धोंडेवाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 07:04 PM2018-03-24T19:04:18+5:302018-03-24T19:07:01+5:30

विनोद : ज्यांना स्वत:ला जावई आलेले आहेत त्यांनी ‘यावर्षी तुझ्या माहेरचे मला धोंडेवाणाला काय देणार आहेत?’ असा प्रश्न आपल्या घरी विचारला तर, ‘तुम्ही तुमच्या जावयाला जे देणार आहात तेच दिले जाईल’ किंवा ‘लायकीप्रमाणे मिळत असते’ असे जहाल उत्तर ऐकावयास मिळू शकते.

Dhondewan | धोंडेवाण

धोंडेवाण

googlenewsNext

- आनंद देशपांडे

या वर्षी धोंड्याचा महिना आलेला आहे. तर या महिन्यात जावयाला धोंडेवाण दिले जाते. बर्‍याच जुन्या प्रथा आणि परंपरा मोडीत निघालेल्या असल्या तरी कुठलाही गाजावाजा न होता ही परंपरा जावई आणि त्यांच्या सासूबाई या संघटनांनी टिकवून ठेवली आहे असे दिसते. तर सर्वात प्रथम हे धोंडेवाण प्रकार काय आहे हे समजावून घेऊयात. हा धोंड्याचा महिना दर तीन वर्षांनी येत असतो आणि या महिन्यात सासुरवाडीकडून जावयास धोंडा नामक पुरण भरलेला पदार्थ आणि सोबत भरभक्कम आहेर केला जातो. ‘भरभक्कम आहेर केला जातो’ ही आमच्यासारख्या गरीब जावयांसाठी ऐकीव बातमी आहे. (इथे साहित्य सेवेसाठी आमचा संसार आम्ही पणाला लावला आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल.) यावर्षी म्हणजे २०१८ मध्ये एप्रिल महिन्यात हा आलेला आहे. तर हा महिना आला की सासरेबुवांच्या पोटात खर्चाच्या भीतीने धोंडा, माफ करा गोळा उठतो आणि जावई मंडळींच्या मनात थुई थुई कारंजे नाचत असते. सासूबार्इंनी तर सहा महिने आधीच जावयाला सोन्याची अंगठी किंवा लॉकेट किंवा गोफ, सोबत भारीचा ड्रेस, कन्येला अजून काही असे बरेच काहीबाही नियोजन केलेले असते.

आमच्या मेंदूची सेटिंग तिरकी असल्यामुळे मनात असा विचार आला की एकदा कन्या देऊन, हौशेने लग्न लावून, मांडव परतणीला आणि दिवाळे काढणार्‍या दिवाळसणाला आहेर केल्यानंतर पुन्हा दर तीन वर्षाला जावयाला रिकरिंग आहेर तहहयात करण्याच्या प्रथेमागील मूळ कारण काय असेल? प्रश्न पडला की उत्तर शोधणे भाग आहे. आम्हास असे वाटले की आपण दान केलेल्या कन्येबरोबर संसार करताना जावईबापूंना जो मानसिक त्रास सहन करावा लागत असेल त्यावर उपाय म्हणून, त्याचे परिमार्जन म्हणून धोंडेवाण ही ‘प्रोत्साहनपर भत्ता देण्याची’ प्रथा असावी. म्हणजे काय आहे की आजकाल मुलींना फार लाडात वाढवले जाते. आजकाल असे म्हणण्याचा प्रघात आहे अन्यथा पंचवीस वर्षांपूर्वी लाडात वाढलेली अशीच एक कन्या आमच्या घरी आणि तशीच एक कन्या तुमच्याही घरावर राज्य करीत असते. विनोदी लिखाण किती कटू पण वास्तववादी असू शकते याचा आपणास प्रत्यय आला असेलच आणि इतके कठोर वास्तव मांडणारा लेखक आपल्या भागातील आहे याचा अभिमान पण वाटला असेलच, तर असो किंवा  नसोसुद्धा. तर आपल्या कन्येबरोबर भवसागर पार करताना होणारी जावईबापूंची दमछाक आणि त्यावर रिलिफ म्हणजे उतारा म्हणून धावण्याच्या शर्यतीत पळणार्‍या धावकाला जसे अधूनमधून इलेक्ट्रोलाईटचे पाणी दिले जाते तसे दर तीन वर्षांनी धोंडेवाण दिले जात असावे, असा आमचा कयास म्हणजे अंदाज आहे .

मुलीचे लग्न लावून देणे म्हणजे, ‘आपल्या घरात वाजणारा फटाका वात पेटवून दुसर्‍याच्या घरात टाकून देणे होय’ असे कुणीतरी, पुन्हा पुन्हा सांगतो की कुणीतरी म्हणजे आम्ही सोडून कुणीतरी म्हटलेले आहे. या खळबळजनक विधानाचे पितृत्व आमचे नाही, आम्ही ते फक्त उद्धृत म्हणजे कोट केले आहे याची तमाम भगिनी वाचकांनी नोंद घ्यावी आणि विनाकारण आमच्या घरावर मोर्चे आणू नयेत ही विनंती. तर होते काय की आज मुलींच्या आई-वडिलांसाठी फार फार सोपे आणि मुलांच्या आई-वडिलांसाठी फार फार अवघड झालेले आहे. मुलींच्या आई-वडिलांसाठी सोपे म्हणजे पालकांनी खस्ता खाऊन मोठे केलेला एक चांगला मुलगा गाठावा आणि धूम धडाक्यात लग्न लावून देऊन मोकळे व्हावे. आपण ‘दान’ केलेली कन्या तिकडे सासरी धुमाकूळ घालण्यास प्रारंभ करते, आपण त्याकडे साफ दुर्लक्ष करावे.

दर तीन वर्षांनी येणार्‍या धोंड्याच्या महिन्यात धोंडेवाण देऊन मोकळे व्हावे. मुलांच्या आई-वडिलांसाठी फार फार अवघड झालेले आहे म्हणजे लग्नानंतरचे एखादे वर्ष झाल्यानंतर फक्त धोंडेच अंगावर येतात. धोंडेवाण मात्र आपल्या सुपुत्राच्या वाट्याला तीन वर्षाला  एकदाच येते. ज्यांना स्वत:ला जावई आलेले आहेत त्यांनी ‘यावर्षी तुझ्या माहेरचे मला धोंडेवाणाला काय देणार आहेत?’ असा प्रश्न आपल्या घरी विचारला तर, ‘तुम्ही तुमच्या जावयाला जे देणार आहात तेच दिले जाईल’ किंवा ‘लायकीप्रमाणे मिळत असते’ असे जहाल उत्तर ऐकावयास मिळू शकते. सावध करणे लेखकाचे काम आहे, पण काळजी मात्र ज्याची त्यानेच घेणे आवश्यक आहे.
( anandg47@gmail.com)

Web Title: Dhondewan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.