एका किल्ल्याचा प्रवास : देवगिरी ते दौलताबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:36 PM2018-02-20T20:36:40+5:302018-02-20T20:37:13+5:30

स्थापत्यशिल्पे : दिल्लीत सुलतानाने आदेश सोडला...सर्वांनी ताबडतोब दक्षिणेकडे कूच करण्याचा. ज्यांना दिसते, चालता येते त्यांनी आणि ज्यांना दिसत नाही, चालता येत नाही त्यांनीही. कसेही आणि कुणीही. नाही म्हणण्याची सोयच नव्हती. सुलतानाचाच आदेश तो. दक्षिणेच्या प्रवासाची व्यवस्था मात्र चोख ठेवली होती. सराया, पाणपोया आणि बाजारसुद्धा बांधण्यात आले होते. शतक होते चौदावे... लक्ष्य होते किल्ला देवगिरी. सुलतान होता मोहंमद- बिन- तुघलक. 

Journey of fort: Devgiri to Daulatabad | एका किल्ल्याचा प्रवास : देवगिरी ते दौलताबाद

एका किल्ल्याचा प्रवास : देवगिरी ते दौलताबाद

googlenewsNext

- तेजस्विनी आफळे

दिल्लीहून राजधानी दक्षिणेला हलविण्याच्या फोल ठरलेल्या प्रयत्नांसाठी मोहंमद- बिन- तुघलक यास इतिहास ‘वेडा मोहंमद’ म्हणून ओळखतो. भौगोलिक स्थानामुळे मध्ययुगीन काळात हा किल्ला दख्खनाचे दार मानला जात होता. औरंगाबाद शहराच्या १६ कि.मी. पश्चिमेला आपल्या समृद्धीच्या खुणा जागवत आजही तो उभा आहे. दुर्गस्थापत्याचा जणू चक्रवर्ती सम्राट. मानवी अस्तित्व सांगणारी प्रागैतिहासिक काळातील दगडी हत्यारे परिसरात मिळाली असली तरी या देवनगरीच्या आणि किल्ल्याच्या एकंदर निर्मितीबद्दल इतिहास अजूनही गप्प आहे. कोणा एका कोळी राजाने हा किल्ला बांधला, अशी एक वदंता आहे. जवळच वेरूळची आश्चर्ये आकार घेत असताना येथे काय घडत होते, हे काळच जाणो. देवगिरीचा ज्ञात इतिहास सुरू होतो बाराव्या शतकात सेऊणदेशीय यादव राजांबरोबर. तब्बल दोन शतके यादवांनी येथूनच सत्ता गाजवली. राजाश्रयाने संत, वारकरी, महानुभाव तसेच विविध कला, साहित्य बहरत होते. प्रजा सुखात होती. बाराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात देवगिरीच्या समृद्धीच्या मिषाने वार्‍याच्या वेगाने अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण आले. पुरेशा तयारीअभावी किल्ला लढवणे अवघड होते. राजधानी लुटली गेली. कितीतरी मण सोने, चांदी, हिरे, मोती उत्तरेत पाठवले गेले. सत्ताधीश यादव राजे संपले आणि देवगिरीवर सुलतानांची सत्ता सुरू झाली. ती पुढची ८०० वर्षे. खिलजींनंतर दिल्लीत तुघलक सुलतान बनले. देवगिरीला पुन्हा एकदा राजधानीचे भाग्य लाभले; पण अनेक वेळा लुटली जाऊनसुद्धा देवगिरीची कीर्ती अखंड होती. नाव झाले दौलताबाद. अमाप समृद्धीचे शहर.

पुढच्या दोनच वर्षांत सुलतान पाणीटंचाई आणि उत्तरेकडच्या यादवीला कंटाळून दिल्लीला परतला. दख्खनचा पहिला सुलतान म्हणून गादीवर आलेल्या हसन गंगू बहामनशहाने आपला राज्याभिषेक उरकला आणि नंतर गुलबर्ग्याला राजधानी वसवली. राजधानीचा दर्जा उरला नसला तरी भौगोलिक स्थानमाहात्म्यामुळे त्यानंतरच्या सगळ्याच राज्यकर्त्यांसाठी किल्ल्याचे लष्करी आणि राजकीय महत्त्व अबाधित होते. बहामनशाही फुटल्यावर अहमदनगरच्या निजामाकडे किल्ल्याचा कब्जा होता.

अहमदनगरवरील मुगल कब्जानंतर मलिक अंबरने दौलताबादवरून निजामी राज्यकारभार चालविला. यात महत्त्वाची साथ शहाजीराजांसारख्या अनेक शूर मराठी सरदारांनी दिली. तीन महिने चाललेल्या वेढ्यानंतरच १६३६ मधे हा किल्ला मुगल बादशहा शाहजहाँच्या ताब्यात आला. मात्र, काहीच वर्षांत सत्तेचा केंद्रबिंदू औरंगाबाद शहराकडे हलला. सततच्या पाशवी लूट, संघर्ष आणि दुष्काळांमुळे जराजर्जर दौलताबादचे महत्त्व फक्त लष्करी ठाणे आणि तुरुंग म्हणून उरले. बेलग किल्ल्याची ही कथा होती, तर येथील रयतेच्या हालाची कल्पनाच न केलेली बरी. पुढे निजाम आणि पेशवे यांच्या संघर्षात किल्ला काही वर्षे उदगीरच्या तहांतर्गत पेशव्यांचा ताबा वगळता हैदराबादच्या निजामाकडेच राहिला तो मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य मिळेपर्यंत. १९५१ सालापासून किल्ल्याच्या देखभालीचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याकडे आहे. वेरूळ ते औरंगाबाद भागातील डोंगररांगांमधून सुटून उभ्या, काहीशा एकलकोंड्या आणि कमी उंचीच्या टेकाडाचे बेलाग किल्ल्यात रूपांतर होताना सात वेगवेगळ्या राजघराण्यांच्या काळातील स्थापत्यकारांनी अक्षरश: विविधांगी आविष्कार घडविले आहेत. सुरक्षेसाठी प्रचंड तटबंदी, बुरूज, खंदक, अंधारे मार्ग, मोठमोठे दरवाजे, देवड्या त्याचबरोबर किल्ल्यात व किल्ल्याबाहेरील शहरात राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारती, महाल, हमाम, तसेच यादवकालीन मंदिराचे अवशेष, लेण्या, मशिदी, दर्गे, हमाम... हे आणि असे अनेक...पुढील भागात...
( tejas.aphale@gmail.com )

Web Title: Journey of fort: Devgiri to Daulatabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.