ताई रडलीच पाहिजे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:19 PM2018-01-08T19:19:27+5:302018-01-08T19:20:19+5:30

विनोद : बाहेरख्याली हा शब्द पुरुष वगार्साठी ज्या रूढ अर्थाने वापरला जातो, तो चुकीचा असावा बहुतेक. ‘बाहेर खयाली’ म्हणजे बाहेरचा विचार करणारा आणि त्यापाठोपाठ घराबाहेर पडणारा असा असेल, तर मराठी टी.व्ही. मालिकांमुळे मराठी पुरुष बाहेरख्याली होत आहे का, अशी शंका घेण्यास जागा आहे. मी एकत्र कुटुंबात राहतो. 

girl must be cried | ताई रडलीच पाहिजे 

ताई रडलीच पाहिजे 

googlenewsNext

- आनंद देशपांडे 

दररोज संध्याकाळी साधारण ७.३० वाजता माझे आई, वडील आणि पत्नी, कलेक्टर आॅफिससमोर ठिय्या आंदोलनाला बसावे तसे टी.व्ही.समोर बसलेले असतात. मालिका पाहून किंवा त्या मालिकेमधील कशात तरी गुंतून पडून रस घ्यावा याचा प्रामाणिक निष्फळ प्रयत्न मी करून बसलेलो आहे. एका मालिकेमध्ये हिरोईनचे कार चालवायला शिकणे सुरू होते, मी महिनाभरानंतर एकदा थांबून अपडेट घेतले तेव्हा तिचे कार चालवायला शिकणे चालूच होते. नाइलाजाने कंटाळून माझे पाय घराबाहेर चालायला लागले. असा एखादा महिना गेल्यानंतर मी पुन्हा चिकाटीने या मालिका पाहण्याचा प्रयत्न केला आणि उबग म्हणजे काय याचा अर्थ समजून आला तसा मी पुन्हा घराबाहेर पडायला लागलो. एका मालिकेतील खुनशी सूनबाई सासूविरुद्ध (अर्थात तिच्याच) सतत काहीतरी कारस्थान रचण्यात मग्न असे. असाच एकदा मी घरातील नेहमीच्या यशस्वी रसिकांबरोबर ‘ती’ मराठी मालिका पाहत होतो. डाव्या बाजूला आई आणि उजव्या बाजूला पत्नी, अशी आमची सेटिंग होती. वडिलांचा अमृत महोत्सव तीन वर्षांपूर्वीच झालेला असल्यामुळे सर्व समजदार मराठी ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे ते संत पदाला पोहोचलेले आहेत आणि समोर धक्कादायक दृश्य आले. घरातील वरच्या जिन्यावर सासूबाई उभ्या होत्या आणि हळूच आवाज न करता ‘त्यांच्या’ सूनबाई आल्या आणि पाठमोर्‍या सासूबार्इंना त्यांनी मागून धक्का दिला. सासूबाई ‘मेले, मेले’ म्हणत जिन्यावरून गडगडत खाली येऊ लागल्या आणि शेवटच्या पायरीवर येवून निश्चेष्ट (म्हणजे सोप्या भाषेत निपचित पडल्या. आजकाल अवघड मराठी शब्द सोप्या मराठी भाषेत सांगावे लागतात. तरुण वाचकांनी ‘अलमोस्ट कोमामध्ये गेल्या’ असे वाचावे.) पडल्या. पाठोपाठ अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि त्यांना घेऊन गेली. माझ्या आईने भयभीत होऊन हळूच माझ्याकडे पाहिले. मी तिला हळू आवाजात धीर दिला, ‘अगं असं काही होईल याची शक्यता लक्षात घेऊन आपण वर जिनाच बांधलेला नाही, तू काळजी करू नकोस.’

साहित्याचा राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा वाटला नाही इतका अभिमान माऊलीला त्यादिवशी इतकी दूरदृष्टी असणार्‍या लेकाचा वाटला.
बहुतांश मालिका या मध्यमवर्गीय घरातील महिला वर्ग डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या आणि तयार केल्या जातात. आपली जी संस्कृती नाहीये, ती दाखविण्याचा आणि थोपविण्याचा प्रयत्न या मालिकांमधून केला जातो. एखाद्या घरातील पती परस्त्रीबरोबर लफड्यात गुंतवला, की तमाम प्रेक्षक भगिनी वर्गाची सहानुभूती त्याच्या अधिकृत पत्नीच्या पाठीशी उभी राहते आणि पत्नी कशी त्या ‘बाहेरवाली’वर मात करते हे पाहण्यात एखादे वर्ष सहज निघून जाते. पुरुष प्रेक्षक हे बहुतांश वेळा उदारमतवादी असतात. असेल एखाद्या भाग्यवान पुरुषाचे बाहेर लफडे, तर त्यात इतका गहजब करण्यासारखे काय आहे, असे त्यांना वाटत असते. अशा मालिकांमध्ये मग भावनिक चढ-उताराचे प्रसंग रंगविले जातात. बाहेरची फटाकडी थोडीशी ‘बोल्ड’ दाखविली जाते आणि रीतीप्रमाणे गृहिणी ही ‘कोल्ड’ दाखविली जाते. मग तिची एखादी मैत्रीण तिला आधुनिक पोशाख वापरून आकर्षक होण्याचा सल्ला देते. मालिकेचा शेवट जवळ येतो तसे पती पुन्हा आपल्या पत्नीकडे वळतो आणि शेवट गोड होतो. सौभाग्याचा विजय झाल्यामुळे प्रेक्षक महिलापण नि:श्वास सोडतात. सगळे कसे छान आहे, पती, पत्नी, सासवा, जावा, दीर, मुले, सुना, जावई हे सगळेच अगदी पापभिरू आणि आदर्श असतील, तर मालिका पुढे सरकणार नाही. एखादे तरी पात्र खलनायकी ढंगाचे असल्याशिवाय कथाच तयार होणार नाही. तेवीस मिनिटांचा एपिसोड संपताना एखादा टिष्ट्वस्ट टाकला जातो जेणेकरून उद्या काय होणार याची हुरहुर लागून दुसर्‍या दिवशी आमच्या आया, बहिणी अर्धा तास आधीच टी.व्ही.समोर येऊन बसतात आणि मालिकेचा टी.आर.पी. वाढत जातो. हा सगळा खटाटोप टी.आर.पी. वाढविण्यासाठी असतो. टी.आर.पी. वाढला तरच जाहिराती मिळतात आणि जाहिराती असतील तरच मालिका सादर होत राहतात. टी.आर.पी.चा लॉगफॉर्म ‘ताई रडलीच पाहिजे’ असाही सांगितला जातो. लिहितो म्हणजे लेखक आहेच की, पण शप्पथ घेऊन सांगतो, कितीही वाईट वेळ आली तरी, उपाशी मरीन, साड्यांच्या दुकानावर सेल्समन म्हणून काम करीन, पिझ्झा बॉय... माफ करा पिझ्झा बुवा म्हणून काम करीन; पण काहीही झाले तरी कुटुंबवत्सल पुरुषांना बाहेरख्याली करणारी मराठी सिरियल लिहिणार नाही. नाही म्हणजे नाहीच.
(anandg47@gmail.com)

Web Title: girl must be cried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.