‘न-नैतिक जमात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 08:00 PM2018-04-07T20:00:56+5:302018-04-07T20:02:06+5:30

वर्तमान : वर्तमानात सर्वात महत्त्वाची पण समाजातून तितकीच दुर्लक्षित केल्या जाणारी बाब काय असेल; तर ती समाजातून हद्दपार होत चाललेली नैतिकता होय. नैतिक मूल्यांची पडझड, मूल्य ºहास; हा खरा तर आजच्या समाजाला व्यापून टाकणारा प्रश्न आहे. परंतु तो अनुभूतीच्या पातळीवर सुटा-सुटा असल्याने त्याची धग सामूहिकपणे जाणवत नाही. परंतु ‘पूर्वी माणसं अशी नव्हती हो’! या प्रकारची अगतिकता वयस्कर माणसं सारखी व्यक्त करतात हे कशाचे द्योतक! कालाय तस्मै नम: म्हणून समाज, शासन, धर्मसंस्थासारख्या व्यवस्था माणसाच्या ‘नैतिक’ घडणीकडे दुर्लक्ष करीत जातील, तसे समाजाचे अध:पतन वेगाने होत जाऊन न-नैतिक समूह  आकार मोठा घेईल. हे खरं असलं तरी फक्त ‘शिक्षण’ आणि ‘धम’ या दोहोंच्या माध्यमातून समाज ‘नैतिक’ बनेल हा आशावाद आजच्या काळात ‘ओयासिस’ म्हणावा लागेल. शाळेत मूल्य शिक्षणाचा एक तास घेऊन किंवा प्रवचन, कीर्तनाचे पंचरंगी सोहळे साजरे करून समाजाचे नैतिक भरणपोषण होईल असे आजचे वातावरण निश्चित नाही...!

'Non-ethical tribe' | ‘न-नैतिक जमात’

‘न-नैतिक जमात’

googlenewsNext

-  गणेश मोहिते

लिहिहिण्यास कारण की...
पोटात ‘विष’ घेऊन फिरणारी ‘जमात’ तुमच्या अवतीभवती वाढीस लागली की तुम्हाला ‘डंख’ मारले जातील. तुमच्या ‘वाटा’ अडवून ‘काटा’ काढण्याचे काम गती घेईल. खोट्या-नाट्या बदनामीचे नानाविध प्रयोग रंगतील. निखळ माणूसपण नाकारत जातीपातीच्या भिंती बांधून तुम्हाला चौकटीत बंदिस्त केले जाईल वगैरे वगैरे...! ही तशी सार्वजनिक क्षेत्रात काम करताना येणारी सार्वत्रिक अनुभूती. फार तर व्यक्तिपरत्वे या अनुभूतीत बदल होईल. स्थळ-काळ बदलेल. समूह अथवा टोळी बदलेल. परिस्थिती बदलेल. मात्र कमी जास्त फरकाने प्रामाणिक काम करणाऱ्या माणसांच्या गाठीशी येणारा हा अनुभव सारखाच असावा. या मागील शक्यतांचा विचार आपण करतो तेव्हा माणसांना नेमके झाले काय? हा खरा प्रश्न आहे. ‘व्यक्तीच्या वर्तनात बदल घडून आणते ते शिक्षण’ ही शिक्षणाची प्रचलित व्याख्या आपण नेहमी ऐकतो. परंतु शिक्षणाने खरंच माणसं ‘माणूस’ होतात काय? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. ‘शिक्षणाने पशुत्व हटते पाहा’ ही भावना सावित्रीबार्इंनी व्यक्त केली होती. मात्र आजचे चित्र काय? शिक्षित माणसांच्या न-नैतिक वर्तनाने समाज अधिक असुरक्षित झाला की नाही? का वागतात माणसं अशी? एक तर सार्वजनिक जीवनातील ओलावा संपला.

