देखा एक ख्वाब तो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:08 PM2018-07-21T16:08:57+5:302018-07-21T16:09:35+5:30

ललित : एकेक स्वप्नं तळहातावर घेऊन गोंजारून घ्यावं..विचारून घ्यावी त्यांची ख्याली खुशाली.. मायेनं हात फिरवून लख्ख पुसून घ्यावी कंदिलकाच स्वप्नांवरची.. मग झकास उजेडात न्हावून निघतील सगळे कोपरे मनाचे.. उमलू पाहणाऱ्या स्वप्नांना उमलत ठेवावं तलमपणे अन् कोमेजल्या स्वप्नांचं निर्माल्य राखीव ठेवावं खास नव्या स्वप्नांच्या उमलवेळांसाठी!! 

Saw a dream ... | देखा एक ख्वाब तो...

देखा एक ख्वाब तो...

googlenewsNext

- ज्योती कदम

तू कोणताही असो आणि वेळ कोणतीही असो..एखाद्या निवांत कोपऱ्यात शांत बसावं.. सैल सोडावेत सगळेच अणू-रेणू. निवांत करावं श्वासांनाही.. त्यांना उगा बांधून ठेवूच नये घड्याळाच्या काट्याला.. डोळे बंद असले तरी आतून उघडे असावेत. अशा चातकवेळी बुबळांजवळ केंद्रित होऊ द्यावीत सगळी स्वप्नं.. पाहिलेली.. न पाहिलेली.. स्वत:ला सांगितलेली किंवा स्वत:शी अव्यक्त असलेलीही.. प्राजक्ताची टपोरी फुलं पहुडतात ना जमिनीवर.. कधी बेबंद बेहिशेबी, तर कधी मातीच्या कुशीत लाडावून विसावलेली.. तशीच ही सगळी स्वप्नं.. पहडू द्यावीत.. इतस्तत: अव्यक्त!

एकेक स्वप्नं तळहातावर घेऊन गोंजारून घ्यावं..विचारून घ्यावी त्यांची ख्याली खुशाली.. मायेनं हात फिरवून लख्ख पुसून घ्यावी कंदिलकाच स्वप्नांवरची.. मग झकास उजेडात न्हावून निघतील सगळे कोपरे मनाचे.. उमलू पाहणाऱ्या स्वप्नांना उमलत ठेवावं तलमपणे अन् कोमेजल्या स्वप्नांचं निर्माल्य राखीव ठेवावं खास नव्या स्वप्नांच्या उमलवेळांसाठी!! तरारून आलेल्या स्वप्नांवरून ओवाळून टाकावा डोळ्यातील आसवांचा भाकरतुकडा आपलीच नजर लागू नये म्हणून. खूप हळव्या अन् तलम असतात अशा क्षणांच्या मैफली. खास आपणच आपल्यासाठी सजवलेल्या..
परप्रकाशी असूच नये मनानं कधी.. स्वयंप्रकाशाचा वारसा जपावा आपणच आपल्याला दिलेला. उजेडाचं चिलखत कायम असावं आपल्या मनावर..अंधाराच्या साम्राज्याला नामशेष करण्यासाठी! वय, जात, धर्म, लिंग यापलीकडे नेणारे हे उजेडदूत आपणच शोधून आपल्या तैनातीत नेमून ठेवायचे कायमचेच. तेव्हा मनाचं सिंहासन कुण्या काळोखाच्या आरोळीनं कधीच डगमगणार नाही हे नक्कीच!

काळोखाच्या गडद वर्तुळाला भेदत उजेडस्वप्नांची जेव्हा कुस उगवते तेव्हाच विश्वाला चकित करणारी क्रांती घडते. वर्षानुवर्षांच्या इतिहासाने हेच तर सिद्ध केलंय. खरं तर स्वप्नं पाहणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार असतो, तर ती स्वप्नं पूर्ण होण्यासाठी जगणं..लढणं ही आपली मूलभूत गरजच. कुणीतरी पाहिलेल्या एका अनादि अनाम स्वप्नाची फलश्रुती म्हणजेच आपला हा अनादि अनंत प्रवास..भटक्या अवस्थेपासून ते आजच्या या ग्लोबल जगापर्यंतचा. ‘देखा इक ख्वाब तो ये सिलसिले हुएँ...!’ असाच काहीसा हा प्रवास, स्वप्नं पाहिली नसती तर हा प्रवास अस्तित्वात  नसता अन् हा प्रवासच जर नसता तर ही स्वप्नंही पाहिली नसती.. किती परस्परावलंबी अवस्था. कदाचित यामुळेच पूर्णत्व लाभत असावं जगण्याला.. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाला. स्वप्नांचं बोट हातात नसतं तर किती उरलो असतो आपण..फक्त आपण म्हणून.. कदाचित भिंतीवरच्या एका बंदिस्त चंदनहार घातलेल्या तसबिरीएवढे की भिंतीवरच्या त्या एका निरर्थक खिळ्याएवढे! या खिळ्यांचं निरर्थक अस्तित्व कू्ररपणे आपल्या कणाकणावर गोंदवल्या गेल्यानंतरही येशूनं पाहिलंच की मानवजातीच्या कल्याणाचं महास्वप्नं.. त्या कू्रर अपराधी हातांसाठीही क्षमायाचना करीत.

प्रचंड दयाभावाचं हे एकमेव उदाहरण अजूनही अख्ख्या मानवजातीला तारून नेणारं.. दिव्यत्वाची महाप्रचीती देणारं. उजेडभरल्या डोळ्यांनी पाहिलेल्या या कल्याणस्वप्नांनं संपूर्ण विश्वाला दिशा दाखवली. कितीतरी कू्ररकर्मे या पृथ्वीतलावर आले... अतोनात छळांनी गांजून टाकला त्यांनी काही काळ.. पण संपावंच लागलं त्यांनाही एका निर्णायक क्षणी.. भेदरलेल्या अवस्थेत ते लयास गेले; पण सतत कायम जिवंत राहिलं ते मानवजातीच्या चिरंतन कल्याणाचं तेच महास्वप्नं.. असं एखादं चिरंतन सुंदर स्वप्नं आपल्यालाही पडावं.. त्या स्वप्नांनं भारावून जावं..त्या टवटवीत स्वप्नगंधाला प्राशून घ्यावं आपणही तहानलेल्या डोळ्यांनी.. कणाकणात भरून यावा जीवनरस.. चैतन्यानं ओतप्रोत वाहत राहावं आपलं अस्तित्व. अशी लागावी स्वत:ची स्वत:शी समाधी..ऋतू कोणताही असला तरी..फक्त गुणगुणत राहावं.. ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुँए..’ 

( Jyotikadam07@rediffmail.com )

Web Title: Saw a dream ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.