाटायचे नाही. एकदिवस तिच्या चिमुकल्या आवाजात तिची ही खदखद माझ्या कानात सांगितली. मला खूप हसू आले. तिच्या आनंदासाठी मी निर्णय घेतला आणि तिचं नामांतर केलं ‘मानसी’..! 

अनामिका १९ वर्षांची झाली आणि जवळच्याच नातेवाईकातील एका मुलाशी रंजनाने तिचे लग्न करून दिले. तिच्या लग्नासाठी शांतिवनने तिला मदत केली. जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे रंजना आता शांतिवनचेच देणगीदार असणाऱ्या मुंबईतील धुमाळ परिवारात कामासाठी गेली आहे. तिथे तिला चांगला पगार तर मिळतोच; पण माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रेम आणि कौटुंबिक वातावरण तिला या प्रेमळ कुटुंबात भरभरून मिळते आहे, तर मानसीला शांतिवनमध्ये येऊन सात वर्षे झाली. आता ती दहावीत आहे. 

या सात वर्षांत कमालीचे बदल तिच्यात झाले आहेत. येथील वातावरणात तिची सकारात्मक विचार करण्याची वृत्ती प्रचंड विकसित होत आहे. तिला लवकर लग्न करायचे नाही तर खूप शिकायचे आहे. खूप काही करून दाखवायचे आहे. आईबद्दल ती म्हणते, ‘माझी आई म्हणजे स्वभावाने आणि परिस्थितीने खूप गरीब आहे; पण तिने कधीही वाईट विचाराचा मनाला स्पर्श होऊ दिला नाही. मला तिची मान उंच होईल आणि तिला स्वाभिमान वाटेल असे होऊन दाखवायचे आहे.’ या कोवळ्या वयात मानसी हे स्वप्न पाहतेय. तिच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम शांतिवन करीत राहील.
( deepshantiwan99@gmail.com )

Web Title: travel In pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.