शताब्दीनिमित्त तीन महामानवांच्या विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:13 AM2018-04-13T00:13:50+5:302018-04-13T00:16:39+5:30

राज्यातील अनेक सामाजिक चळवळींची सुरुवात ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून होण्याचा इतिहास आहे. या शहरात महाराष्ट्राची विचारधारा असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुतळा नसल्याचे १९९० साली निदर्शनास आले.

For the purpose of the centenary celebrations Jagar of three Mahamanvas | शताब्दीनिमित्त तीन महामानवांच्या विचारांचा जागर

शताब्दीनिमित्त तीन महामानवांच्या विचारांचा जागर

googlenewsNext

- राम शिनगारे

मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा नव्हता. भव्य पुतळा उभारण्यात यावा, ही जनतेची मागणी होती. याचा विचार करून बाबासाहेबांच्या १०० व्या जयंतीनिमित्ताने भडकलगेट येथे पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच  १३ एप्रिल १९९१ रोजी भव्य पुतळ्याचे थाटात अनावरण करण्यात आले. तेव्हापासून भडकलगेट हे ठिकाण आंबेडकरी अनुयायांचे स्फूर्तिस्थान बनले आहे.

राज्यातील अनेक सामाजिक चळवळींची सुरुवात ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून होण्याचा इतिहास आहे. या शहरात महाराष्ट्राची विचारधारा असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुतळा नसल्याचे १९९० साली निदर्शनास आले. आगामी वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे शताब्दी वर्ष होते. या वर्षाच्या निमित्ताने तेव्हा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती रतनकुमार पंडागळे यांनी शहरातील फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा ठराव मांडला. या ठरावानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या एक दिवस म्हणजेच १३ एप्रिल १९९१ रोजी भडकलगेट येथील भव्य पुतळ्याचे लोकार्पण उत्तर प्रदेशातील महाथेरो ग. प्रज्ञानंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी तत्कालीन विभागीय आयुक्त बी.एन. मखिजा होते, तर महापौर प्रदीपकुमार जैस्वाल, मनपा आयुक्त मुन्शीलाल गौतम, उपमहापौर मुजीब आलमशाह खान आणि स्थायी समिती सभापती रतनकुमार पंडागळे उपस्थित होते. यातील महाथेरो ग. प्रज्ञानंद यांनी १९५६ साली नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धम्माची दीक्षा दिलेली होती. या ऐतिहासिक संदर्भामुळे शहरात शताब्दी जयंती अभूतपूर्व अशा उत्साहात साजरी झाली होती, अशी माहिती तत्कालीन मनपाच्या स्थायी समितीचे सभापती रतनकुमार पंडागळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

एकाच वर्षात तिन्ही महामानवांचे पुतळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त शहरात फुले-शाहू-आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही १९९१ साली झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण १३ एप्रिल रोजी झाले, तर पुढे काही कालावधीनंतर औरंगापुऱ्यातील चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे लोकार्पण निळू फुले, तत्कालीन कुलगुरू डॉ. शिवाजीराव भोसले, ज्येष्ठ पत्रकार बाबा दळवी यांच्या उपस्थितीत झाले. यानंतर शेवटी मिलकॉर्नर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाल्याची माहिती रतनकुमार पंडागळे यांनी दिली.

Web Title: For the purpose of the centenary celebrations Jagar of three Mahamanvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.