माझ्या प्रयोगशील देशात : मूल्यविहीन व्यवस्थेचे वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 07:43 PM2018-01-01T19:43:50+5:302018-01-01T19:43:50+5:30

बुकशेल्फ : कवी विलास वैद्य हे चाळीस वर्षांपासून ते कविता लिहितात. त्यांचा ‘गलफ’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. यानंतर आता त्यांचा ‘माझ्या प्रयोगशील देशात’ हा दुसरा कविता संग्रह मंगळवारी (दि.२) हिंगोली येथे प्रकाशित होत आहे. या निमित्ताने त्यांच्या नवीन कविता संग्रहाविषयी...

In my experimental country: the distribution of value system | माझ्या प्रयोगशील देशात : मूल्यविहीन व्यवस्थेचे वाभाडे

माझ्या प्रयोगशील देशात : मूल्यविहीन व्यवस्थेचे वाभाडे

googlenewsNext

- डॉ. जगदीश कदम

कोणी किती कविता लिहिल्या यापेक्षा किती कांतीमान कविता लिहिल्या हे अधिक महत्त्वाचे असते. त्या अर्थाने वैद्य यांची ही दीर्घकाळानंतर आलेली कविता खूपच कसदार आहे. ‘माझ्या प्रयोगशील देशात’ या कविता संग्रहात एकूण सत्तर कविता आहेत. आशयाच्या पातळीवर प्रत्येक कविता स्वयंभू आहे. आपल्या अवतीभोवतीचा समाज आणि त्याला वेढून असलेले पर्यावरण हा या कवितेचा केंद्रबिंदू आहे. हे पर्यावरण अनेकस्तरीय आहे. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा अनेकविध पदरांनी पुष्ट झालेले हे पर्यावरण माणसाला कसे खेळवते, कोणत्या अंगाने कशी प्रतिक्रिया देते याचा लेखाजोखा मांडणारी ही कविता आहे.

माणसाचा कैवार घेणार्‍या कवितेला कसल्याही प्रकारचा मिळमिळीतपणा मानवत नसतो. निरंतर नेकीने नादुरुस्त जागांची दुरुस्ती सुचवणं यावरच तिच्या भवितव्याची भाकितं मांडली जातात. त्यादृष्टीने विलास वैद्य यांची कविता किंचितही कसूर करीत नाही. माणसाच्या जगण्याचा मतलब मारायला निघालेली व्यवस्था आणि त्या व्यवस्थेची चहूबाजूंनी सुरू असलेली घुसखोरी हा या कवीच्या चिंता आणि चिंतनाचा विषय आहे.

जगणे बेदखल करणार्‍या प्रश्नांचा पुंजका शिरावर घेऊन माणूस धावतो आहे. त्याची दमछाक होते आहे. ही दमछाक नेमकेपणाने टिपणारी कविता या संग्रहात आलेली आहे. माणसाला मूल्यविहीन आणि हिणकस करणार्‍या प्रवृत्तीला पायबंद घातला पाहिजे याचा ध्यास धरणारी ही कविता आहे. माणूस मोडून पडतो की काय एवढे भीषण आणि टणक वास्तव आज आपल्या सभोवती साचत चाललेले आहे. खरे तर हा सर्वच अर्थाने कसोटीचा काळ आहे. मन आणि मस्तक गहाण टाकून पळणारी माणसं सातत्यानं आपसात लढत असतात. त्यांच्या फाटलेल्या मनाला सांधण्याचा प्रयत्न करणारा महानुभाव अभावानेच इथे भेटतो. मात्र, त्याच्या प्रशंसेचे विद्रुपीकरण करणारी व्यवस्था जागोजागी डूख धरून बसलेली दिसते.

‘त्याग-समर्पणाच्या वाट्याला निर्भर्त्सना
अन् दहशतीला मुक्त दान’

अशा प्रवृत्तीच्या पाईकांची पायवाट पाहून कवी अस्वस्थ होतो. आमची ही संस्कृती शोषणालाच सन्मानित करते, मिरवण्याची मुभा देते. त्यांच्यासाठी कौतुकाची कमान उभारते. ज्यांचा सदैव निषेध केला पाहिजे त्यांचीच हिरीरीने तरफदारी करते, असे हे विपरीत चित्र पाहून कवी आतून व्याकूळ होतो.

