Marathwada Sahitya Sammelan: Direction of Dasha? | मराठवाडा साहित्य संमेलन : दशा की दिशादर्शी?

- मल्हारीकांत देशमुख

मराठवाडा साहित्य संमेलनात मराठी भाषा अभिजात की नवजात यावर काथ्याकूट, कवितांची अतिवृष्टी झाली़ मराठी शाळांच्या भवितव्यासाठी गळेही काढण्यात आले़ ‘करेंगे या मरेंगे’ स्टाईलने बारा ठराव पारित करण्यात आले़ वर्तमानपत्रांचे कॉलम भरले़ सोशल मीडियावर हस्ते, परहस्ते क्लिप्स पाठवून अनेकांनी आपल्या पाठी थोपटून घेतल्या़ हा उत्सवी सोहळा संपला खरा, परंतु, पुढे काय? जनभाषेच्या उत्थानासाठी ही जमलेली साहित्याची मांदियाळी काही ठोस भूमिका घेणार की, आगामी ४० व्या संमेलनाची गणिते जुळवित बसणार? आद्य कविंच्या गावी झालेले हे पहिले वहिले मराठवाडा साहित्य संमेलन मराठी साहित्याला दशा की दिशादर्शी ठरणार हा प्रश्न आहे

‘राजे’शाही आयोजन
संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी त्यांच्या नाव व आडनावाला शोभेल असे तगडे आयोजन केले होते़ जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग दिमतीला होताच़ शे-पाचशे शिक्षक तिन्ही दिवस योगेश्री शिक्षण संस्थेच्या परिसरातून हललेच नाही़ जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांची शहरातील वेगवेगळ्या मंगल कार्यालयात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती़ खरे तर ‘हाबाडा’ देण्यात ख्यातकीर्त असणार्‍या बीडकरांचे आगत्य, सौजन्यशिलता चर्चेचा विषय ठरला़ स्वागताध्यक्ष देशमुख जातीया परिसरात फिरून प्रत्येक गोष्टीची दक्षता बाळगीत होते़ 

या संमेलनाने काही नवे पायंडे पाडले, ते असे़ पारंपारिक ग्रंथदिंडी ऐवजी शेतकरी जागर दिंडी काढण्यात आली़ जिल्हा परिषदेसारख्या निमसरकारी संस्थेचा संमेलनात सहभाग ही बाब संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली़ शिक्षकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले़ लोकांनी भलेही त्याला शाळेचे स्रेहसंमेलन म्हटले असले तरी शिक्षणातील अनेक विचार प्रवाहांवर चर्चा झाली़ भविष्यात ही शिक्षक मंडळी कदाचित आपले स्वतंत्र संमेलन देखील घेऊ शकतात़ सुरेश भटांच्या मराठी गझलेने संघर्ष करीत लोकाश्रय मिळविला खरा, परंतु साहित्य संमेलनात स्वतंत्ररित्या गझल संमेलन आजवर झाले नव्हते़ अंबानगरीत मराठी गझल सन्मानपूर्वक विराजमान झाली़ संमेलनाचे कार्याध्यक्ष दगडू लोमटे यांनी आपली संपूर्ण कसब पणाला लावीत सगळी व्यूहरचना आखली होती़ मागील ३३ वर्षे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने घेत असलेल्या विविध कार्यक्रमांचा अनुभव त्यांच्या गाठीस होता, हे वेगळे सांगायता नको़ 

अध्यक्षीय भाषण
संमेलनाध्यक्ष प्रा़ रंगनाथ तिवारी यांनी आपल्या लिखित स्वरुपाच्या आणि व्यासपीठावरून केलेल्या उत्स्फूर्त भाषणात अतिशय कळकळीने व अधिकारवाणीने काही मुद्दे मांडले़ प्रसंगी साहित्यिकांना फटकारले़ मराठी विद्यापीठाच्या मागणीसाठी एल्गार पुकारण्याचे आवाहन केले़ मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात बोलल्या जाणार्‍या भाषेच्या छटांचा अभ्यास करून आठ शब्दकोष तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले़ आमच्या साहित्यसंपदेचे जल आमच्याच पाटामधून वाहून जोवर हे शिवार हिरवेकंच होणार नाही, तोवर येथील बारा बलुतेदारांना ही भाषा आपली वाटणार नाही़ जनभाषा देखील प्रमाणभाषा करा, स्वाभिमान संवर्धनाची जबाबदारी साहित्यिकांची असते़ सक्रिय कृती करा, असे आवाहनही त्यांनी केले़ आपल्या भाषणात ते म्हणतात, शब्दरत्नांची चाड बाळगून साहित्यिकांनी जनसामान्यात जगण्याची उर्मी निर्माण केली पाहिजे़ मृगेंद्रता स्वयंमेव असावी़ जनजीवनाचा उत्कर्ष हा तिचा आधार हवा, दुराग्रह व झुंडशाही नाच करीत असताना चमडी बचाव वृत्तीने नुसते मांजरासारखे निवांत डोळे मिटून राहाल तर शब्दांचीच शस्त्रे। यत्ने करू म्हणण्याचा अधिकार आपणास पोहचतो का? अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला़ प्रा़ तिवारींचे भाषण एका अर्थाने साहित्यिकांच्या डोळ्यात घातलेले अंजनच होते़ 