या व्यवहारी वर्तमानात माणसां-माणसांमधील प्रेम, सौहार्द कमी होऊन त्याची जागा द्वेष, मत्सराने अधिक व्यापली हे सत्य नाही काय? आपल्यापेक्षा कोणी बुद्धिमान, पारंगत, निष्णात अथवा  कामावर निष्ठा ठेवून नेटाने प्रगती साधणारा असेल तर त्याचा आनंद अशा समूहाला होतो काय? उलट अशा माणसांबद्दल समज-अपसमज पसरवून स्वत:च्या नाकर्तेपणावर पांघरूण घालीत मनाला खोटा आनंद देण्याच्या भानगडीत स्वत:मधील उरल्यासुरल्या शक्यतांचा जीव घेत नाहीत काय? हे लोक. मत्सराचे बीज पोटात घेऊन वावरणाऱ्या लोकांच्या सहवासापेक्षा आपल्यातल्या ‘माणसाला’ कधी आत्मचिंतन करायला लावणार की नाही हो! एखादा चांगला असू शकतो? तर मी का नाही हा प्रश्न मूलत: या प्रवृत्तीला बेचैन का करीत नाही?

हे प्रश्न यासाठी महत्त्वाचे आहेत की समाजाच्या प्रगतीच्या धमन्या म्हणून शासन, प्रशासन, शिक्षण क्षेत्राचा उल्लेख होतो. मात्र, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचे ‘वर्तन’ तपासले की वरील बाबींचा उलगडा होतो. आमचे नैतिक असणे म्हणजे काय? आमचे न-नैतिक असणे म्हणजे काय? हा विचार दुसऱ्या कोणी यांना समजावून सांगण्याची गरज वाटत नाही. फक्त प्रत्येकाने स्वत:च्या आत डोकावले पाहिजे. उल्लेखित क्षेत्रातील माणसं नैतिक वागली तरी आमच्या राष्ट्राच्या प्रगतीला कोणी ‘बाधा’आणू शकत नाही. मात्र आमच्याकडे अशा उपद्रव मूल्य असणाऱ्या ‘जमाती’ अधिक निर्माण झाल्या आणि त्या क्षमता असणाऱ्या माणसांना काम करू देत नाहीत हे ही तितकेच खरे! तर यांना करायच्या कामापेक्षा इतर बाबतीत जास्त स्वारस्य असते. सरकारी नोकरीचे सुरक्षा कवच एकदा आमच्या भोवती निर्माण झाले की आम्ही जणू न-नैतिक वागण्याची शपथच घेतो. दुर्दैवाने अशांची संख्या अधिक आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची संख्या कायम उणी असते. वर्तमान समाजात निरपेक्ष काम करणारी आणि त्यातल्या त्यात आपल्या कामावर निष्ठा असणारी माणसं झपाट्याने कमी होत जाऊन ‘पगार’ भेटतो म्हणून किमान काम केले पाहिजे, इतकी साधी ‘नैतिकता’ शिल्लक नसलेली माणसं अधिक झालीत. ज्या वेतनाच्या माध्यमातून घरदार चालते, कुटुंब सावरते. पुढची पिढी आकार घेते व वर्तमान सुखात जाते; इतका साधा विचार करून आपल्याला ज्यासाठी चार पैसे दिले जातात. त्या बदल्यात करायच्या कामात प्रामाणिक नसणारी ‘जमात’ आपल्या अवतीभवती अधिक वाढली आहे.

