‘घाटी’चे आरोग्य सुधारण्यासाठी प्राधान्य देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:11 PM2018-05-28T12:11:57+5:302018-05-28T12:13:17+5:30

विश्लेषण :  घाटीत शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणलेल्या रुग्णाची सलाईनची बाटली लावण्यासाठी स्टँड नसल्याने एका बालिकेला ती बाटली हातात धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली

The time to give priority to improving the health of the Ghati Hospital | ‘घाटी’चे आरोग्य सुधारण्यासाठी प्राधान्य देण्याची वेळ

‘घाटी’चे आरोग्य सुधारण्यासाठी प्राधान्य देण्याची वेळ

googlenewsNext

- संतोष हिरेमठ 

संपूर्ण मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड, जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेले घाटी रुग्णालय गेल्या महिनाभरातील काही घटनांनी चांगलेच चर्चेत आले. काही घटनांनी तर रुग्णालय प्रशासनाची नाचक्की झाली; परंतु त्या घटनांतून हात झटकण्याचा प्रयत्न केला.  शेवटी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटीतील निष्काळजीपणाविषयी प्रशासनाचे कान टाचले. दुसरीकडे गोरगरिबांची घाटी आज अनेक समस्या आणि अडचणींना तोंड देत आहे. त्याची झळ रुग्णांना बसत आहे. वरिष्ठांनी गंभीरतेने दखल घेतल्याने आगामी काही दिवसांत घाटीतील परिस्थितीत सुधारणा होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महिनाभरापूर्वी म्हणजे २५ एप्रिल रोजी रात्री घाटीत रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी मास बंक आंदोलन पुकारले. नेहमीप्रमाणे घाटी प्रशासनाने आश्वासन दिले आणि निवासी डॉक्टरांनी पुकारलेले सामूहिक रजेचे आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे घेतले. आंदोलन होऊच नये,यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडले. परिणामी दोन दिवस तब्बल ३१२ निवासी डॉक्टर गैरहजर राहिल्याने गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

घाटीत शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणलेल्या रुग्णाची सलाईनची बाटली लावण्यासाठी स्टँड नसल्याने एका बालिकेला ती बाटली हातात धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली. ९ मे रोजी समाजमाध्यमांच्या माध्यमातून हा प्रकार सर्वांसमोर आला. यावर सर्वस्तरातून टीका झाली. या घटनेनंतर सुधारण्याऐवजी याच रुग्णाला घाटीची बदनामी केल्याचे म्हणून रुग्णालयातून हाकलून देण्याचा प्रकार झाला. त्यासाठीही रुग्णाकडेच बोट दाखविण्यात आले. बालरोग विभागात ३२ तासांमध्ये ८ बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार २२ मे रोजी समोर आला. बालकांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत. डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी बालकांच्या उपचारासाठी प्रयत्न केले, हे खरे आहे; परंतु या घटनेचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे गांभीर्य फारसे दिसले नाही. दबाव, चालढकलपणामुळे तब्बल वर्षभर अभय दिल्यानंतर निवासस्थानातील अनधिकृत रहिवाशांवरील कारवाईला प्रशासनाला मुहूर्त सापडला. चार दिवसांच्या कारवाईनंतर वर्षभर आसरा दिलेल्या ६० अनधिकृत रहिवाशांची हकालपट्टी झाली.

या सगळ्या घटनाक्रमात २५ मे रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचनारूपी औषधी डोस दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) हे एक शासकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय आहे. गोरगरीब रुग्णांना त्याचा आधार मिळतो. घाटी रुग्णालयाची विश्वासार्हता कमी झाली, तर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ गोरगरिबांवर येईल.

घाटीची विश्वासार्हता टिकली पाहिजे,अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले. त्यामुळे डॉ. लहाने यांनी केलेल्या किमान स्थानिक पातळीवरील सूचनांचे पालन करून प्रशासनाने घाटीची आधारवडरूपी सावली गोरगरिबांवर कायम राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी रुग्णांबरोबर सोयीसुविधा, योग्य नियोजन, वरिष्ठ पाठपुरावा करून प्रशासनाने घाटी रुग्णालयाचे आरोग्य सुधारण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: The time to give priority to improving the health of the Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.