‘प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना 
अखंड टाळ्यांच्या कडकडाटात
त्यांच्या हातावरील जात, धर्म, द्वेष, 
मत्सराचे ठसे अधिकच उठावदार दिसू लागले
कोणी त्यांना चंद्र, कोणी सूर्य म्हणून लागले’

माणसाला वजा करणारी इथली व्यवस्था आहे. जाती-धर्माच्या थांब्यावरून ती सातत्याने येरझारा करते. जमेल त्या पद्धतीने माणसाचे लचके तोडण्याचा प्रयत्न करते. दु:ख, करुणा यासारख्या मानव्याला चिकटलेल्या मूल्यांची मुस्कटदाबी करते. ज्ञान-विज्ञानाचा वापरही सोयीच्या अंगाने करते. लुटारूंच्या स्वागताला उभे राहण्यासाठी मजबूर करते. चहूबाजूंनी चांगुलपणाचा चेंदामेंदा करते.

‘भिडस्तपणाचा घेत फायदा,
चोर मवाली मोठ्या हक्काने 
प्रदीर्घ काळासाठी
राहुट्या टाकून विश्रांतीला’

सभोवतालचे असे विपरीत दृश्य पाहून कवी अस्वस्थ होतो. हतबलतेच्या आवारात माणसाचा आवाज क्षीण होत चाललेला आहे. तो आवाज बुलंद करणे ही आजची तातडीची गरज आहे. औरस चौरस मंडपात देशभक्तीपर गीतांच्या तालात माणूस विकत घेण्याचे समारंभपूर्वक काम इथे चाललेले आहे. उजेडाचे रखवालदार इनामासाठी आतुर झालेले आहेत. आपल्याच माणसाविरुद्ध लढण्याची तयारी करायला हवी इतके उग्र आणि करपट वास्तव वाट अडवून बसलेले आहे. कट-कारस्थानाचे तोरण बांधून स्वागताला विनम्रपणे उभी राहणारी लाचार माणसे हे इथले विदारक चित्र आहे. आपले स्वातंत्र्य गरजेनुसार विकणार्‍या विचारवंतांच्या गोष्टी इथे चवीने चघळल्या जातात. अशा अनेक जागा वैद्य यांची कविता अचूकपणे हेरते. संयत परंतु तेवढ्याच टोकदारपणाने त्यावर भाष्य करते. त्यासाठी प्रसंगी उपरोधाचे शस्त्रही परजून घेते.

‘चोर बाजारातील
स्वत:च्या दुकानाचा
हिशेब टिशेब आटोपून
मोठ्या लगबगीने निघालाय
जाहीर सभेसाठी विचारवंत’

जगण्याच्या कोलाहलात अस्तित्व हरवून बसलेल्या माणसाला नव्याने मुद्रांकित करणे आणि मूल्यविहीन व्यवस्थेचे वाभाडे काढणे या ध्यासातून ही कविता स्वत्व शोधत जाते.वैद्य यांची कविता जागतिकीकरणानंतर झालेल्या पडझडीचा वेधही तेवढ्याच ताकदीने घेते. वस्तुरूप होत चाललेल्या माणसाचे मूल्यांकन माणूसपणाच्या कसोटीवरच झाले पाहिजे याचा आग्रह धरते. स्वातंत्र्य, त्याग, बलिदान यांसारख्या मूल्यांची बांधणी नव्याने व्हायला हवी. माणसाची सालपटे काढणारे बाजारीकरण जरूर तेथे थोपावायलाच हवे, भांडवलशाहीच्या भक्कम भागीदारीला भगदाड पाडायला हवे, अशा भूमिकेची पाठराखण प्रामाणिकपणे करते. सामान्य माणसाचे जीवनमार्ग शोषणकर्त्यांनी कसे रोखून धरलेले आहेत. त्याचा ओनामा मांडणारी ही कविता भाषेच्या अंगानेही अत्यंत सधन आहे. सूचकता हा तिचा विलोभनीय विशेष आहे. 

Web Title: In my experimental country: the distribution of value system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.