‘गोसावी’ पिंपळगावचे पिंपळेश्वर महादेव मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 07:57 PM2018-07-14T19:57:12+5:302018-07-14T19:59:50+5:30

स्थापत्यशिल्प : परभणीतील सेलू तालुका आणि परिसर हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. पूर्वमध्ययुगीन आणि मध्ययुगीन अवशेष गावागावांमध्ये विखुरले आहेत. त्यावरून, हिंदू धर्मातील विविध पंथ तसेच जैनधर्मीयांचे वास्तव्य या परिसरात मोठ्या प्रमाणात असावे, असे दिसून येते. मागच्या एका लेखात आपण हतनूर येथील नागेश्वर मंदिराचा आढावा घेतला. तसेच गोसावी पिंपळगाव हे असेच सेलूमधील दुसरे गाव, सांस्कृतिक पुराव्यांमुळे महत्त्वपूर्ण ठरते.

'Gosavi' Pimpleshwar Mahadev Temple of Pimpalgaon | ‘गोसावी’ पिंपळगावचे पिंपळेश्वर महादेव मंदिर

‘गोसावी’ पिंपळगावचे पिंपळेश्वर महादेव मंदिर

googlenewsNext

- सायली कौ. पलांडे-दातार

नावातच ‘गोसावी’ शब्द असल्याने या स्थानाबद्दल उत्सुकता निर्माण होते. अडवळणाच्या या गावात प्रवेश करताच एका प्रशस्त आवारात आपल्याला चुन्याने लिंपलेली पिंपळेश्वर महादेव मंदिराची वास्तू नजरेस पडते. मंदिरावरील चुन्याच्या लेपातून दगडी मुखमंडप डोकावताना दिसतो आणि मंदिराच्या प्राचीनत्वाची खात्री पटते. मंदिराचे उत्तुंग ‘नागर शैलीचे वाटावे’ असे शिखर आज नव्याने बांधले आहे व मूळ मंदिराच्या विस्तृत आकाराला चांगली उंची मिळवून देते. मुखमंडप, एक अर्धमंडप, गूढ सभामंडप, अंतराळ व दोन गर्भगृह अशी रचना आहे. मंदिर मूळचे त्रिकुट असावे व नंतर एक गर्भगृहातून प्रवेशद्वार करून द्विगर्भी करण्यात आले असावे. सभामंडपाच्या बाहेरील भिंती अलंकरणविरहित असून साधे पायऱ्यांसारखे थर आढळतात. गर्भगृहाच्या बाहेरील भिंतींवर खूर, पद्म, कुंभ, कणी असे सुबक थर दिसतात तसेच द्राविड व महाराष्ट्रातील अनेक कल्याणी चालुक्यांच्या मंदिरांमध्ये आढळणारी अर्धस्तंभांची रचना जंघेवर आढळते. पीठावरील थरांमध्ये लहान मंदिरांच्या प्रतिकृती असून, त्यावर शक्ती देवता, सिद्धांचे अंकन आहे, काही ठिकाणी रत्न नक्षी आहे. गर्भगृहाचा तलविन्यास तारकाकृती आहे; पण बाह्यभिंतीवर देवकोष्टांची योजना नाही. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर, कपोतावर, एका नक्षीदार तोरणात सिद्ध योग्याचे शिल्प बसवले आहे.

सभामंडपाच्या प्रवेशावर असलेल्या द्वारशाखांवर एक स्तंभ शाखा असून, एका ललाटबिंबावर गणेश आहे व दुसरे रिकामे आहे. आत शिरल्यावर, बारा अर्धस्तंभांवर आणि चार स्तंभांवर पेललेला सभामंडप आहे. मध्यभागातील चतुष्कीचे चार खांब अलंक रणविरहित असून उत्तर यादव काळातले आहेत. दक्षिणेकडील गाभाऱ्याच्या द्वारशाखेवर एक स्तंभ शाखा असून ललाट बिंबावर गणपती आहे. या गाभाऱ्यात विष्णूची शंखचक्र असलेली, खंडित मूर्ती एका पीठावर उभी आहे. तसेच, अजून एक खंडित देवता मूर्ती बाजूला ठेवली आहे. मुख्य गर्भगृहाकडे जाताना दोन रिकामी देवकोष्टे आहेत व स्तंभशाखेवर डमरू,कपाल व त्रिशूळ धारण केलेल्या शैव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. इथेही ललाटबिंबावर गणेशाचे अंकन आहे. गर्भगृहात मागील भिंतीवर देवकोष्टाची रचना आहे पण मूळ मूर्ती नाही. तसेच, पिंपळेश्वर महादेव हा शिवलिंगाच्या रूपात गर्भगृहात आहे.

