सुफी संतांचे शहर खुलताबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 08:33 PM2018-09-01T20:33:42+5:302018-09-01T20:34:02+5:30

स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांशिवाय गढ्या, छोटे बंदोबस्त असणारे वाडे सामरिक रचनेत महत्त्वाची आहेत. अनेक शहरांमध्ये असलेल्या तंटबंदीच्या ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात. मध्ययुगीन भारतात मात्र सतत चालणाऱ्या युद्ध व इतर राजकीय उलथा-पालथींमुळे केवळ किल्लेच नाही तर प्रजा व राजा दोहोंचे वास्तव्यस्थान असणाऱ्या शहरांनासुद्धा कडेकोट बंदोबस्ताची गरज पडू लागली होती. ऐतिहासिक औरंगाबाद शहरापासून वेरूळकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसलेले खुलताबाद हे शहर त्यापैकीच एक़

Khulatabad city of Sufi saints | सुफी संतांचे शहर खुलताबाद

सुफी संतांचे शहर खुलताबाद

googlenewsNext

- तेजस्विनी आफळे

खुलताबाद येथील वस्तीची स्थापना मुळात कधी झाली, कुणी केली याविषयीचे लिखित पुरावे मिळत नाहीत. १८८४ साली प्रसिद्ध झालेल्या औरंगाबाद विभागाच्या दार्शनिकेनुसार दौलताबाद आणि रौजा यामधील पठारावर जुन्या भद्रा किंवा भद्रावती गावाचे अवशेष दिसत इतकेच!! त्यानुसार पुरातात्त्विक संशोधन अजून झालेले नाही. मात्र, वेरूळ आणि देवगिरी अशा इतिहासात अजरामर झालेल्या दोन स्थानांमध्ये मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या ठिकाणाचे स्थानमहात्म्य काही आगळेच असणार यात शंका नाही. त्याशिवाय का मुहम्मद तुघलकासोबत आलेले कित्येक सुफी संतांनी परत न जाता इथेच राहणे पसंत केले! त्यात जर जरी जर बक्ष, बुºहानुद्दीन गरीब चिश्ती, त्यांचे शिष्य जैनुद्दीन शिराजी अशा अनेकांचा समावेश होता.

दक्षिणेतील नवनवीन शहरांच्या उदयानंतर गेसुदराजसारख्या अनेक सुफी संतांनी आपले बस्तान हलविले. त्याकाळातील प्रत्येकच राजवटीच्या उदय-अस्तामध्ये सुफी संतांची मोलाची भूमिका राहिली. सुफी संतच नव्हे तर अनेक सुलतान, वजीर, इतर सरदार दरकदार सर्वांसाठीच खुलताबादचे धार्मिक महत्त्व वाढते राहिले. अनेकांनी आपल्या शेवटच्या प्रवासासाठी खुलताबादची निवड केली. त्यामुळेच नाव झाले रौजा म्हणजेच स्वर्गीय बाग. त्यामध्ये मलिक अंबरसारखे मुत्सद्दी आणि गोवळकोंड्याचा शेवटचा सुलतान तानाशाह, हैदराबादचा निजामशाह असफजाह पहिला असे बादशाह इथेच दफन आहेत. औरंगजेबसारख्या मातब्बरला मृत्यूनंतर इथेच आपल्या गुरुबरोबर असणेच योग्य वाटले. औरंगजेबाच्या अनेक नावांपैकी एक होते खुल्त-मकान. गावाचे नाव झाले खुलताबाद. तसेच जैनुद्दीन शिराजी दर्गात ठेवलेल्या मुहम्मद पैगंबर यांच्या पोशाखाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या ठिकाणाला पूर्वेकडील मक्केचा दर्जा दिला नसता तरच नवल!

मुघल काळात औरंगाबादप्रमाणेच खुलताबादलाही चोख सुरक्षा व्यवस्थेची गरज निर्माण झाली. चोहोबाजूंनी कडेकोट बंदोबस्तासाठी भरभक्कम तटबंदी उभारण्यात आली. ही तटबंदी आणि बुरुज हल्ले परतवून लावण्यासाठी शस्त्रसज्ज असत. भव्य प्रवेशद्वारे उभारली गेली. औरंगाबादच्या दिशेने असणारा सुबक मुगल स्थापत्यरचनेच्या घुमट्या असणारा नगारखाना दरवाजा दोन भक्कम बुरुजांमध्ये आजही उभा आहे. पांग्रा, लंगडा, मुंगुपाईत, कुणबेली आणि हद्दी असे इतर सहा दरवाजेही होते. आझमशाही नावाचा छोटा दरवाजा येण्या-जाण्यासाठी होता. मुघल काळातच पाण्याची सुव्यवस्थित योजना निर्मिली गेली. अनेक मुघल सरदारांना आजूबाजूला जमिनी देण्यात आल्या.

या तटबंदीच्या आत आणि बाहेर ही अनेक दर्गे उभारले गेले. अर्थात अशा धार्मिक प्रसिद्धीमागे नैसर्गिक सौंदर्याचीही साथ होतीच. वेरूळकडे उतरणाऱ्या पठारावर वसलेल्या खुलताबादला अनेक तलावांचे कोंदण लाभले आहे. त्या तलावांच्या पाण्याची जोड घेऊन अनेक चारबागा उठवलेल्या आहेत. त्यात खानजहानची बाग, औरंगजेबाची नातसून जहाँ बानू बेगमची बनी बेगम बाग आजही टिकून आहेत. या दोन्ही बागांनाही स्वत:ची सुरक्षा भिंत आहे. छोटे बुरुज आणि प्रवेशद्वारही आहे. आज या तटबंदीचे काही अवशेषच शिल्लक आहेत. हे अवशेष आणि दरवाजांपैकी शिल्लक दरवाजे ही शहरीकरणाच्या रेट्यात विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, तसेच संवर्धनाच्या नावाखाली झालेल्या पुनर्बांधणीमुळे आपली मूळ शान काहीसे घालवूनच बसलेत, असे दिसते.

जुन्या खुलताबादचे दर्गे, मशिदी सोडल्यास वाडे व इतर बांधकामेही हळूहळू नाहीशी होतायत. आजमितीला तरी अशा अनेक सुंदर इमारती आणि त्यांच्या अवशेषांनी खुलताबादचे सौंदर्य काहीसे गुढरम्य भासते... मात्र आपल्या या जुन्या गावांना त्यांची शान परत मिळवून देण्यासाठी  सुनियोजित व्यवस्थापनाची गरज आहे.

-tejas.aphale@gmail.com
 

Web Title: Khulatabad city of Sufi saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.