दहा लाखांची पुस्तक विक्री
संमेलनस्थळी जवळपास प्रकाशन संस्थांकडून ५० स्टॉल्स लावण्यात आले होते़ त्यावरून जवळपास ९ ते १० लाख रुपयांची पुस्तकं विकल्या गेली़ शेकडो शिक्षकांनी शाळेच्या ग्रंथालयांसाठी आॅर्डर बुक करून ठेवली़ मार्चएंडला ही पुस्तके शाळा विकत घेणार आहे, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी नानाभाऊ हजारे यांनी ‘लोकमत’ला दिली़ बडोदा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी एकहाती २५ हजारांची पुस्तकं विकत घेतल्याची माहिती कार्याध्यक्षांनी दिली़ 

कर्मयोगी शिक्षकांचा गौरव
वडवणी तालुक्यातील देठेवाडी येथील जि़प़ शाळा डिजीटल करण्यासाठी स्वत:चे पीएफ काढून, बोटातली सोन्याची अंगठी मोडणार्‍या राजेंद्र गायकवाड यांचा ना़ पंकजातार्इंच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ स्वागताध्यक्षांनी त्यांना दोन सोन्याच्या अंगठ्या भेट स्वरुपात दिल्या़ वाघदवाडी येथील शाळा सौरउर्जेवर करण्यासाठी १ लाख ८० हजार रुपये खर्च करणार्‍या शिक्षीका पुनम माने यांचा समारोप प्रसंगी गौरव करण्यात आला़ 

त्रिसूत्रीचा विसर
संमेलनात घेण्यात आलेल्या बारा ठरावांत केवळ तीन ठराव साहित्य संस्कृतीशी निगडीत होते़ संमेलनाच्या निमित्ताने त्या त्या प्रदेशातील दिवंगत साहित्यिकांचे साहित्य शोधने, त्याचे संवर्धन करणे, विद्यमान साहित्यिकांची दखल घेणे व नवोदितांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे या त्रिसूत्रीचा याही संमेलनात विसर पडल्याचे दिसून आले़ खरे तर साहित्य संमेलन हे पुस्तकाभोवती फिरणे अपेक्षित असताना ते व्यक्तीकेंद्रीतच झाल्याचे दिसून आले़ वरवरचा उथळपणा इथेही दिसत होता़ 

ठालेशाहीचे प्रदर्शन
उद्घाटन सत्रात उद्घाटक ना़ पंकजा मुंडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा खा़ रजनीताई पाटील, माजी मंत्री सुरेश धस यांच्यासारख्या राजकारणी व्यक्तींनी आपल्या भाषणात साहित्य संस्कृती विषयाचा धागा सोडला नाही़ या पार्श्वभूमीवर साहित्य परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाचे यजमान असणार्‍या कौतुकराव ठाले पाटलांनी साहित्याच्या व्यासपीठावरून  राजकीय विषयांची चर्चा लांबविली़ पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात ठालेंना यावरून कोपरखळीही मारली़ राजकारणातील ठोकशाही प्रमाणे ठालेशाहीची चर्चा ऐकायला मिळाली़ अनेकांनी ही नाराजी कार्याध्यक्षांकडे बोलून दाखविली़ आपण आपल्या साहित्य क्षेत्रातील प्रश्न सोडवू शकलो नाहीत़ चित्रपट, नाटक हा प्रांतच मुळी निराळा, त्याचे अर्थकारण वेगळे ही गोष्ट त्यांनी विचारात घ्यायला हवी होती़ भाषणे ही कितीवेळ करावीत, याचे भान त्यांनी बाळगले नाही़

तुष्टीकरणाचा प्रकार
मराठवाडा संमेलनाचा आवाका लक्षात घेता एकाच वेळी तीन ठिकाणी कार्यक्रम घेण्याचे औचित्य काय? असा प्रश्न केल्यास त्याचे उत्तर तुष्टीकरण एवढेच देता येईल़ अधिकाधिक लोकांना संधी देताना श्रोत्यांवर काही वेळा वक्तव्यांवर देखील अन्याय होत गेला़ संत साहित्याच्या परिसंवादासाठी सुरुवातीला श्रोत्यांची संख्या जेमतेम होती़ बालभारतीच्या परिसंवादातून विषयाला न्याय मिळाला नाही़ ग्रामीण शिक्षणाच्या समस्या या परिसंवादातील प्रमुख आकर्षण असणारे राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमारजी व आयुक्त पुरुषोत्तम भापकर अनुपस्थित राहिल्यामुळे शिक्षक वर्गाचा हिरमोड झाला़