महापूर येथील अष्टोत्तरशत शिवलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 06:29 PM2018-02-17T18:29:08+5:302018-02-17T18:30:16+5:30

प्रासंगिक : लातुर जिल्ह्यातील महापूर येथे १०८ शिवलिंगे असलेल्या ‘अष्टोत्तरशर शिवलिंग’ या शिवलिंगाची माहिती मंगळवारी (दि.१३) झालेल्या  महाशिवरात्री निमित्त प्रसिद्ध करण्यात येत आहे.

The octetal shivaling in Mahapur | महापूर येथील अष्टोत्तरशत शिवलिंग

महापूर येथील अष्टोत्तरशत शिवलिंग

googlenewsNext

- डॉ. किरण देशमुख

अगदी सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासूनच आपल्या देशात विविध धर्म-पंथांचा सर्वत्र प्रसार झाला. प्रभाव राहिलाय. म्हणूनच तर येथे अनेक देव-देवतांची नाना स्वरूपात पूजा-अर्चा, जप-तप इ. प्रकारे भावपूर्ण भक्ती-उपासना सुरू झाली. त्यात शिव व विष्णूला सर्वाधिक महत्त्व मिळाले. त्याला महाराष्ट्र अपवाद कसा राहील? हा मराठी मुलूख तर अधिकाधिक शिवोपासक असल्याचे येथील उपलब्ध शैव देवालये आणि मूर्तींवरून सहजच लक्षात येते. म्हणूनच तर,

‘ध्यायोन्नित्यं महेशं रजतगिरीनिभं चारुचन्द्रावतंसं ।
रत्नाकहपोज्वलांग् परशुमृगवर भितिहस्तं प्रसन्नम् ।।
पद्मासिनं समन्तात सुतभमगणैब्यार्धाकृतिं वसानं ।
विश्वाय विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्रं त्रिनेत्रम्।।

असे रूप वर्णन असलेल्या भगवान शिवाची आराधना गावोगावी, देऊळी-राऊळी नित्यनेमाने सुरू आहे.
त्यातूनच देशातील १२ जाज्वल्य ज्योतिर्लिंगांपैकी ५ ज्योतिर्लिंगे एकट्या महाराष्ट्रातच असून, शिवाय येथील वेरूळ, घारापुरी, निलंगा, बीड, धर्मापुरी, खिद्रापूर, अंबरनाथ, मार्कण्डी, औंढा वगैरे ठिकाणची भव्य देवालये आणि लेणीतून ‘दृष्ट लागण्याएवढी श्रेष्ठ’ असलेल्या शैव शिल्पाकृती कोरण्यात आल्यात. शिवाय याच प्रांतात मला अनेक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवमुखलिंगे आणि द्वादश-शिवलिंगेही उपलब्ध झालीत.
कैलासराणाची उपासना मूर्ती तसेच शिवलिंगाद्वारेही होत असते. स्वयंभू व मानुषलिंग हे शिवलिंगाचे दोन मुख्य प्रकार असून, स्वयंभूलिंगे यदृच्छेने आपोआप निर्माण होतात, तर मानुषलिंगे ही मुद्दाम घडविलेली असतात. शिवलिंगे चल व अचल स्वरूपाची असतात. पूजेसाठी घरोघरी चल प्रकारातील शिवलिंगे असतात, तर अचल स्वरूपातील शिवलिंगे देवालयात कायम स्थितीत प्रतिष्ठापित केलेली असतात. शाळुंकेसह असलेल्या शिवलिंगाला सयोनिलिंग म्हणतात. त्यातील शाळुंका हे योनिप्रतीक, तर ऊर्ध्व पाषाण लिंगप्रतीक समजतात. स्त्री-पुरुषाच्या संयोगातून सृष्टी निर्मिती होते, असा याचा भावार्थ आहे. पूर्ण शिवलिंगाचे रूपवर्णन लिंगपुराणात-

‘मूले ब्रह्मा तथा मध्ये विष्णूस्त्रिभुवनेश्वर: ।
रुद्रोपरि महादेव:, प्रणवारण्य: सदाशिव: ।।
लिंगवेदी महादेवी, लिंगं साक्षान्महेश्वर:।
तयो: संपूजनान्नित्यं देवी-देवश्च पूजितौ ।। ’
या प्रकारे आहे. 

