विस्तार आणि आधुनिकीकरणाचे ‘टेकऑफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:34 PM2018-04-26T12:34:42+5:302018-04-26T12:36:09+5:30

२१ नोव्हेंबर २००८ रोजी  चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारत, कंट्रोल टॉवर आणि फायर स्टेशनचे उद््घाटन झाले. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले.

'Takeoff' for expansion and modernization | विस्तार आणि आधुनिकीकरणाचे ‘टेकऑफ’

विस्तार आणि आधुनिकीकरणाचे ‘टेकऑफ’

googlenewsNext

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : विमान अपघाताच्या भयग्रस्त घटनेनंतर गेल्या २५ वर्षांत चिकलठाणा विमानतळाचा कायापालट झाला. आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून विस्तार, आधुनिकीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाने ‘टेकआॅफ’ घेतले.मराठवाड्याच्या हवाई उड्डाणाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या नव्या आधुनिक विमानतळाने औरंगाबादला पर्यटन आणि उद्योग विकासाची नवी दालने खुली झाली. नागरी उड्डयन मंत्रालय आणि जपानमधील आंतरराष्ट्रीय सहकार बँक यांच्या संयुक्त सहकार्याने विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पासाठी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. २००७ मध्ये केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या प्रकल्पाची कोनशिला बसविण्यात आली. 

२१ नोव्हेंबर २००८ रोजी  चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारत, कंट्रोल टॉवर आणि फायर स्टेशनचे उद््घाटन झाले. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले. सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीच्या विमानसेवामुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. जानेवारी २००५ पासून चिकलठाणा विमानतळावरून थेट जेद्दाहला जाण्यासाठी हज यात्रेकरूंसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली. हज यात्रेला जाण्यासाठी भाविक आणि नातेवाईकांना मुंबईत जाऊन दोन ते तीन दिवस थांबून विमान प्रवास करावा लागत असे. आता परिस्थिती बदलली आहे. हज यात्रेसाठी निवड झाल्यावर भाविक औरंगाबादहून विमानाने थेट जेद्दाहला जाऊ शकतात. औरंगाबादसह मराठवाड्यातील हज यात्रेकरूंची सोय झाली.

२५ वर्षांपूर्वी...

५५८ एकर भूखंडाच्या परिसरात पसरलेल्या चिकलठाणा विमानतळाचा फारसा विकास झालेला नव्हता. प्रारंभी इंडियन एअरलाईन्सची ही एकमेव विमानसेवा होती. हे एक विमान वगळता हवाई प्रवासाची दुसरी कोणतीही सुविधा नव्हती. हे विमान चुकले की, बस अथवा रेल्वेने मुंबई जाऊन दिल्लीसाठी विमान गाठावे लागायचे. टर्मिनल इमारतीचीही क्षमता केवळ दोनशे प्रवाशांची होती. ही इमारत वातानुकूलितही नव्हती. पार्किंगच्या जागेत ७५ पेक्षा जास्त वाहने उभी करता येत नव्हती. 

आता...

विमानतळाची धावपट्टी ७ हजार फुटांवरून ९ हजार ३०० फुटांची झाली.  आता एकाच वेळी चार बोर्इंग आणि दोन छोटी, अशी सहा विमाने थांबू शकतात. आजघडीला एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. नवीन इमारत संपूर्णत: वातानुकूलित आहे. याठिकाणी ७०० प्रवासी गर्दीच्या वेळी ये-जा करू शकतात. एरोब्रीजद्वारे प्रवाशांना थेट विमानात प्रवेश करता येतो. विमानतळावर व्हीआयपी कक्ष, फ्लाईट इन्फर्मेशन डिस्प्ले, सरकता जिना, उपाहारगृह, एटीएम, विमान कंपन्यांचे कक्ष आदी सेवा आहेत.सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण विमानतळावर करडी नजर ठेवली जाते. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असलेल्या विमानतळाच्या इमारतीत आॅटोमॅटिक इंटेलिजंट फायर अलार्म (एआयएफए) बसविण्यात आलेले आहे. यदाकदाचित कुठे आग लागली तर ही यंत्रणा वेळीच सावध करते. 

‘तो’ रस्ता बंद...
२५ वर्षांपूर्वी चिकलठाण्यातील रस्ता बीडकडे जाण्यासाठी वापरला जायचा. या रस्त्यावरील एका कापसाच्या ट्रकला विमानाचे मागचे चाक घासले आणि दुर्दैवी अपघात घडला. या घटनेनंतर विमानतळाची सुरक्षा भिंतीची हद्द वाढविण्यात आली. चिकलठाणामार्गे बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर कधीकाळी जड वाहनांची वर्दळ असायची. परंतु सुरक्षा भिंतीमुळे हा रस्ता कायमचा बंद झाला. 

अत्याधुनिक यंत्रणा
अपघाताच्या घटनेनंतर विमानतळावर इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीम, ग्लाईड स्लोप मशीन, डोप्लर ओम्नी रेंज, डिस्टन्स मेजरिंग, अशा विमानांच्या टेकआॅफ आणि लँडिंगच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. 

Web Title: 'Takeoff' for expansion and modernization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.