कोणत्याही शासकीय, निमशासकीय आस्थापनाचा धांडोळा घ्या. ही जमात संख्येने अधिक भेटते. घड्याळी आदेशाने कार्यालयात येणे, नेहमीच्या शिरसत्याने चार-दोन डोकी बाजूला चहाला जाणे. सहकाऱ्यांची निंदा नालस्ती करणे, त्यांच्या विरोधात षड्यंत्र करणे, सामान्य माणसांना लुबाडणे, स्वत: औकात विसरून गप्पा झोडणे, कामचुकारपणा हा या जमातीचा नित्यनेमाचा उद्योग. बरं यांना अजिबात भान नसते की मी नेमके दिवसभरात किती काम करतो व काय करतो? नोकरी करतो म्हणजे नेमके काय करतो? हेच ते विसरतात. आॅफिसात जाऊन गप्पा झोडण्यासाठी मला पगार आहे की अंगावर जबाबदारी घेऊन पार पाडण्यासाठी आहे. याचा विचार ते करीत नाहीत. ते विचारत नाही स्वत:ला की मी गेल्या वर्षभरात काय दिवे लावले? मी आणि माझा परिवार ज्यावर पूर्णत: अवलंबून आहे त्यासाठी मी किती प्रामाणिक आहे. मी किती योगदान देतो.

माझ्या नावावर या दहा वर्षांच्या नोकरीच्या काळात काही ‘ठळक’ असे जमा झाले आहे काय? मी शिक्षण क्षेत्रात असेल तर माझ्या नावाने एखादा विद्यार्थी समाजात ओळखला जातो काय? खरं तर आपला समाजच दांभिक आहे. अशा लोकांना स्वीकारतो. यांना झिडकारले पाहिजे. सत्याला ‘सत्य’ व चांगल्याला चांगले म्हणण्याची हिंमत मुळात समाज गमावून बसला आहे. बेगडी रुपाला भूलणारा आणि सत्य माहीत असताना सत्याच्या बाजूने अवाक्षर न काढणारा माणूस तितकाच दांभिक असतो. पगाराव्यतिरिक्त अधिक पैसा घरी आणणारा नवरा ‘बायकोने’ आणि ‘बाप’ लेकरांनी झिडकारला तर भ्रष्टाचार आपोआप बंद होईल. मात्र परिस्थिती उलट आहे. ‘पतिव्रतेला धोंडा अन् वेश्येला मणिहार’ ही रीतच. म्हणून आजच्या व्यवस्थेत सर्वाधिक त्रास कोणाला असेल तर प्रामाणिक व स्पष्टपणे सत्य बोलणाऱ्या माणसांना होतो. तुम्हाला आज बेमालूमपणे खोटं बोलता आलं पाहिजे, तुम्ही खोटं हसायला शिकले पाहिजे. तुम्ही स्तुतिपाठक झाले पाहिजे. तुम्ही तुमच्यातील चिकित्सक दृष्टी, परखड सत्य मांडण्याची भूमिका सोडली पाहिजे. मुळात तुम्हाला भूमिका असणेच आजच्या व्यवस्थेत गैर नाही काय? तुम्ही सत्य बोलता याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात.

तुम्हाला परिस्थितीशी अ‍ॅडजेस करता येत नाही. काही काम न करता फक्त शांत राहता आले, तटस्थपणे आणि स्वत: गुंडाळून प्रेतासारखे जगता आले की तुम्ही आजचे आदर्श नागरिक. अन्यथा या व्यवस्थेविरोधात तुमचा आवाज तीव्र असेल तर तुमचे जगणे कष्टप्रद झालेच समजा. त्यासाठी प्रचंड धूर्त, बेगडी, ‘मळ’ पोटात पिकविणाऱ्या अवलादी चेहऱ्यावर मात्र निर्विकारपणा गोंदून घेतात. अशा कावेबाज, ढोंगी लोकांची वस्ती वाढते आहे. आपल्या कामावर निष्ठा ठेवून सर्वांना ‘माणूस’ म्हणून सन्मान देणारी माणसं विरळ होत असताना ढोंगी, लबाड, बेगडी वर्तन असणारा समूह माजला आहे. संताचे अंत:करण घेऊन ‘माणसाने माणूस जोडीत जावा’ हे तत्त्वज्ञान उरी बाळगून जगणाऱ्या उदारमतवादी, विवेकी माणसांना हे वर्तमान अस्वस्थ करणारे आहे!!
( dr.gamohite@gmail.com )

Web Title: 'Non-ethical tribe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.