लोकधारेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 06:57 PM2018-02-10T18:57:54+5:302018-02-10T18:58:58+5:30

प्रासंगिक : मार्गी, देशी म्हणजेच शास्त्रीय आणि परंपरागत कलांचा समन्वय घालून त्याचे उदात्तीकरण आणि प्रस्तुतीकरण घडवून आणू पाहणारा औरंगाबाद येथील महागामीचा शारंगदेव संगीत महोत्सव. नववा महोत्सव १९ ते २२ जानेवारी दरम्यान संपन्न झाला़ देशभरातील विद्वान, कलावंत, अनुभवण्याचे औरंगाबादकरांना संधी मिळाली. शास्त्रकार शारंगदेवांच्या ‘संगीतरत्नाकर’ व भरतमुनींच्या नाट्यशास्त्राभोवती चर्चा झडल्या अन् लोकधारेचा जागरही झाला.

Folk chanting | लोकधारेचा जागर

लोकधारेचा जागर

googlenewsNext

- मल्हारीकांत देशमुख

भारतीय कला व संस्कृतीचे अभ्यासक पद्मश्री उत्पलदास बॅनर्जी, डॉ़ पी़एल़ भट्टाचार्य, बेंगलोर विद्यापीठातील डॉ़ करुणा विजेंद्रा, दिल्ली विद्यापीठातील संगीत विभागप्रमुख डॉ़ सुनिरा कासलीवाल, अलाहबाद येथील संगीततज्ज्ञ डॉ़ इंद्रायणी चक्रवर्ती, उस्मानीया विद्यापीठातील डॉ़ दासरीरंगय्या, ललित कलांचे अभ्यासक तथा हिंदीतील ज्येष्ठ कवी अशोक वाजेपयी, महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता, ग्वाल्हेर घराण्याचे गायक समीक्षक पं़ सत्यशील देशपांडे आदी विभूतींनी कला व संस्कृती या विषयावर आपले मौलिक चिंतन मांडले़

१९ जानेवारी रोजी केरळमधील वाद्य परंपरा या विषयावर पी़ नंदकुमार यांनी विवेचन केले़ २०० वर्षांपासून क्षेत्रवाद्य म्हणून मान्यता असणार्‍या आणि मंदिरातून वादन होणार्‍या विविध वाद्य व वादन शैलींचा परिचय करून दिला़ झांझोरी, मेडव, तिमीला, चंडा, एडक्या या चर्मवाद्यांचा मिलाप त्यांनी ‘पंचवाद्यम’ या कार्यक्रमातून घडविला़ मेडव वाद्यावर ता, तोम या केवळ दोनच बोलांचा तर तिमीलावर वीसमात्रेचा लक्ष्मीतालम् ही आगळीक जाणवली़ तबल्यावर राष्ट्रगीताची धून ऐकीवात होती़ परंतु, नंदकुमार यांनी चक्क एडक्यावर आनंदभैरवीचे वादन करीत सुखद अनुभूती दिली़ 

पश्चिम बंगाल येथील संगीततज्ज्ञ पीयल भट्टाचार्य यांच्या प्रदेशातील पुरातन तंतूवाद्यांचा मागोवा घेतला़ अलापिनीविणा (एकतंत्री)च्या वैशिष्ट्यासह त्यांचे शागीर्द, सायक मित्रा, नवतंत्रीचे वादन सुभेंदू घोष तर कच्छपी विणेचे वादन अभिजीत रॉय यांनी केले़ सप्तनिषादगीत, नैशादिक कपाल गीत प्रस्तुत केले़ सायंकालीन सत्रात या कलावंतांनी मार्गी नाट्य नऊ भाषेतून सादर केले़ मलेशिया येथील नर्तक रामली इब्राहीम यांनी ओडीसी नृत्य सादर केले़ महागामीच्या गुरुकूलात साधक व अभ्यासकांसाठी चर्चासत्रात कर्नाटकी शिल्पाच्या अभ्यासिका डॉ़ करुणा विजेंद्रा यांनी स्लाईड शो द्वारे कर्नाटकातील शिल्पशैलींचा आढावा घेतला़ पुरातन गौंडाली नृत्याची माहिती देताना महाराष्ट्रातील गोंधळ लोककलेची सांगड घातली़ 

लोककलेचा जागर
राजस्थानातील पारंपारिक वाद्य व लोकसंगीत, निजामकालीन लोकधारा या विषयी अनुक्रमे डॉ़ सुनिला कासलीवाल, डॉ़ रंगय्या दासरी, डॉ़ इंद्रयणी चक्रवर्ती यांनी माहिती दिली़ जोधपूर, बाडमेरा या राजस्थानी इलाख्यात आढळणारी रावणहाथ्था या तंतू वाद्यावर सुगनाराम भोपी व कलावंतांनी प्रस्तुतीकरण केले़ देशी बनावटीचे हे वाद्य भिल्ल जमातातील कलावंत स्वत:च तयार करून त्याचे वादन करतात़ पाबुजी महाराज या लोकदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ८०० वर्षापासून हे वाद्य प्रचलित आहे़ पशूधनाच्या स्वास्थ्यासाठी भोपी मंडळी या वाद्यावर जागर घालतात, अशी माहिती डॉ़ सुनिराजींनी दिली़ डॉ़ चक्रवर्ती यांनी किन्नरी लोकवाद्याविषयी माहिती दिली़ डॉ़ दासरी रंगय्या व दर्शनम् मोगलय्या यांनी किन्नरी वाद्यावर लोकगीते सादर केली़ शास्त्र आणि परंपरा या सोबत सुरू झाल्या आहेत़ लोककलावंतांना शास्त्रीय चौकटीत बांधू नका, कारण पारंपारिक कला जोपासण्याचे काम याच लोकांनी केले आहे़, असे डॉ़ सुनिरा म्हणाल्या़ 

ख्याल गायनाचा प्रवास या विषयावर ग्वाल्हेर घराण्याचे पं़ सत्यशील देशपांडे यांनी संप्रयोग व्याख्यान दिले़ पार्वती दत्ता यांनी कथ्थक नृत्यातील लास्यांग या विषयावर विवेचन केले़ समारोपीय सत्रात ज्येष्ठ कवी व कला साहित्याचे अभ्यासक अशोक वाजेपयी यांनी कुठलेही शास्त्र शाश्वत नसते़ काळानुसार त्यात बदल होत असतो़ शास्त्राची निर्मिती देखील प्रयोगाचे निष्कर्षातूनच होते आणि पुन्हा नव्याने प्रयोग सुरू होत असतात़ हा सृजनात्मक अविष्कार समजून घेतला पाहिजे़ अभिजात कलांचा उल्लेख करताना इतर परंपरांना डावलून चालणार नाही़ परिवर्तन हा निसर्ग नियम आहे़ शास्त्राला डावलू नका पण त्यात नव्याने भर घाला, असे सूचक विधान केले़ चार  दिवसांच्या या संगीत सोहळ्यात विविध विषयांवर अभ्यासकांनी विचार मांडले़

Web Title: Folk chanting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.