मंदिराच्या आसपास असंख्य शिल्पे विखुरलेली आहेत. त्यांचा व स्थापत्यातील विसंगतीचा अभ्यास करून आपल्याला मंदिरातील स्थित्यंतरांचा अंदाज येतो. मंदिराच्या दक्षिण बाजूस महाकाय शेषशायी विष्णूची भोगशयन मूर्ती पहुडलेली आहे. मूर्ती आकाराने चार फुटांहून मोठी असून, वरच्या भागात समुद्र मंथनाचे अप्रतिम दृश्य कोरले आहे. उच्चश्रवा घोडा आणि ऐरावत हत्ती मंथनातून बाहेर आलेले दाखवले आहेत. वरती, दशावतार कोरले आहेत व बाजूला गरुड अंजनी मुद्रेत आहे. विष्णू पूर्ण उठावात कोरलेला असून चक्र आणि गदा हातात आहे व शंख एक मंचकावर ठेवला आहे. विष्णू मूर्ती पद्मनाभ नाही व ब्रह्माचे अंकन दिसत नाही. विष्णूच्या पायापाशीचे लक्ष्मीचे शिल्प खंडित झाले आहे. खालील बाजूस अनेक कलशांचे अंकन आहे, तसेच काही सिद्ध व योद्यांचे अंकन आहे. मूर्तीवर, अनेक ठिकाणी, अर्ध मानवी अर्धसर्पाकृती कोरलेल्या आहेत. हे शिल्प बघताना चारठाण्याच्या शेषशायी शिल्पाची आठवण येते पण हे शिल्प आकाराने मोठे व जास्त तपशीलवार कोरलेले आहे. याच्या बाजूला खंडित अवस्थेतले यज्ञ वराहाचे शिल्प आहे.

यज्ञ वराह हे देवता आकृतींनी नटलेले वराहरूपी (रानडुक्कर) शिल्प, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक वैष्णव मंदिरांमध्ये वाहन मंडपात किंवा स्वतंत्र मंडपात आढळते. आज त्याचा नाग शेपटीत धरलेला चौथरा फक्त शिल्लक आहे. कधी काळी देवकोष्टात असलेल्या हंसारूढ सरस्वती, उमामहेश्वर आलिंगन मूर्ती, विष्णू लक्ष्मी मंदिर परिसरात पडून आहेत. पांढरा रंग व सिमेंट पडून शिल्पांची अपरिमित हानी झालेली आहे.
मंदिराच्या परिसरातील एका पूर्व मध्ययुगीन बारवेत, मूळ मंदिराचे दगड वापरून उंची वाढवलेली दिसते. त्यात, मुख्यत: सभामंडपाच्या विविध थरांचे पाषाण आढळून येतात. नर, अश्व, गज, हंस, कीर्तिमुख व रत्न या सारख्या थरांची सुंदर नक्षी त्यावर आहे. त्यात युद्धाची दृश्ये, किन्नर वादक, प्रसवणारी स्त्री, सिद्ध योगी, कामशिल्पे, राम, हनुमान, वामन अशी विविध शिल्पे आहेत.

या शिल्पांआधारे कल्याणी चालुक्याकालीन मूळ मंदिरावरील शिल्पकामाची कल्पना करता येते. विखुरलेल्या अवशेषांमध्ये दोन झाडांखाली ठेवलेल्या सिद्ध आचार्य आणि सिद्ध साधकाच्या मूर्ती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या शिल्पांची शैली ही कल्याणी चालुक्य काळातील मूर्ती कलेची मिळती जुळती आहे. मूळ कल्याणी चालुक्यकालीन मंदिराच्या कीर्तिमुखयुक्त नक्षीदार तोरणाच्या भागांवर मोठ्या आकारातील ही शिल्पे स्थापलेली असावी किंवा शिखराच्या बाह्यभागावर यांची स्थापना केलेली असावी. आज दुर्दैवाने पुराव्याअभावी, आपल्याला कोणता संप्रदाय इथे होता, याचे आकलन होत नाही; पण गावाला गोसावी हे विशेषण मिळण्यामागे इथल्या शैव, शाक्त किंवा वैष्णव संप्रदायाचे लोक कारणीभूत असणार, यात शंका नाही. आजही, तिथे स्त्री पुरोहिताचे वर्चस्व अधिक आहे. एकूण पुरावशेषांचा अभ्यास करता असे लक्षात येते की मूळ कल्याणी चालुक्यकालीन सांप्रदायिक मंदिराचा यादव काळात विध्वंस झाला असावा. यादवांच्या नंतरच्या काळात पुनर्बांधणी करण्यात आली व बिगर सांप्रदायिक देवता स्थापण्यात आल्या. पुढे त्याचाही विध्वंस होऊन मंदिराच्या शिखराचा व भिंतींचा भाग पूर्णत: नष्ट होऊन गेल्या काही दशकांमध्ये ग्रामस्थांनी पुनर्बांधणी करून मंदिराला ऊर्जितावस्था आणली आहे. इथल्या मूर्ती पाहता एकाहून अधिक देवता किंवा मंदिरे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

( sailikdatar@gmail.com)
 

Web Title: 'Gosavi' Pimpleshwar Mahadev Temple of Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.