कुशल सामरिक रचनेचा अभूतपूर्व मानकरी देवगिरी किल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 06:38 PM2018-03-24T18:38:00+5:302018-03-24T18:39:44+5:30

स्थापत्यशिल्प : देवगिरी म्हणजे देवांची नगरी... देवगिरी म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्राचे सोनेरी पान. देवगिरी म्हणजे बलाढ्य यादवांची समृद्ध राजधानी... देवगिरी म्हणजे दूर दिल्लीच्या सुलतानालासुद्धा पडलेली मोहिनी... देवगिरी म्हणजे मोहम्मदाचे स्वप्न.... देवगिरी म्हणजे मलिक अंबर आणि शहाजी राजांनी झुंजवलेले निझामाचे दख्खनी राज्य.....देवगिरी म्हणजे युद्धात न हरलेली मात्र फितुरीने गंजलेली तलवार.. देवगिरी म्हटले की मनात अशा अनेक न संपणार्‍या प्रतिमा उभ्या राहतात. किल्ल्यांचा सम्राटच जणू...!!!

Devagiri Fort, an unprecedented architect of skilled strategic design | कुशल सामरिक रचनेचा अभूतपूर्व मानकरी देवगिरी किल्ला 

कुशल सामरिक रचनेचा अभूतपूर्व मानकरी देवगिरी किल्ला 

googlenewsNext

- तेजस्विनी आफळे

मागच्या लेखात आपण दख्खनच्या ह्या लखलखीत हिर्‍याच्या सुमारे १२०० वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेतला. ह्या सोनेरी इतिहासाचे साक्षीदार आहेत इथल्या ऐतिहासिक वास्तूंचे भग्नावशेष. त्यापैकी आज दौलताबादच्या अभूतपूर्व सामरिक रचनेचा आढावा. पुरातत्त्वशास्त्रीय अभ्यासानुसार मध्ययुगीन देवगिरी किल्ला व शहर साधारणपणे तीन विभागात विभागले गेलेले होते. मुख्य बालेकिल्ला व त्याला घेरून असलेला कालकोट. बालेकिल्ल्याचा डोंगर जवळजवळ १०० फूट उभा तासून अभेद्य बनवला आहे. हा ताशीव कडा उतरतो तो थेट पाण्याने भरलेल्या खंदकात. त्याकाळी ह्या पाण्यात अनेक विषारी जलचरही असत असे म्हणतात. बालेकिल्ल्यात प्रवेशण्यासाठी आज जिन्याची सुविधा असली तर मध्ययुगात डोंगराच्या पोटात कोरून काढलेले वळणा-वळणाचे अंधारी भुयार हा एकमेव मार्ग होता. ह्या संपूर्ण काळोख्या मार्गावर वरून गरम पाणी, तेल ओतणे, किल्ल्यावरील सैनिकांनी अचानक केलेले हल्ले, अशा क्लृप्त्यांनी शत्रूचा पूर्ण बीमोड अगदी खात्रीशीरच. चुकून एखादी प्रकाशाची तिरीप आली म्हणून एखादा शत्रूसैनिक हरखलाच तर त्याचा शेवट थेट खंदकातच.

किल्ल्याचे निर्माते एवढी व्यवस्था करून थांबले नाहीत तर अंधारी मार्गानंतर बालेकिल्ल्याच्या उतारावरही संरक्षक भिंत आणि बुरुज बांधल्याचे अवशेष आजही बघायला मिळतात. तेथून पुढे पायर्‍यांचा वळणदार रस्ता किल्ल्याच्या सर्वात उंच भागाकडे घेऊन जातो. हा बालेकिल्ला आणि पायथ्याशी खंदकाच्या बाहेरील बाजूस असलेली राजघराण्यातील लोकांची निवास व्यवस्था कालकोटात संरक्षित आहे. कालकोटाच्या बाहेरील बाजूस सरदार-दरकदार, अमीर-उमराव निवासस्थाने, कचेर्‍या असाव्यात. आकाशाशी स्पर्धा करणारा चांद-मीनार इथेच आणि ह्याला संरक्षण देणारा तो महाकोट. ही तटबंदी एकेरी नसून काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी चक्क चौपदरी आहे. महाकोटातील अनेक बुरुज आजही शानदार तोफा बाळगून आहेत. महाकोटालाही खंदकाचे संरक्षण आहे. इतिहास-संशोधकांच्या अभ्यासानुसार ह्या दोन भागांना मिळून यादवकाळात कटक-देवगिरी असे नाव प्रचलित होते. आज किल्ल्यात आपण प्रवेशतो ते महाकोटातील चौपदरी रचनेच्या वळणा-वळणाच्या मार्गानेच. किल्ल्यामध्ये सापडलेल्या अनेक लहान-मोठ्या तोफा पुरातत्व खात्याने येथील देवड्यांमध्ये प्रदर्शनार्थ ठेवल्या आहेत.

महाकोटाच्या बाहेरील बाजूस पूर्वेला सामान्य प्रजेची व्यवस्था होती. सुमारे ४५ भव्य बुरुज व अनेक सुबक दरवाजे ल्यालेली अंबरकोट ही तिसरी तटबंदी आणि खंदक, अशी संपूर्ण किल्ला व दौलताबाद वसाहतीच्या संरक्षणासाठी सिद्ध रचना आढळते. अशी ही अभूतपूर्व सामरिक रचना नक्की कुठल्या एका राजघराण्याच्या काळात आखली गेली हे सांगणे अवघड आहे. मात्र बांधकाम शैलीतील अनेक छोटे-मोठे फरक ही सामरिक रचना कुणा एकाच राजघराण्याच्या काळात बांधली गेली नसून अनेकांच्या योगदानातूनच ही कुशल रचनानिर्मिती झाल्याचे दर्शवितात.

किल्ल्याच्या सामरिक रचनेचे आणखी एक वैशिष्ट्य. मुख्य किल्ल्याला प्रवेश फक्त एकच, उत्तरपूर्वेला. कालकोट, महाकोट आणि उत्तर-दक्षिण विस्तार असलेली अंबरकोट ह्या तिन्ही तटबंद्या व त्यातील वस्त्या किल्ल्याच्या पूर्व दिशेस वसलेल्या आहेत. मुख्य किल्ल्याचा ताशीव कडा आणि खंदक सोडल्यास पश्चिमेला संरक्षणाची गरज निर्मात्यांना भासलेली नसावी. किल्ल्याच्या ह्या मागच्या बाजूस तटबंदी अथवा कुठलेही सामरिक बांधकाम आढळत नाही. दौलताबाद गावातून पश्चिम दिशेला जाणार्‍या रस्त्यावरील अंबरकोटातील दरवाजाशिवाय अन्य कुठलाही मोठा दरवाजा ह्या दिशेला आयोजिलेला नाही. मात्र उत्तरेला वेरूळच्या घाटाकडे जातानाचा सुंदर दगडी दरवाजा ह्याच अंबरकोटाचा भाग. एकेकाळी दख्खनचा प्रवेशमार्ग असे बिरुद मिरवलेल्या ह्याच किल्ल्याचा दरवाजा आज मात्र आपल्याला महामार्ग विकासापायी खटकू लागलाय..!!

(  tejas.aphale@gmail.com )
 

Web Title: Devagiri Fort, an unprecedented architect of skilled strategic design

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.