सालगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 06:56 PM2018-03-24T18:56:44+5:302018-03-24T18:58:42+5:30

लघुकथा : ‘आसंच चालायचं न्हाई. आसंच चालत हाय. सालोसाल.  म्हणून तर असल्या वैतागानं तर दरवर्षी शेकड्यानं शेतकरी मरत्यात की. कधी निसर्ग कोपतो. कधी सरकार कोपतं. कधी हे मजूर. सालगडी कोपतात. या सगळ्यांच्या धक्यातून शेतकरी मरणार न्हाई तर काय जगणार हाय काय रं माज्या लेका. 

Saalidi | सालगडी

सालगडी

googlenewsNext

- प्रदीप धोंडिबा पाटील 

किर्र उन्हात बिजूरच्या बसस्टॉपवर उतरलो. गावाकडे जायला कसले वाहन दिसत नसल्यामुळे डोक्याला गच्च रुमाल बांधून मळलेल्या मधल्या वाटेने गावाकडे निघालो.  वाटेत केरबा नानाचा मळा लागला. बारमाही हिरवागार राहणारा मळा पुरता ओकाबोका वाटत होता. मळ्याभोवतालची हिरवीगर्द झाडी  कुठल्या कुठे गायब झाली होती. मळ्यातल्या वाटंकडंच्या चिंचेच्या झाडाखाली केरबा नाना कसल्या तरी विचाराच्या तंद्रीत बसलेला दिसला. त्याला हटकून प्यायचं पाणी असल्याचं विचारलं. त्यानं पाणी असल्याचं सांगून चिंचेच्या बुडाला मातीच्या बिंदग्यात असलेलं थंडगार पाणी काढून दिलं.  दोन- तीन वटक्या पाणी पोटात रिचविल्यावर थोेडंसं हायसं वाटलं.  काही तरी बोलावं या उद्देशाने मी म्हणालो, ‘काय चाललंय मग केरबा नाना’. ‘काई न्हाई रं बापू. काय हाय चलायला. येळचं येळला कुटका घास खावाव अन्  हे वसाड मळा राखत हार्वावं. दुसरं काय काम हाय आता.’
‘गुढीपाडवा आलाय आता. गेल्या सालचाच सालगडी हाय की नवा सालगडी ठेवल्या आमंदा’
‘सालगड्याचं आता काई इच्यारू नगस बाबा’.
 ‘का...काय झालं....?’ मी न राहवून म्हणालो. 
‘आरं बापू काय सांगावं तुला. गेलसालचा गडी ऐंशी हजार नगदी रुपये घेऊन चार-सहा महिने काम करून जो निघून गेलाय त्यो आता पतुरबी गायबच हाय. ‘शोध घेतला नाही त्याचा.’ ‘घेतला की, त्यासाठी दुसरे धा- ईस हजार येगळेच गेले’. मंग वर्षभर कशी केली मंग कुणबीक. 
‘कशाची कुणबीक? सगळं काम पासलं पडलं. ऐन अर्ध्या सालात सुगीच्या मोसमात रांड रंडकी केला भाड्यानं... लेकरा बाळाच्या तोंडात माती घालून, दुभती म्हैस इकून, ऐन उन्हाळ्यात भारोभार पैसा मोजून भर्ती केली व्हती साल्याची. 
‘यावर्षी काय करताय मंग सालगड्याचं’
‘काई समजेनासं झालंय बघ.’ 
‘यावर्षीचा धारा काय निघाला मंग?’ 
‘धार्‍याला काही लगाम राहिला न्हाई बापू.  लाखभर देऊन, नव्वद नगदी म्हणत्यात.’ 
‘आन् गेल्यासालसारखं पळून गेलं तर....’ 
गेला तर गेला. त्याला कोण आडविणार? एवढे पैसे घेऊन त्यानं साल काढणं म्हणजे त्याची इमानदारी आन् आपलं नशीब माणायचं.’
‘तो गावात कधी तरी येईलच की....’
‘येऊन काय करणारयस तू त्याचं...’ 
‘चार माणसं बोलवाव. फजिती करावं’ 
‘हथ लेका, त्यानं काय साधणार हाय? त्या उघडगांड्या लोकांजवळ काय बोचिंगा  राहणार  हाय व्हय.?’ 
‘मग हे असंच चालायचं’ 
‘आसंच चालायचं न्हाई. आसंच चालत हाय. सालोसाल.  म्हणून तर असल्या वैतागानं तर दरवर्षी शेकड्यानं शेतकरी मरत्यात की. कधी निसर्ग कोपतो. कधी सरकार कोपतं. कधी हे मजूर. सालगडी कोपतात. या सगळ्यांच्या धक्यातून शेतकरी मरणार न्हाई तर काय जगणार हाय काय रं माज्या लेका. तुज्या नवकरीसाठी तुझा बाप होतं ते एकरभरभी ईकून मोकळा झाला ते लई बेस झालं. ही शेती आमच्या गळ्याचा फास होऊन बसली’. 
‘गुढीपाडवा हाय. नव्या सालाचं असं बोलू नका नाना’.
‘गुढीपाडवा आता शेतकर्‍याला सुखाचा -हाईला न्हाई. गुढीपाडवा आला म्हंलं तरी काळजात धस्स होतंय.. सालगड्याच्या धस्सकीनं शिंमग्यापासून गुढीपाडव्या पतूर डोळ्याला डोळा लागेना. कुठल्या कुठं झोप उडून जातीया. सालगड्याच्या तजवीजीनं जीव रडकुंडीला येतोया. दमडीचा माल होत न्हाई. आन् लाखानं तजवीज कशी करायची असं म्हणत... म्हणत एकाएकी केरबा नानाचा कंठ दाटून आला. त्याचा राठ हात मी आपल्या हातात घेतला. 
केरबा नानाला तेवढाच माझा आधार वाटला. तो माज्या खांद्यावर आपलं डोकं टेकवून हमसूहमसू किती तरी वेळ रडत होता.
( patilpradeep495@gmail.com )
 

Web Title: Saalidi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.