शिवलिंगातील शाळुंका म्हणजे पार्वती आणि लिंग म्हणजे साक्षात शिवच होय. लिंगाचा मूळभाग म्हणजे ब्रह्मा, मध्यस्थान म्हणजे विष्णू आणि ऊर्ध्वभाग (ज्याच्यावर बेल-फुलाने पूजा करतात) म्हणजे शिव. शाळुंका व शिवपिंडीही अनेक आकार व प्रकारांत घडवितात. शिवपिंडीवर जेव्हा शिवमुखे कोरलेली असतात तेव्हा त्याला म्हणायचे शिवमुखलिंग. तसेच काही शिवलिंगांत मुखाऐवजी ठराविक संख्येत लहान आकारांतील शिवलिंगेही आढळतात. अशा शिवलिंगांना अष्टोत्तरशत (१०८ शिवलिंगे), सहस्रलिंग (१,००० शिवलिंगे) तसेच धारालिंग (यात शिवलिंगावर उभ्या पन्हाळ्या कोरल्याने ‘धार’ तयार होते) असे म्हणतात. ती अतिशय दुर्मिळ असतात.

असेच एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टोत्तरशतलिंग महापूर (ता. रेणापूर, जि. लातूर) येथे उपलब्ध झालेत. महापूर हे छोेटेसे गाव लातूरहून सुमारे ८ कि.मी., तर रेणापूरहून १० कि.मी. अंतरावर असून, तेथे लातूरहूनच जाणे सोयीचे आहे. महापूर गावाजवळच असलेल्या एका शिवमंदिरात प्रस्तुत अष्टोत्तरशत शिवलिंग उपलब्ध आहे. या शिवलिंगातील शाळुंकेवर मध्यस्थानी शिवपिंड असून, तिच्या सभोवताल असलेल्या शाळुंकेच्या पृष्ठभागावर ३ ओळीत अनुक्रमाने ४०, ३५ व ३३, अशी १०८ लहान आकारांतील शिवलिंगे कोरलेली आहेत. म्हणून या शिवलिंगाला संबोधावयाचे- ‘अष्टोत्तरशत शिवलिंग.’ वास्तविक मूर्तिशास्त्रानुसार १०८ शिवलिंगे शिवपिंडीवरच कोरावयाची असतात; पण येथील अज्ञात मूर्तिकाराने ग्रांथिक संकेत किंचित बाजूला ठेवून स्वकल्पनेनुसार १०८ शिवलिंगे येथील शाळुंकेवरच अगदी व्यवस्थित, समआकारातच कोरून या शिवलिंगाचे वेगळेपण स्पष्ट केले आहे. हे विशेष होय. 

प्रामाणिक शिवभक्ताला विधिवत शास्त्रोक्त शिवपूजा येथे करीत असताना अज्ञात; पण मोठ्या कल्पक असलेल्या मूर्तिकाराने प्रस्तुत शिवलिंगात १०८ शिवलिंगे कोरून, शिवाची अष्टोत्तरशत नामावली उच्चारताना प्रत्येकवेळी बेलफूल वाहण्यासाठी एक-एक स्वतंत्र शिवलिंग अखंड पाषाणात कोरले, हेच येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य होय. तसेच येथे मुख्य शिवपिंडीवरील आणि शाळुंकेवरील ३ ओळीत असणार्‍या १०८ शिवलिंगांवरीलही अभिषेकाचे जल वाहून जाण्यासाठी शाळुंकेवरच पन्हाळीचीही उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, हे दुर्लक्षिता येत नाही.

महापूर येथील प्रस्तुत अष्टोत्तरशत शिवलिंग इ.स.च्या सुमारे ११-१२ व्या शतकातील असून, मांजरा नदीच्या काठावरील हे दुर्मिळ शिवलिंग सध्या दुर्लक्षित असून, शासन व समाजाने त्याचे व्यवस्थित संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी सरकारने महापूरला तीर्थस्थळाचा दर्जा देऊन येथे येणार्‍या भक्त आणि कलारसिकांसाठी रस्ते, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, विश्रामगृह इ. सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. महापूरला शासनाने पर्यटन केंद्र म्हणून विकसित करून, येथील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंगाला ‘लक्षवेधी’ बनविले पाहिजे. कारण अशाच स्वरूपाची अष्टोत्तरशत शिवलिंगे पाटेश्वर (जि. सातारा) व दक्षिण भारतात तिरुवरियूर येथेच उपलब्ध आहेत. म्हणूनच कलेच्या दृष्टीने हे अष्टोत्तरशत शिवलिंग ‘असामान्य’च ठरते.

Web Title: The octetal shivaling in Mahapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.