sell | बीट

- हंसराज जाधव

प्रत्येक अडतीवर जाऊन व्यापारी बीट करीत होते. मालाच्या पोत्याला बांबू लावून माल काढीत होते. काढलेल्या किलो-अर्धाकिलो मालातले ओंजळभर दाणे हातात घेऊन वर उधळत होते, दोन-चार दाणे तोंडात टाकून चाऊन बघत होते, थुंकून टाकत होते. ओंजळीतल्या दाण्याला वर उडवत खेळत होते दाण्याशीही अन् शेतकर्‍यांशीही! माल उधळत बोली लावत होते,

‘बत्तिसे. बत्तिसे दहा... बत्तिसे वीस...’

बत्तिसे वीसच्या वर कोणी बोली लावत नाही हे बघून पुकारणारा पुन्हा ओरडत होता, ‘बत्तिसे वीस एक. बत्तिसे वीस दोन. बत्तिसे वीस तीन.’ ज्याचा माल आहे त्याला न विचारताच भाव ठरवला जात होता. बोली ऐकून शेतकरी ‘मायला, पस्तीशानं तरी जायाचा व्हय’ म्हणत हात चोळीत बाजूला होत होता. विलास पोत्याजवळ उभं राहून हे सारं पाहत होता. ‘आपल्या अडतीचा नंबर कधी लागते की?’ म्हणत विलासनं मालावर नजर टाकली अन् परत एकदा चुंगडे मोजले, एक... दोन... तीन... आठ...!

विलास उभा असलेल्या पोत्याजवळ येत व्यापार्‍याने हातातला बांबू दोन-तीनदा खसाखस पोत्यावर मारला तसे अर्धाएक किलो उडीद बाहेर आले. विलासला घटकाभरासाठी कुणीतरी आपल्याच पोटावर सपासप वार करतंय आणि आपला कोथळाच बाहेर काढतंय असं वाटून गेलं. त्याला दर्र घाम फुटला. तंद्रीतून बाहेर येत त्यानं भवताली पायलं. व्यापारी ओंजळीत घेतलेले उडीदाचे दोन-चार दाणे तोंडात टाकून बाकीची ओंजळ जमिनीवर फेकत होते. दाणे चावत-चावत एका व्यापार्‍यानं शंका उपस्थित केली,

‘माल थोडा पाणी लागलेला दिसालाय, नमसर वाटालाय!’ ओंजळीतल्या दाण्यांसी चाळा करीत उभे असलेले व्यापारी माल बघून उगीच नाकं मुरडत होते. त्यांचे चेहरे बघून विलास धास्तावला, माल तर चांगला आहे मग बेपारी असं का म्हणालेत? त्यानं पोत्यातले ओंजळभर उडीद हातात घेत धाडस केलेच, ‘नाही शेठ, माल चांगला हाय, बगा की तुम्ही! एकबी पाणी लागलं नाही साहेब शेंगंला! दोन-चार दिवसापासून माल पडून हायनं अडतीला, म्हणून नमसर वाटत आसल. चावून बगा की एकदा तुमी...’ असं म्हणत विलासनं हातातले ओंजळभर उडीद व्यापार्‍याच्या पुढं धरले. बांबू मारलेल्या व्यापार्‍यानं नाखुशीनंच विलासच्या हातातले उडीद घेतले आणि परत त्या दाण्याशी चाळा करीत तो बोलू लागला, ‘चांगला माल काय आम्हाला नको हाय का मामा? आम्ही घेयालाच बसलो की! बघा तुमीच, दाणा कचकच तरी वाजालाय का?’असं म्हणतच त्यानं हातातले दाणे जमिनीवर टाकले आणि बुटासहितच रगडणं सुरू केलं. व्यापारी दाण्यावर नाही आपल्या छाताडावरच नाचतोय जणू बुटासहित! विलासच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मागचा- पुढचा विचार न करता त्यानं दाणे रगडणार्‍या व्यापार्‍याच्या कानाखाली खणकन लगावली.

बघता-बघता एकच गोंधळ उडाला. हो रे हो... आंडोला झाला. व्यापारी, अडते, सोबतचे हमाल ओरडू लागले. इकडं विलासच्या मालाजवळ जमलेले शेतकरी, वाहनाचे ड्रायव्हर खवळले. लोकं सोबत असल्याचं बघून विलासलाही चेव आला. त्यानं एक नजर त्या व्यापार्‍यावर टाकली. त्याच्या नजरेतला अंगार आता शब्दातून बाहेर पडू लागला, ‘तुमच्या काय मायच्या... हाय का माल? दोन-तीन घंट्यापसून बगालो मी... तुमाला किंमतच न्हाई आमच्या कस्टाची! पोत्यावर खसाखस बांबू मारून माल सांडविता काय... ओंजळीत घेऊन उधळिता काय.. चाऊन काय बघता... अन् आता तर बुटानं रगडणं चाललंय! तुम्ही बुटाखाली दाणे रगडीत न्हाई, आमचं छाताड रगडिताय! रगडा खुशाल, नाचा छाताडावर आमच्या; पण लक्षात ठिवा! लक्ष्मी हाय ती आमची... अन् लक्ष्मीला तुडविलं तर बरं होणार न्हाई तुमचं...!’ विलासच्या बोलण्यानं सगळं वातावरण तंग झालं.

व्यापार्‍याला शेतकर्‍यानं मारल्याची बातमी हा... हा... म्हणता सगळ्या मोंढ्यात पसरली. बघता-बघता झाडून सगळे व्यापारी, अडते जमा झाले. झुंबड उडाली. सगळ्या शेतकर्‍यांना विलास बोलतो ते खरं वाटत होतं. ‘अडत्या-व्यापार्‍यांची मुजोरीच वाढली हो! पण बोलावं कोणं? बरं झालं हाणलं ते... आणखी दोन हाणायला पाहिजे होतं...’ कोणी काही कोणी काही बोलू लागलं. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचा रागरंग ओळखला. ‘यांच्या तोंडी लागण्यात अर्थ नाही’ म्हणत व्यापारी महासंघाच्या अध्यक्षानं ‘आम्ही या मालाचं बीट करणार नाही!’ म्हणत विलासच्या मालावर बहिष्कार टाकल्याचं घोषित केलं. शेतकरीही बीटंसाठी आपापल्या मालाकडं निघून गेले. विलास मात्र घडीत बीट न होणार्‍या चुंगड्यांकडं पाहू लागला अन् घडीत व्यापार्‍यांच्या बुटाखाली रगडल्या गेलेल्या दाण्याकडं...

( hansvajirgonkar@gmail.com )


Web Title: sell
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.